दृश्यम (Drishyam) [हिंदी]
हिंदी सिनेमा जेंव्हा आपण बघायला जातो तेंव्हा त्याचं नाव हे जास्तीत जास्त वेळा प्रेम या विषयावर बेतलेले असते. द्रिश्यम असे मुलत: संस्कृतवर बेतलेले टायटल दिले म्हणजे हे हिंदी प्रेक्षकांनी समजून जाव कि हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असावा. आणि तो आहेच. मोहनलाल या मलयालम सुपरस्टारच्या चित्रपटाचा हा रिमेक.
कहाणी:
दृश्यम हे असे टायटल का? कारण चित्रपटाचे टायटल हे कहाणीशीसंबंधित असते. तर त्यालाही कारण आहे. आपल्या स्मरणशक्तीवर जास्तीत जास्त छाप सोडणारी कल्पना कोणती? तर आपल्याला दिसणारे आपण बघितलेले अन अनुभवलेले दृश्य. कोणतीही गोष्ट जी दिसते ती आपण विसरत नाही. ती लक्षात राहते. या वास्तविकतेचा वापर करून एका सर्वसामान्य माणसाने न्यायाची लढलेली लढाई असे कदाचित आपण या कहाणीला म्हणू शकू.
अभिनय:
विजय साळगावकर (अजय देवगण) हा एक सर्वसामान्य व्यक्ती केबलचा धंदा करणारा. कमी शिकलेला.
एक बायको अन दोन मुली असणारा. या व्यक्तीला रंगवताना एक थ्रिलरपट असल्यामुळे प्रेम किंवा जबाबदारी या दोन्ही कल्पनांत वाहवत जाण्याचा चान्स अजय देवगण जवळ होता. पण त्याने अक्षरश: सराईत पणे या दोन्ही कन्सेप्ट्स ला व्यवस्थित हाताळून विजय साळगावकर पडद्यावर उभा केलेला आहे. स्वत:चा धंदा अन कौटुंबिक जबाबदार्या सांभाळताना एक सर्वसामान्य माणसाची चालणारी कसरत अन त्यातही पब्लिक रिलेशनशिप्स हाताळताना असणारा व्यवस्थितपणा हा खरोखर अप्रतिमरित्या अजय देवगनने उभा केलेला आहे. गोलमाल सिरीज अन सिंघम सिरीज या दोन सिरीज नंतर एक अभिनेता म्हणून अजय मध्ये अभिनय दृष्टीने आमुलाग्र बदल झालेला आहे. आणि मान्य असो व नसो याचे श्रेय रोहित शेट्टिचेच.
नंदिनी साळगावकर या श्रिया सरन ने उभ्या केलेल्या त्याच्या पत्नीचा उल्लेखही करावाच लागेल. आजपर्यंत श्रियाने हिंदीत जास्त छाप सोडलेली नाही. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत ती सुपरस्टार असेलही कदाचित पण हिंदीत तिचा आवर्जून बघण्यासारखा एकही सिनेमा नाही. फक्त एक दिसायला सुंदर अभिनेत्री म्हणून तिचा वापर काही चित्रपटात झालेला आहे इतकंच. पण या तिच्या इम्प्रेशनला १८० च्या कोनाने छेद देणारी भूमिका म्हणून भविष्यात नंदिनी साळगावकरचा उल्लेख होईल. दोन मुलींची आई आणि आपल्या मुलीवर संकट आल्यावर त्याचा समर्थपणे मुकाबला करून त्यातूनही लढलेली. दिसायला सुंदर ती आहेच पण जबाबदारी रंगवताना तिच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी आलेली आहे. आणि याच गोष्टीमुळे तिचा वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पहिल्या टाईमपास मधला दगडू देखील एका छोट्याश्या सहाय्यक भूमिकेत दर्शन देतो.
दिग्दर्शन:
निशिकांत कामत हे या थ्रिलरपटाचे दिग्दर्शक. आपल्या "लई भारी" आणि "डोंबिवली फास्ट" वाले. त्यांनी अतिशय अप्रतिमपणे एक कठीणशी कहाणी उभी केलेली आहे. एका सामान्य माणसाची आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाला परतवताना जी घालमेल होते ती पडद्यावर चितारताना निशिकांत कामत बर्याच ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त वेळा वास्तविकतेला म्हणजेच दुसर्या शब्दात (practicality )ला महत्व दिलेला आहे. त्यामुळेच कदाचित प्रेक्षकांचा इंटरेस्ट टिकून राहतो. आणि चाकोरीबाहेर जाऊन या बाबीमुळेच कदाचित ते सफल होतात.
संगीत:
विशाल भारद्वाज यांचे संगीत आणि समीर फातरपेकर यांचे backround संगीत सिनेमाला आहे पण ते जरी शोभत असल तरी सुधारणेस बराच वाव होता.
"Don't underestimate the power of a common man" हा सुपरस्टार शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस या सिनेमातील गाजलेला डायलॉग. या फक्त एका डायलॉगला मिळती जुळती कहाणी भविष्यात एका थ्रिलरपटाच्या चेहर्यामोहर्याने कदाचित पडद्यावर उतरेल असे वाटलेही नसेल तेंव्हा शाहरुख खानला. पण आज दोनच वर्षात सुपरस्टारच्या फक्त एका गाजलेल्या डायलॉग वर बेस्ड पूर्ण तीन तासांचा चित्रपट बनला एक थ्रिलर कहाणीच्या रूपाने.
मला हा थ्रिलर पट आवडला पण यातले संगीत पटले नाही आणि सुधारणेस खूप वाव वाटला पण संगीत सोडून कोणतीही खोट जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला चार ४* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा