शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

वेलकम बॅक



वेलकम बॅक 
मागील वेलकम-१ च्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न अर्थात सिक्वेल किवा पार्ट टू म्हणून दिग्दर्शक अनिस बाझ्मी घेऊन आलेत “वेलकम बॅक”. वेलकम हा त्यांचा मागील याच्या आधीचा भाग प्रचंड गाजला होता. अनिस बाझ्मी यांचे चित्रपट तुम्ही बघायला जाता तेंव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी कि खूप मोठी पात्रांची गर्दी अन त्या प्रत्येक पात्राला महत्व मिळुन त्याचा कथेत कुठे-ना-कुठे समावेश करत सरकणारी कथा. ही नक्कीच बाझ्मी यांची खासियत आणि आपल्या कथेत गर्दीतील प्रत्येक पात्राला त्याच्या वकुबानुसार समाविष्ट करत अभिनय करवून घेणे ही एक जगावेगळी गोष्ट अनिस बाझ्मी यांना साधलेली आहे. नो एन्ट्री-रेडी आणि वेलकम-१ ही त्याची काही ठळक उदाहरणे.
कहाणी:
वेलकम बॅक मध्ये अनिस बाझ्मी यांनी आपल्या पहिल्याच वेलकम मध्ये अर्धवट सोडलेल्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळी पात्र तीच आहे नाना-अनिल कपूर वगेरे पण नायक म्हणून जॉन अब्राहम आणि नायिका म्हणून श्रुती हसनचा समावेश आहे. मागच्याच वेलकम मधील कथेतील काही गाजलेल्या सिक्वेन्सला-डायलॉगजला वगेरे वगेरे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पुन्हा वापरण्याची चतुराई दिग्दर्शकाने दाखवलेली आहे.
दिग्दर्शन:
अनिस बाझ्मी यांनीच वेलकम-१ चे दिग्दर्शन केले होते. आधी म्हटल्याप्रमाणे पात्रगर्दी करून मग त्या गर्दीला कथेत गुंतवत कथेच्या अनुषंगाने सोडवणे ही अनिस बाझ्मी यांची खासियत. या वेळेसही त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला जाणवतो पण डाळ गळलेली नाही. पूर्वप्रसिद्धी केल्याप्रमाणे दुबईतील शुटींगचा थरार-वाळवंटातील साहसदृश्ये इत्यादी इत्यादी जगावेगळी चाल चालण्याच्या नादात काही बेसिक गोष्टी सुटलेल्या जाणवतात.बेसिक गोष्टी उदाहरणार्थ कथेला पुढे नेताना मान्य कि कॉमेडी सिक्वेन्स असल्यामुळे वास्तविकतेशी ताडण्याचा प्रयत्न चुकीचा पण प्रेक्षकांना मूर्ख समजत कहाणीचा प्लॉट उभा असेल आणि दिग्दर्शकच जर लेखकही असेल तर काय हास्यास्पद प्रकार होईल?? सगळ्यात जास्त खुपणारी गोष्ट म्हणजे कथेचा शेवट. साहसदृश्ये वगेरे वगेरे वाळवंटातील साकारताना ती अर्धवट/अपूर्ण राहतील कि काय अशी शंका एकदाही अनुभवी दिग्दर्शकाला येऊ नये??
अभिनय:
नाना पाटेकर आणि अनिल कपूरची भाई म्हणून साकारलेली जोडगोळी पहिल्या वेलकम मध्ये प्रचंड गाजली होती. हा कथेचा पाया तोच असल्याचे ओळखत अनिस बाझ्मी यांनी त्या दोघांना परेश रावल सोबत रिपीट केलेला आहे. नाना आणि अनिल कपूर याही वेळेस आपापल्या भूमिकात शोभून जातात. पण नायक म्हणून समाविष्ट केलेला जॉन अब्राहम त्याच्या कथेतील सहभागाच्या वेळेसच प्रेक्षकांची डोक्याची शीर तडकावतो आणि जो शेवटपर्यंत जमिनीवर येत नाही. पहिल्या वेलकम मध्ये असलेल्या फिरोज खानच्या सामावेशाप्रमाणेच यात नसिरुद्दीन शहाचा समावेश आहे. पण पहिल्या वेलकम मध्ये असलेला जो विनोदाचा तडका होता तो साधने नसिरुद्दीन शहाला अभिनयातून अजिबात जमत नाही.
संगीत:
रेडी म्हणा नो एन्ट्री म्हणा व वेलकम-१ संगीत ही ठळक गोष्ट होत अनिस बाझ्मी यांच्या कलाकृतींमध्ये. या वेळेस संगीत आघाडीवर सपशेल लोटांगण आहे. कोणाचं/काय वगेरे डीटेल्स आपण दुर्लक्षित करू पण एक मला जाणवलेली ठळक गोष्ट कि एक आयटम सॉंग होत, कायको-बायको-सायको अशी गाणे दृष्टीने व्यवस्थित साधलेली यमका-यमकी होती पण पुन्हा एकदा डाळ गळलेली नाही.

अनिस बाझ्मी यांचे चित्रपट बघायला प्रेक्षक आपापल्या पुर्वानुभावाप्रमाणे जातीलच पण सिक्वेल बघताना आजही भारतीय प्रेक्षकांची मानसिकता परंपरागतच आहे. येथे आजही तनु वेडस मनु सारख्या उत्तम प्रयत्नाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू शकतो. वेलकम बॅक हा पहिल्या वेलकमचा सिक्वेल मला तद्दन बाष्कळ आणि फालतू वाटला म्हणून मी फक्त नाना आणि अनिल कपूरच्या अभिनयासाठी एक १ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा