मराठी नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी नाटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ जून, २०२५

जर तरची गोष्ट

 



जर तरची गोष्ट

इरावती कर्णिक लिखित आणि अद्वैत दादरकर - रणजित पाटील  दिग्दर्शित "जर तरची गोष्ट" या नाटकाचा २५२ व्वा प्रयोग बघण्याचा योग आज जुळून आला.  ‘जर आणि तर मध्ये अडकलेल्या नात्याच्या, हसण्याच्या आणि रुसण्याच्या  या विचित्र (!) गोष्ट निर्मितीचा प्रयत्न प्रिया बापट हिचा आहे.

समर (उमेश कामत) आणि राधा (प्रिया बापट) यांचे लग्न, लग्नानंतरचा डिव्होर्स आणि डिव्होर्सनंतर पल्लवी अजय   (सती) आणि आशुतोष गोखले (अबीरयांच्यासोबत जुळलेली नाती आणि नंतर सरतेशेवटी या नवीन नात्यातून परतलेली जुनी कहाणी असा सगळा गोतावळा म्हणजे "जर तरची गोष्ट" !

तर या कहाणीचा थोडाफार अंदाज वाचकांना लागला असेलच , तर पुढे जाऊन आपण कथेबद्दल जास्त काय बोलावे ? तर झाले असेल असे कि चार मित्र जमले असतील, आणि ठरवले असेल कि आपण नाटक काढू ! प्रिया म्हणाली असेल मी निर्मिती करते इरावती बाई लिहून देतील. मग कहाणी "आजकाल असेच असते" या सदराखाली  सगळ्यांनी मिळून फायनलाईझ केली असेल

दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील या दोघांनी मिळून केले आहे. बस या एका वाक्याउपर त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल काय सांगावे ?? शब्दमर्यादेनं दम तोडला माझ्या !!

मराठी रसिक हा एक निर्बुद्ध प्राणी असून आपण काहीही दाखवले तरी आपल्या "इमेजखाली" ते चालवून घेतल्या जाईल असा गैरसमज होण्याइतके उमेश कामत आणि प्रिया बापट मोठे स्टार मराठीत आहेत का ??  मी या नाटकाला माझे पैसे खर्च करून तिकीट काढून गेल्यामुळे मी या नाटकाला पाव (/)* देईन बाकी निर्णय मायबाप प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

(१५//२०२५)


रविवार, ८ जून, २०२५

एका लग्नाची पुढची गोष्ट


एका लग्नाची पुढची गोष्ट

"एका लग्नाची गोष्ट" या प्रशांत दामलेंच्याच जुन्या नाटकाचा पुढचा भाग  म्हणजेच "एका लग्नाची पुढची गोष्ट" या नाटकाचा प्रयोग क्रमांक ७७१ आणि प्रशांतजींचा वैयक्तिक १३२५२ वा प्रयोग बघण्याचा भाग्य आज लाभले. एका लग्नाची गोष्ट मधील मन्या (प्रशांत दामले) आणि मनी (कविता मेढेकर) यांचे त्या नाटकांत प्रेम होते आणि मग लग्न होऊन 'ते' नाटक संपते. या नाटकांत दोघंही चाळीशीच्या घरात आहेत आणि वयानुसार त्यांच्या नात्यांत  होणाऱ्या दुराव्याचा कसा कस लागतो याचे कथानक म्हणजे "एका लग्नाची पुढची गोष्ट" . अद्वैत दादरकर हे  या नाटकाचे लेखक  दिग्दर्शक आहेत.

तर या नाटकांत मन्या मनी हे दोघंही छानपैकी आपल्या संसारात मश्गुल असतात, त्यांना एक २२ वर्षांचा मुलगाही असतो आणि तो बंगलोर ला कुठेतरी शिकत असतो. तर जसे जसे त्यांचे वय वाढत जाते तसं तसं त्यांच्या नात्यांत एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो. लग्नानंतरच्या जीवनात येणाऱ्या बदलांमुळे नवरा बायकोच्या नात्यांत मानसिक रित्या कितपत ताण निर्माण होतो हे  दाखवण्याचा प्रयत्न आहे. मुखत्वे लग्नापूर्वीचे प्रेम आणि रोमँटिक संबंध लग्नानंतर कसे बदलतात, या बदलामुळे त्यांच्या आपापसातील कम्युनिकेशन मध्ये कसा बदल होतो हे जाणवून देण्याच्या प्रयत्न नाटकांत आहे.

त्यांच्या नात्यांत येणारा हा रुक्षपणा दूर करण्यासाठी मनी हि पुरु (अद्वैत दादरकर) आणि कश्मिरा (मृणाल चेंबूरकर) यांच्या साह्याने एक प्लॅन राबवते. आणि तो प्लॅन यशस्वी झाल्यामुळे मन्याच्या मनात पुन्हा प्रेमाची पालवी फुटून त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत होतात.

अभिनयाबद्दल बोलायचे म्हटल्यास प्रशांत दामलें बद्दल काय बोलणार..? ते अभिनय तर छान करतातच पण गातातही हि अप्रतिम आणि नाचतातही खूप सहज . सुरवातीला चिडचिडा आणि नंतर भावूक झालेला मन्या खूप छान उभा केलाय. त्यांचे "मला सांगा " आणि "ती परी "ह्या दोन गाण्यांशिवाय तिसरं गाणंही ऍड केलंय. "तू हि असावा मी ही असावीअसे बोल आहेत त्या गाण्याचे. आधीची दोन्ही गाणी आवडत होतीच पण हे  तिसरं गाणंही छान जमून आलंय.कविता मेढेकर यांनी उत्कृष्ट रित्या नात्यांतील दुरावा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायकॉलॉजिकल थिरपीचा वापर करून तिने पुरु कश्मिरा सोबत रचलेला प्लॅन आणि त्याचे केलेलं execution बऱ्यापैकी पटते. आणखी एक नेपथ्याचा अति वापर करता कथानक समजावण्यासाठी तिचाच दोन-तीन दा दिग्दर्शकाने वापर केलेला आहे. म्हणजे ती एंट्री प्रेक्षकांतून घेते, नाटकांत दोन-तीनदा कथेपासून वेगळी होऊन प्रकाशयोजनेच्या साहाय्याने काय चाललंय स्टेजवर ते समजावते. ते बरोबर शोभलंय. याला लेखक-दिग्दशर्क अद्वैत दादरकर ची नवीन संकल्पना कदाचित म्हणता येईल पण ती शोभलेली आहे व्यवस्थित, प्रेक्षकांना कथानक समजते पूर्णपणे.

सरतेशेवटी midlife क्रायसिस या प्रत्येकच विवाहित जोडप्याच्या आयुष्यातील अनिवार्य घटनेभोवती विनोदी अंगाने गुंफणाऱ्या या कथानकांस मी पूर्ण पाचपैकी पाच स्टार (*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर (08/06/2025)

 


 

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

अमर फोटो स्टुडियो

एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ  आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला  स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच  अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर  आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ.


मनस्विनी लता रवींद्र म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या लेखीका आणि नुकत्याच गाजलेल्या "ती सध्या काय करते" च्या पटकथा लेखिका.  त्यांनी एक  गुंतागुंतीची कथा नाटकाचा कोणतेही रिटेक नसलेल्या अन लोकेशन बदलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या वातावरणात अगदी कौतुकास्पद रित्या उभी केलेली आहे.

अमेय वाघ, सखी गोखले सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर या सगळ्यांचाच अप्रतिम अभिनय हे अमर फोटो स्टुडिओ चे मुख्य यश. अमेय वाघ ने अक्षरश: तीन ते चार वेगवेगळ्या भूमिका सराईतपणे वठवल्यात. आणि आजोबा - वडील - मुलगा या तीनही पिढ्यांच्या अभिनयात सुव्रत जोशी कोठेही कमी पडत नाही. उलट दुसऱ्या अंकात एक असा प्रसंग येतो कि त्याला एकाच सीनमध्ये दोन भूमिका कराव्या लागतात. त्या प्रसंगात फक्त वेशभूषेच्या फरकाने दोन भूमिका वठवून सुव्रत जोशी  अगदी अप्रतिम रित्या दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरून उरतो. सखी गोखले हिने पण तिच्या भूमिकेत जीव ओतलेला आहे. स्टेजवरून खाली प्रेक्षकांत कहाणीच्या प्रसंगान्वये शिरून प्रेक्षकांना कहाणीत समरस होण्यास भाग पाडण्याचा तिचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता.

 एक अप्रतिम नाटक जे मनोरंजनाचा हेतू पूर्ण करते. वास्तविक एका नाटकाला रेटिंग मी काय देणार पण तरीही या नाटकाला ५* देण्याचा मोह मी चुकवणार नाही.

-समीर 

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

कार्टी काळजात घुसली


कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक)

प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे.

कहाणी:
कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. वास्तविक बघता तेजश्री प्रधान हि नाटकात नायिका आहे असे म्हटल्यावर तिची आणि प्रशांतजींची जोडी कशी जमवली असेल याबाबत प्रेक्षकांना उत्कंठा वाटणे साहजिक आहे. पण लेखक वसंत सबनीस यांनी हि उत्कंठा पुरेपूर शमवली असून पहिल्या पंधरा मिनिटातच उत्तर मिळते प्रेक्षकांना.

अभिनय:
नाटकाभीनयाचे जागतिक विक्रमकर्ता प्रशांत दामले  हे संगीतकार के के आणि तेजश्री प्रधान हि त्यांची मुलगी कांचन यांच्या भूमिकेत असून त्या दोघांनी आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे.

प्रशांत दामले यांच्या केके चा उल्लेख विशेष करून त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी. मान्य कि नाटक लिखित संहितेत असते पण तरीही त्यातील विनोदाला लाइव्ह प्रेक्षकांसमोर उभा करणे कथेतील विनोदाच्या टायमिंग चुकू देता आणि नाटकाचा मूळ विषय बघता मुळातील गंभीरतेच्या गाभ्याला धक्का लागू देता हे मुख्य अभिनेत्यासाठी निश्चितच कौतुकास्पद. प्रशांतजींचे कांचनसोबतचे काही प्रसंग हे कथेला पुढे सरकवण्यासाठी भावनात्मकदृष्ट्या आव्हानात्मक होते. ते हि त्यांनी अप्रतिम रित्या निभावून नेलेत. म्हणजे एकच व्यक्ती तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात रंगमंचावर लाइव्ह प्रेक्षकांसमोर भावनात्मक (इमोशनल) प्रसंग निभावतो आणि संहितेतील विनोदाच्या फोडणीलाही पुरून उरतो हे निश्चितच कौतुकास्पद आहे.  आणि याच सोबत काही प्रसंगात प्रेक्षकांना त्यांच्या गायनकलेचेही दर्शन घडते

तेजश्री प्रधान हिने रंगवलेली भूमिका म्हणजे कांचन१८ वर्षांपासून वडलांपासून दुरावलेली एक मुलगी जेंव्हा परत आपल्या वडिलांना भेटते तेंव्हाची एका मुलीची दोलायमान मन:स्थिती तेजश्रीने अप्रतिम रित्या उभी केलेली आहे. काही प्रसंगात तिची भूमिका कथेला पुढे नेण्यासाठी एक सपोर्ट इतकीच मर्यादित आहे तर काही प्रसंग पूर्ण तिच्या भूमिकेच्या गांभीर्यावर उभे आहेत पण सांगण्यास कौतुक कि तिने समर्थपणे सगळे प्रसंग तोलले आणि निभावून नेलेले आहेत. होणार सून मधल्या जान्हवीमुळे तिला घरोघरी प्रसिद्धी मिळाली पण या नाटकामुळे तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळेल.

कोणत्याही नाटकात पटकथा एक महत्वाची भूमिका बजावते. या नाटकात भावनात्मक प्रसंग उभे करण्यात पटकथा आणि संवाद लेखक कमी पडले अशी शंका प्रेक्षकांना बाहेर निघताना येते. अर्थात व्यक्ती-दरव्यक्ती आकलन करण्याचा फरक असल्यामुळे असेल कदाचित पण मला असे वाटले म्हणून मी या नाटकाला प्रशांतजी आणि तेजश्री दोघांच्या अभिनयासाठी साडे तीन   [ /]* दिन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर                 

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

पुन्हा सही रे सही (नाटक)

पुन्हा सही रे सही (नाटक)

मराठी नाटक म्हणजे काय अन ते उत्कृष्ट कसे असतात हे समजून घेण्यासाठी कमीत कमी एकदा तरी रसिकांनी बघावे असे एक नाटक म्हणजे "पुन्हा सही रे सही". या आधी सुयोग निर्मित अन केदार शिंदे लिखित/दिग्दर्शित असे हे नाटक होत पण आता टायटल बदलल "पुन्हा सही रे सही " झाल अन दिग्दर्शक तोच पण निर्माता बदलला. सौ सरिता भरत जाधव या निर्मात्या बनल्या असून त्या आता हे नाटक भरत जाधव इंटरटेनमेंट या banner खाली हे नाटक निर्मित करतात.
कोणत्याही नाटकात सिनेमासारखा डबल रोल शक्य असतो?? उत्तर आहे होय आणि दोन नाही तर दिग्दर्शकाच्या शक्कलेला अभिनेत्याच्या समर्पकतेचि जोड जर मिळाली तर एक दोन नव्हे तर चक्क चार - चार भूमिका एकच अभिनेता एकाच नाटकात उभ्या करू शकतो.

कहाणी:
मदन सुखात्मे या एका श्रीमंत उद्योगपतीच्या इस्टेटीच्या हास्यात्मक ढंगाने झालेल्या किंवा होत असलेल्या वाटण्या म्हणजे पुन्हा सही रे सही.

अभिनय:
भरत जाधव यांनी या नाटकात (मदन सुखात्मे,रंगा, हरी आणि गलगले) या चार भूमिका केलेल्या आहेत. या चार भूमिका करताना प्रत्येक भूमिकेत स्टेजवर येण्याचे टायमिंग, भूमिकेचे रंगमंचावरील विशिष्ट दार आणि प्रत्येक भूमिकेला समकक्ष सहाय्यक अभिनेत्यांशी हास्यात्मक किंवा व्यंगात्मक संवाद यांचे टायमिंग हे ज्या सहजतेने भरत जाधवला साधते ते शब्दश: अफलातूनच.मदन सुखात्मे याच्या पहिल्या भूमिकेने प्रवेश, मग हरी, रंगा आणि गलगले यांचे कहाणीतले आगमन आणि सरतेशेवटी मदन सुखात्मेने येउन केलेला शेवट या सगळ्या भूमिकांत भरत जाधव प्रेक्षकांना खिळवून टाकतो खुर्चीवर.

दिग्दर्शन:
केदार शिंदे हे या नाटकाचे दिग्दर्शक. सुयोग तर्फे जेंव्हा हे निर्मित व्हायचं तेंव्हा देखील हेच होते आणि आताही हेच आहेत. केदार शिंदेनी या नाटकात बर्याच कल्पनांना effectively वापरलेलं आहे. उदाहरणार्थ चारही भूमिकातून भरत जाधवच्या संबंधित भूमिकेचे आगमन रंगमंचावर होताच इतर भूमिकावाल्या रंगमंचावरील प्रकाशयोजना थांबवणे जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष जिथे पाहिजे तिथेच वेधल्या जाईल, भारतच्या चारपैकी तीन भूमिकांना repeatative डायलॉगज देणे इत्यादी इत्यादी. मान्य असो व नसो पण या नाटकाच्या यशात एका दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीचे श्रेय निर्विवादपणे आहेच.

अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या या अप्रतिम नाटकाला मी बापडा काय रेटिंग देणार? पण फक्त पाचपैकी पाच ५* देण्याची माझी हौस मात्र मी भागवून घेईन म्हणतो.

-समीर

सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

दोन स्पेशल (मराठी नाटक)

दोन स्पेशल (मराठी नाटक) 
क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित नाटक “दोन स्पेशल” हे जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांच्या अभिनयाने प्रेमकथेच्या समकक्ष धाटणीत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे.मराठी नाटक आपण बघायला जातो तेंव्हा उपलब्ध दोन-तीन अंकात लेखक दिग्दर्शक पूर्ण कथा बसवतात आणि त्या कथेला उपलब्ध अभिनेता-अभिनेत्री आपापल्या अभिनयाने सजवतात. 
कहाणी: 
दोन स्पेशल हि दोन दुरावलेल्या प्रेमी जीवांची कथा असे कदाचित आपण म्हणू शकू. जितेंद्र जोशी हा एक पत्रकार-उपसंपादक आणि गिरीजा ओक हि त्याच कार्यालयातली त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी. या दोघांची दुरावण्याची कथा दोन अंकात फिरून शेवटी का दुरावलेत याचे त्या दोघांना उत्तर मिळून कथा संपते.
अभिनय:
मुळात कथा प्रेम कहाणी समकक्ष असे म्हटले कारण प्रेम कहाणी पूर्वाश्रमीची असल्यामुळे जराही तोल ढळू न देत जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले आपापल्या भूमिकांत पुरून उरतात. नाटकात सिनेमा सारखे टेक-रिटेक्स असे प्रकरण नसल्यामुळे कदाचित खराखुरा अभिनय असे नाटकाला म्हणता येईल. दोन स्पेशल मध्ये जितेंद्र जोशी पहिल्या अंकात आणि गिरीजा ओक-गोडबोले दुसर्या अंकात खरोखर एक एक संवाद म्हणतात जो कदाचित एका धड्याइतका असेल. हा महाप्रचंड संवाद सदर करताना दोघांचाही तोल ढळत नाही. कथेला पुढे सरकवण्यासाठी अतिशय मोक्याचे असलेले ते दोन वेगवेगळ्या अंकातील संवाद हे कठीण असूनही आपोआप नाटकाचा प्राण बनलेत.पूर्वाश्रमीची कथा एका नाटकात विशद करताना नाटकात flashback ची सोय नसल्यामुळे सगळे काही मंचावरील अभिनेत्यांच्या हातात असते कि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना कोणतेही कन्फ्युजन न व्हावे आणि लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित कथा प्रेक्षकांपर्यंत नीट पोचावी. पण सांगण्यात समाधान कि जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले हे कुठेही कमी पडत नाहीत.

दिग्दर्शन:
क्षितीज पटवर्धन हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. प्रेक्षकांना कन्फ्युज न होऊ देत कथा त्यांच्यापर्यंत पोचावी हा त्यांचा प्रयत्न बरेच ठिकाणी कळून येतो. फक्त नायक नायिकेच्या संवादांच्या सहाय्याने जेंव्हा दिग्दर्शकाला flashback उभा करायचा असतो तेंव्हा तो कसा उभा करावा याचे एक खरेखुरे प्रात्यक्षिक म्हणजे "दोन स्पेशल"

दोन स्पेशल हा बघावा जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले च्या अप्रतिम अभिनयासाठी. त्या दोघांच्या अभिनयासाठी मी हे नाटक रेकमंड करीन आणि मी नाटकाल पाचपैकी तीन ३* देईन माझ्याकडून बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर