तू हि रे (मराठी)मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक.
कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.
अभिनय:
मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.
दिग्दर्शन:
संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की.
संगीत आणि गीतकार:
मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे.
मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
वेलकम बॅक
मागील वेलकम-१ च्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न अर्थात सिक्वेल किवा पार्ट टू म्हणून दिग्दर्शक अनिस बाझ्मी घेऊन आलेत “वेलकम बॅक”. वेलकम हा त्यांचा मागील याच्या आधीचा भाग प्रचंड गाजला होता. अनिस बाझ्मी यांचे चित्रपट तुम्ही बघायला जाता तेंव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी कि खूप मोठी पात्रांची गर्दी अन त्या प्रत्येक पात्राला महत्व मिळुन त्याचा कथेत कुठे-ना-कुठे समावेश करत सरकणारी कथा. ही नक्कीच बाझ्मी यांची खासियत आणि आपल्या कथेत गर्दीतील प्रत्येक पात्राला त्याच्या वकुबानुसार समाविष्ट करत अभिनय करवून घेणे ही एक जगावेगळी गोष्ट अनिस बाझ्मी यांना साधलेली आहे. नो एन्ट्री-रेडी आणि वेलकम-१ ही त्याची काही ठळक उदाहरणे.
कहाणी:
वेलकम बॅक मध्ये अनिस बाझ्मी यांनी आपल्या पहिल्याच वेलकम मध्ये अर्धवट सोडलेल्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळी पात्र तीच आहे नाना-अनिल कपूर वगेरे पण नायक म्हणून जॉन अब्राहम आणि नायिका म्हणून श्रुती हसनचा समावेश आहे. मागच्याच वेलकम मधील कथेतील काही गाजलेल्या सिक्वेन्सला-डायलॉगजला वगेरे वगेरे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पुन्हा वापरण्याची चतुराई दिग्दर्शकाने दाखवलेली आहे.
दिग्दर्शन:
अनिस बाझ्मी यांनीच वेलकम-१ चे दिग्दर्शन केले होते. आधी म्हटल्याप्रमाणे पात्रगर्दी करून मग त्या गर्दीला कथेत गुंतवत कथेच्या अनुषंगाने सोडवणे ही अनिस बाझ्मी यांची खासियत. या वेळेसही त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला जाणवतो पण डाळ गळलेली नाही. पूर्वप्रसिद्धी केल्याप्रमाणे दुबईतील शुटींगचा थरार-वाळवंटातील साहसदृश्ये इत्यादी इत्यादी जगावेगळी चाल चालण्याच्या नादात काही बेसिक गोष्टी सुटलेल्या जाणवतात.बेसिक गोष्टी उदाहरणार्थ कथेला पुढे नेताना मान्य कि कॉमेडी सिक्वेन्स असल्यामुळे वास्तविकतेशी ताडण्याचा प्रयत्न चुकीचा पण प्रेक्षकांना मूर्ख समजत कहाणीचा प्लॉट उभा असेल आणि दिग्दर्शकच जर लेखकही असेल तर काय हास्यास्पद प्रकार होईल?? सगळ्यात जास्त खुपणारी गोष्ट म्हणजे कथेचा शेवट. साहसदृश्ये वगेरे वगेरे वाळवंटातील साकारताना ती अर्धवट/अपूर्ण राहतील कि काय अशी शंका एकदाही अनुभवी दिग्दर्शकाला येऊ नये??
अभिनय:
नाना पाटेकर आणि अनिल कपूरची भाई म्हणून साकारलेली जोडगोळी पहिल्या वेलकम मध्ये प्रचंड गाजली होती. हा कथेचा पाया तोच असल्याचे ओळखत अनिस बाझ्मी यांनी त्या दोघांना परेश रावल सोबत रिपीट केलेला आहे. नाना आणि अनिल कपूर याही वेळेस आपापल्या भूमिकात शोभून जातात. पण नायक म्हणून समाविष्ट केलेला जॉन अब्राहम त्याच्या कथेतील सहभागाच्या वेळेसच प्रेक्षकांची डोक्याची शीर तडकावतो आणि जो शेवटपर्यंत जमिनीवर येत नाही. पहिल्या वेलकम मध्ये असलेल्या फिरोज खानच्या सामावेशाप्रमाणेच यात नसिरुद्दीन शहाचा समावेश आहे. पण पहिल्या वेलकम मध्ये असलेला जो विनोदाचा तडका होता तो साधने नसिरुद्दीन शहाला अभिनयातून अजिबात जमत नाही.
संगीत:
रेडी म्हणा नो एन्ट्री म्हणा व वेलकम-१ संगीत ही ठळक गोष्ट होत अनिस बाझ्मी यांच्या कलाकृतींमध्ये. या वेळेस संगीत आघाडीवर सपशेल लोटांगण आहे. कोणाचं/काय वगेरे डीटेल्स आपण दुर्लक्षित करू पण एक मला जाणवलेली ठळक गोष्ट कि एक आयटम सॉंग होत, कायको-बायको-सायको अशी गाणे दृष्टीने व्यवस्थित साधलेली यमका-यमकी होती पण पुन्हा एकदा डाळ गळलेली नाही.
अनिस बाझ्मी यांचे चित्रपट बघायला प्रेक्षक आपापल्या पुर्वानुभावाप्रमाणे जातीलच पण सिक्वेल बघताना आजही भारतीय प्रेक्षकांची मानसिकता परंपरागतच आहे. येथे आजही तनु वेडस मनु सारख्या उत्तम प्रयत्नाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू शकतो. वेलकम बॅक हा पहिल्या वेलकमचा सिक्वेल मला तद्दन बाष्कळ आणि फालतू वाटला म्हणून मी फक्त नाना आणि अनिल कपूरच्या अभिनयासाठी एक १ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
फॅंटम
भारत-पाकिस्तान संबंध त्यांतील ताणतणावासकट हा आजकाल चित्रपट निर्मात्यांचा प्रेमानंतर दुसरा एक आवडता कमवून देणारा विषय बनलेला आहे याची प्रचीती देणारा एक चित्रपट म्हणजे फॅंटम.मुंबई इव्हेन्जर्स या हुसैन झैदी यांच्या कादंबरीवर आधारित कथानक आणि आजपर्यंत कधी ही कोणत्याही चित्रपटाच्या सुरवातीस न बघितलेले "न्युट्रल कथानक" असल्याचे डिस्क्लेमर सुरवातीला मिळते कारण हाफिज सईद ने टाकलेली केस. मान्य असो व नसो पण या केसमुळे भारतात या चित्रपटाला पुरेशी पूर्वप्रसिद्धी मिळवून दिली.इतकी कि कोणतही प्रमोशन करण्याची गरज निर्माते नाडियादवाला परिवार आणि सिद्धार्थ रॉय-कपूर ला भासली नाही यातच सगळ आलं. यावर्षी सुरवातीला आलेल्या अक्षय कुमारच्या बेबी मध्ये कदाचित पहिल्यांदा एका पात्रस्वरुपात मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड अन पाकिस्तानी कट्टरपंथी हाफिज सईद चे प्रेक्षकांना दर्शन घडले होते. या चित्रपटात त्याचे पुढचे पाऊल टाकत चक्क एक स्पष्ट पात्र म्हणून त्याचा समावेश केलेला आहे.
हाफिज सईद ने पाकिस्तानी सुप्रीम कोर्टात धाव घेत त्याच प्रदर्शन पाकिस्तानात का रोखलं असेल याच थोडफार उत्तर चित्रपटातून मिळते. स्पष्ट नाव न घेता पण इस्लाम च्या आडून पाकिस्तानी तरुण पिढीला कसा बहकवायचा प्रयत्न सदर इसम कसा यशस्वीपणे प्रयत्न करतो आहे हे कळते. भारत असो व पाकिस्तान लोकं हे चित्रपटसृष्टीला बरेच गांभीर्याने घेतात. त्याच्या लोकप्रियतेला पाकिस्तानात काही टक्के तरी ओहोटी लागण्याची शक्यता निश्चितच होती यातून. म्हणूनच कदाचित त्याने हे प्रदर्शन रोखलं असावं.
कहाणी:
२६-११ चा मुंबई हल्ला आणि त्या हल्ल्याला आपल्या रॉ मधल्या एका एजंट ने घेतलेला बदला/सूड अशी कहाणी. मुंबई हल्ल्यावर आजपर्यंत अनेक चित्रपट बनले. अमेरिकेत जर वर्ल्ड ट्रेड सेंटर चा ९-११ च्या हल्ल्यानंतर इतका गोंधळ उडून त्याची परिणीती ओसामाला शोधून,निवडून अमेरिकेने शिक्षा देण्यात होते तर २६-११ मुळे भारताला हे का जमत नाही अशी थियरी मांडून त्या सभोवताल फिरणारे हे कथानक.हि थियरी इमोशनली पटण्यासारखी असली तरी practically नाही. अमेरिकेचे जगाच्या राजकारणातील स्थान आणि अमेरिकन डॉलर अन भारतीय बापडा रुपया यातला फरक हा अतिशय स्पष्ट आहे. नाटक सिनेमात ठीक आहे पण हि कहाणी प्रत्यक्षात येण्यास अशक्य कारण माननीय पंतप्रधानांना आपण बहुमत तर दिले पण सोबत विरोधकही दिलेत. पण तरीही सैफ अली खानचा मृत्यू सोडून या कहाणीत मला काहीही वावगे वाटले नाही. भलेही प्रत्यक्षात येण्यास अशक्य का असेना पण चित्रपटांच्या कहाणीला काय सिरीयसली घ्यायचं??
अभिनय:
सैफ अली खान (दानियल खान) आणि कतरिना कैफ (नवाझ) हे दोघ एजंट. एक रॉचा एजंट आणि एक प्रायव्हेट रॉ आणि इतर सगळ्या देशांच्या एजन्सीजची अंडरकव्हर सपोर्टिंग एजंट टाईप. योगायोगाने एकमेकात मोहिमांच्या अनुषंगाने गुंतलेली नि आपोआप वाढलेली कहाणी. मुंबई हल्ला, हाफिज सईद आणि इस्लाम धर्म असल्या कदाचित वास्तविक पण स्ट्रीमलाईन कहाण्यांशी फटकून असणारी कहाणी असल्यामुळे यात अभिनय करणे हि कदाचित भविष्यकाळातील जीवाचा धोका बनण्याची रिस्क होती पण सगळ्याच कलाकारांनी व्यवस्थित निभावलेल कथानक.
दिग्दर्शन:
फॅंटम हे कबीर खान म्हणजेच एक था टायगर आणि बजरंगी भाईजान वाले. एकाच वर्षात दोन सुपरहिट (बजरंगी भाईजान आणि फॅंटम) देण्याइतके शुटींग-पोस्ट प्रोडक्शन-पास्ट प्रोडक्शन-प्रमोशन इत्यादी इत्यादी इव्हेण्ट्स मधून कसं वेळ management केलं असेल हे देवच जाणे. त्यांच्या ख्याती प्रमाणे सिनेमाचे पहिले दहा मिनिटे जे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ताणण्यास जबाबदार असतात ते पुन्हा एकदा जबरदस्त पद्धतीने manage केलेलं आहे त्यांनी. वास्तविक बघता हाफिज सईद आणि पाकिस्तान यांच्यावर इस्लाम धर्माथ्रू टिप्पण्या असल्यामुळे नाही म्हटले तरी स्फोटक विषय होता हा. पण सांगण्यास कौतुक कि कबीर खान यांनी सगळ्या अनुभवाला व्यवस्थित पणाला लावून सगळ हाताळल आहे.
फॅंटम हे एक इंग्रजी काल्पनिक पात्र, batman-सुपरमन-शेरलॉक होम्स यांसारखे. त्याच्या ख्यातीप्रमाणे तो गायब असतो व जेंव्हा गरज पडते तेंव्हाच प्रकट होतो. याचप्रमाणे आपल्या फॅंटम मध्येही आपला नायक कहाणी घडण्याआधी काही वर्षे अदृश्य असतो (विविध कारणांनी) आणि कहाणी execute करायला प्रकटतो. कदाचित या कारणामुळे चित्रपटाचे नाव फॅंटम असावे.
मला चित्रपटाचे नाव हे का दिले हे समजले नाही, संगीत जवळपास नव्हतच आणि शेवटचा सैफ अली खानचा मूत्यू पटला नाही पण सगळ्या कमतरतेवर कडी करणारे दिग्दर्शन आणि अभिनय आवडला म्हणून मी चित्रपटला चार ४* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
दोन स्पेशल (मराठी नाटक) क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित नाटक “दोन स्पेशल” हे जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांच्या अभिनयाने प्रेमकथेच्या समकक्ष धाटणीत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे.मराठी नाटक आपण बघायला जातो तेंव्हा उपलब्ध दोन-तीन अंकात लेखक दिग्दर्शक पूर्ण कथा बसवतात आणि त्या कथेला उपलब्ध अभिनेता-अभिनेत्री आपापल्या अभिनयाने सजवतात. कहाणी: दोन स्पेशल हि दोन दुरावलेल्या प्रेमी जीवांची कथा असे कदाचित आपण म्हणू शकू. जितेंद्र जोशी हा एक पत्रकार-उपसंपादक आणि गिरीजा ओक हि त्याच कार्यालयातली त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी. या दोघांची दुरावण्याची कथा दोन अंकात फिरून शेवटी का दुरावलेत याचे त्या दोघांना उत्तर मिळून कथा संपते.
अभिनय:
मुळात कथा प्रेम कहाणी समकक्ष असे म्हटले कारण प्रेम कहाणी पूर्वाश्रमीची असल्यामुळे जराही तोल ढळू न देत जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले आपापल्या भूमिकांत पुरून उरतात. नाटकात सिनेमा सारखे टेक-रिटेक्स असे प्रकरण नसल्यामुळे कदाचित खराखुरा अभिनय असे नाटकाला म्हणता येईल. दोन स्पेशल मध्ये जितेंद्र जोशी पहिल्या अंकात आणि गिरीजा ओक-गोडबोले दुसर्या अंकात खरोखर एक एक संवाद म्हणतात जो कदाचित एका धड्याइतका असेल. हा महाप्रचंड संवाद सदर करताना दोघांचाही तोल ढळत नाही. कथेला पुढे सरकवण्यासाठी अतिशय मोक्याचे असलेले ते दोन वेगवेगळ्या अंकातील संवाद हे कठीण असूनही आपोआप नाटकाचा प्राण बनलेत.पूर्वाश्रमीची कथा एका नाटकात विशद करताना नाटकात flashback ची सोय नसल्यामुळे सगळे काही मंचावरील अभिनेत्यांच्या हातात असते कि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना कोणतेही कन्फ्युजन न व्हावे आणि लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित कथा प्रेक्षकांपर्यंत नीट पोचावी. पण सांगण्यात समाधान कि जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले हे कुठेही कमी पडत नाहीत.
दिग्दर्शन:
क्षितीज पटवर्धन हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. प्रेक्षकांना कन्फ्युज न होऊ देत कथा त्यांच्यापर्यंत पोचावी हा त्यांचा प्रयत्न बरेच ठिकाणी कळून येतो. फक्त नायक नायिकेच्या संवादांच्या सहाय्याने जेंव्हा दिग्दर्शकाला flashback उभा करायचा असतो तेंव्हा तो कसा उभा करावा याचे एक खरेखुरे प्रात्यक्षिक म्हणजे "दोन स्पेशल"
दोन स्पेशल हा बघावा जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले च्या अप्रतिम अभिनयासाठी. त्या दोघांच्या अभिनयासाठी मी हे नाटक रेकमंड करीन आणि मी नाटकाल पाचपैकी तीन ३* देईन माझ्याकडून बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
शोले
शोले चित्रपटाला आज रिलीज होऊन अर्थात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची संधी मिळून आज चाळीस वर्षे पूर्ण झाली. कधी कधी मी विचार करतो कि मला शोले का आवडला? १.आजूबाजूचे सगळे कौतुक करत असल्याचा तो मानसिक परिणाम असेल काय? कि २.खरच त्यातला अभिनय/संगीत/कथा/पात्रनिवड/पटकथा/संवाद मला आवडले असतील? पण विचार न करता मी दुसर्या पर्यायावर पोचतो करण शोले ज्या वयात बघितला ते वय इतरांचे ऐकून निर्णय घेणार्यापैकी नव्हत. लहान असल्यामुळे आवडला तर आवडला अन नाही आवडला तर नाही मग कुणालाही काहीही वाटो. अर्थात हि गोष्ट असल्यामुळे मला वाटते कि शोले त्यातल्या अनेकानेक वैशिष्ट्यांमुळे मला आवडला.
शोलेतला अभिनय हि शोलेची सर्वाधिक जमेची बाजू अस माझ मत आहे. सलीम-जावेद च्या कथा अन पटकथेला आर डी बर्मन च्या संगीत अन पार्श्वसंगीताने साज चढवला अन रमेश सिप्पीची पात्रनिवड अन दिग्दर्शनाने त्यावर कळस चढवला.अभिनयात शोले मध्ये सगळे-सगळे आपापल्या भूमिकांत शोभले अगदी गब्बर सिंग पासून ते अगदी छोटीशी भूमिका असलेल्या सुरमा भोपाली पर्यंत. अभिनयात कुणालाही काहीही बोट दाखवता येणार नाही असे चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत खूप कमी आहेत. पण जे आहेत त्यात शोले वरच्या क्रमांकावर आहे. आज मागे वळुन बघताना शोले चे कौतुक कशासाठी करावे अन कशासाठी नाही असा विचार लोकांना पडतो यातच शोलेचे यश सामावलेले आहे.
भारतीय सिनेसृष्टीत सर्व दृष्टीने परिपूर्ण असे दोनच चित्रपट सध्या मला वाटतात. हा कदाचित मला नसलेल्या अनुभवाचा परिणाम असेल किंवा नसलेल्या ज्ञानाचा. पण १. शोले आणि २ हम आप के है कौन हे दोन मला सर्व दृष्टीने पैसा वसूल चित्रपट वाटतात, पूर्ण कुटुंबाला नेऊ शकू असे आणि आजोबांपासून ते लहान भावांपर्यंत कुणीही कंटाळणार असे कारण सगळ्या वयांसाठी काही ना काही या दोन्ही चित्रपटात आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ला नुकतेच १००९ आठवडे पूर्ण झाल्याची बातमी नुकतीच कुठेतरी वाचली.याही चित्रपटाने असाच विक्रम नोंदवावा यासाठी सुपरस्टारला शुभेच्छा.
-समीर
Mission: Impossible – Rogue Nation
आताच काही दिवसांपूर्वीच आपण आपला (हिंदी/भारतीय) मधल्या बाहुबली ला बघून प्रभास अन दग्गुबत्तीच्या फिजिकल फिटनेस अन स्टण्टस बद्दल त्यांचे झालेले कौतुक बघितले अन प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या हॉलीवूडशी झालेली बरोबरीहि बघितली. पण हॉलीवूडचे फिजिकल स्टण्टस म्हणजे काय अन ते सर्वोत्तम कसे याचे उदाहरण प्रेक्षकांना दिसण्यासाठी लगोलग दाखल झालाय Mission: Impossible – Rogue Nation .
हा सिनेमा Tom क्रुज च्या या सिरीज मधला पाचवा भाग. कोणताही सिनेमा कुणीही का बघावा हा ज्याच्या त्याच्या टेस्टचा प्रश्न असतो. पण सदर पूर्ण सिरीज का बघावी? तर tom क्रुझ ने वयाच्या पन्नाशीत केलेले [कोणताही body डबल न वापरता केलेले] अविश्वसनीय फिजिकल स्टण्टस. पहिल्या भागापासूनच तो यात जबरदस्त जीव ओतून शोभून गेलाय या सिरीजमध्ये पण या वेळेस तो वयाच्या ५३ व्या वर्षी आपल्या हिंदी नायकांना शरम वाटावी असे कारनामे करून जातो.
कहाणी:
सिनेमा अमेरिकन. त्यामुळे सर्व दृष्टीने अमेरिकेची बाजू वरचढ ठरणारी स्टोरी लाइन पहिल्या भागापासूनच. त्यात सी आय ए, एफ बी आय इत्यादी इत्यादी त्यांच्या संस्थाना वरचढ ठरू बघणारी त्यांचीच एक इंटर्नल संस्था impossible मिशन फोर्स[आय एम एफ]. त्यात त्यांचे-त्यांचे आंतरिक राजकारण. त्या राजकारणात सुरु झालेली एकमेकांवर अब्जावधी बिलियनसाठी कुरघोडी करण्याची आंतरिक स्पर्धा. त्यात लागलेला "सिंडीकेट" चा शोध. अन या सिंडीकेटच्या मुळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न. हे सगळ करताना त्याच execution ऑन स्क्रीन कसे होते यावर प्रेक्षकांचे संतुलन सांभाळायची कसरत सगळ्याच भागात अप्रतिमरीत्या झालेली सापडते. कोणी/कस/काय/किती या हॉलीवूडच्या डीटेल्स मध्ये आपण न जाता फक्त एन्जॉय करण्याचे ठरवले तरीही कुठेही कमी न पडणारी एक अप्रतिम हॉलीवूड सिरीज.
अभिनय:
इथन हंट हा tom क्रुझचा रोल.पहिल्या भागापासूनच तो एक सिक्रेट एजंट. मग लगोलग या भूमिकेत विविध मोहिमा निभावताना त्याने केलेले अप्रतिम स्टण्टस. आपण आधीचे भाग जाऊ देऊ पण याच भागात अगदी सिनेमाच्या सुरवातीला त्याने हात मागे एक खांबाला बांधलेले असतानाही पूर्ण ३६० डिग्रीच्या कोनातून उडी घेऊन स्वत:ची त्याने करवून घेतलेली सुटका हे एक अगदी छोटसं उदाहरण. मग त्याने पुढे बाइक रेस, विमानाला लटकणे इत्यादी स्टण्टस स्वत:च कोणताही बॉडी डबल न घेत केलेले आहेत. मान्य असो वा नसो पण हॉलीवूड मध्ये भाव भावनांपेक्षा या इतर कलाकुसरीलाच प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्व असते आणि या मानकावर अगदी अप्रतिम रित्या उतरून तो एक सुपरस्टार असल्याचे स्वत:ला सिद्ध करतो.
आपल्या इथे आपण इतर कलाकुसरीला महत्व न देता भावभावनांना महत्व देतो. कदाचित हा भारतीय-अमेरिकन मानसिकतेमधील बेसिक फरक असावा.कारण काहीही असो पण माझ्यासारख्या एका सामान्य प्रेक्षकाने हॉलीवूडच्या मारधाडपटा कडून बाळगलेल्या सगळ्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करतो म्हणून मी पूर्ण पाच पैकी ५* देईन पाच पैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
दृश्यम (Drishyam) [हिंदी]
हिंदी सिनेमा जेंव्हा आपण बघायला जातो तेंव्हा त्याचं नाव हे जास्तीत जास्त वेळा प्रेम या विषयावर बेतलेले असते. द्रिश्यम असे मुलत: संस्कृतवर बेतलेले टायटल दिले म्हणजे हे हिंदी प्रेक्षकांनी समजून जाव कि हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असावा. आणि तो आहेच. मोहनलाल या मलयालम सुपरस्टारच्या चित्रपटाचा हा रिमेक.
कहाणी:
दृश्यम हे असे टायटल का? कारण चित्रपटाचे टायटल हे कहाणीशीसंबंधित असते. तर त्यालाही कारण आहे. आपल्या स्मरणशक्तीवर जास्तीत जास्त छाप सोडणारी कल्पना कोणती? तर आपल्याला दिसणारे आपण बघितलेले अन अनुभवलेले दृश्य. कोणतीही गोष्ट जी दिसते ती आपण विसरत नाही. ती लक्षात राहते. या वास्तविकतेचा वापर करून एका सर्वसामान्य माणसाने न्यायाची लढलेली लढाई असे कदाचित आपण या कहाणीला म्हणू शकू.
अभिनय:
विजय साळगावकर (अजय देवगण) हा एक सर्वसामान्य व्यक्ती केबलचा धंदा करणारा. कमी शिकलेला.
एक बायको अन दोन मुली असणारा. या व्यक्तीला रंगवताना एक थ्रिलरपट असल्यामुळे प्रेम किंवा जबाबदारी या दोन्ही कल्पनांत वाहवत जाण्याचा चान्स अजय देवगण जवळ होता. पण त्याने अक्षरश: सराईत पणे या दोन्ही कन्सेप्ट्स ला व्यवस्थित हाताळून विजय साळगावकर पडद्यावर उभा केलेला आहे. स्वत:चा धंदा अन कौटुंबिक जबाबदार्या सांभाळताना एक सर्वसामान्य माणसाची चालणारी कसरत अन त्यातही पब्लिक रिलेशनशिप्स हाताळताना असणारा व्यवस्थितपणा हा खरोखर अप्रतिमरित्या अजय देवगनने उभा केलेला आहे. गोलमाल सिरीज अन सिंघम सिरीज या दोन सिरीज नंतर एक अभिनेता म्हणून अजय मध्ये अभिनय दृष्टीने आमुलाग्र बदल झालेला आहे. आणि मान्य असो व नसो याचे श्रेय रोहित शेट्टिचेच.
नंदिनी साळगावकर या श्रिया सरन ने उभ्या केलेल्या त्याच्या पत्नीचा उल्लेखही करावाच लागेल. आजपर्यंत श्रियाने हिंदीत जास्त छाप सोडलेली नाही. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत ती सुपरस्टार असेलही कदाचित पण हिंदीत तिचा आवर्जून बघण्यासारखा एकही सिनेमा नाही. फक्त एक दिसायला सुंदर अभिनेत्री म्हणून तिचा वापर काही चित्रपटात झालेला आहे इतकंच. पण या तिच्या इम्प्रेशनला १८० च्या कोनाने छेद देणारी भूमिका म्हणून भविष्यात नंदिनी साळगावकरचा उल्लेख होईल. दोन मुलींची आई आणि आपल्या मुलीवर संकट आल्यावर त्याचा समर्थपणे मुकाबला करून त्यातूनही लढलेली. दिसायला सुंदर ती आहेच पण जबाबदारी रंगवताना तिच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी आलेली आहे. आणि याच गोष्टीमुळे तिचा वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पहिल्या टाईमपास मधला दगडू देखील एका छोट्याश्या सहाय्यक भूमिकेत दर्शन देतो.
दिग्दर्शन:
निशिकांत कामत हे या थ्रिलरपटाचे दिग्दर्शक. आपल्या "लई भारी" आणि "डोंबिवली फास्ट" वाले. त्यांनी अतिशय अप्रतिमपणे एक कठीणशी कहाणी उभी केलेली आहे. एका सामान्य माणसाची आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाला परतवताना जी घालमेल होते ती पडद्यावर चितारताना निशिकांत कामत बर्याच ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त वेळा वास्तविकतेला म्हणजेच दुसर्या शब्दात (practicality )ला महत्व दिलेला आहे. त्यामुळेच कदाचित प्रेक्षकांचा इंटरेस्ट टिकून राहतो. आणि चाकोरीबाहेर जाऊन या बाबीमुळेच कदाचित ते सफल होतात.
संगीत:
विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि समीर फातरपेकर यांचे backround संगीत सिनेमाला आहे पण ते जरी शोभत असल तरी सुधारणेस बराच वाव होता.
"Don't underestimate the power of a common man" हा सुपरस्टार शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस या सिनेमातील गाजलेला डायलॉग. या फक्त एका डायलॉगला मिळती जुळती कहाणी भविष्यात एका थ्रिलरपटाच्या चेहर्यामोहर्याने कदाचित पडद्यावर उतरेल असे वाटलेही नसेल तेंव्हा शाहरुख खानला. पण आज दोनच वर्षात सुपरस्टारच्या फक्त एका गाजलेल्या डायलॉग वर बेस्ड पूर्ण तीन तासांचा चित्रपट बनला एक थ्रिलर कहाणीच्या रूपाने.
मला हा थ्रिलर पट आवडला पण यातले संगीत पटले नाही आणि सुधारणेस खूप वाव वाटला पण संगीत सोडून कोणतीही खोट जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला चार ४* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर