सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

दोन स्पेशल (मराठी नाटक)

दोन स्पेशल (मराठी नाटक) 
क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित नाटक “दोन स्पेशल” हे जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले यांच्या अभिनयाने प्रेमकथेच्या समकक्ष धाटणीत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे.मराठी नाटक आपण बघायला जातो तेंव्हा उपलब्ध दोन-तीन अंकात लेखक दिग्दर्शक पूर्ण कथा बसवतात आणि त्या कथेला उपलब्ध अभिनेता-अभिनेत्री आपापल्या अभिनयाने सजवतात. 
कहाणी: 
दोन स्पेशल हि दोन दुरावलेल्या प्रेमी जीवांची कथा असे कदाचित आपण म्हणू शकू. जितेंद्र जोशी हा एक पत्रकार-उपसंपादक आणि गिरीजा ओक हि त्याच कार्यालयातली त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी. या दोघांची दुरावण्याची कथा दोन अंकात फिरून शेवटी का दुरावलेत याचे त्या दोघांना उत्तर मिळून कथा संपते.
अभिनय:
मुळात कथा प्रेम कहाणी समकक्ष असे म्हटले कारण प्रेम कहाणी पूर्वाश्रमीची असल्यामुळे जराही तोल ढळू न देत जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले आपापल्या भूमिकांत पुरून उरतात. नाटकात सिनेमा सारखे टेक-रिटेक्स असे प्रकरण नसल्यामुळे कदाचित खराखुरा अभिनय असे नाटकाला म्हणता येईल. दोन स्पेशल मध्ये जितेंद्र जोशी पहिल्या अंकात आणि गिरीजा ओक-गोडबोले दुसर्या अंकात खरोखर एक एक संवाद म्हणतात जो कदाचित एका धड्याइतका असेल. हा महाप्रचंड संवाद सदर करताना दोघांचाही तोल ढळत नाही. कथेला पुढे सरकवण्यासाठी अतिशय मोक्याचे असलेले ते दोन वेगवेगळ्या अंकातील संवाद हे कठीण असूनही आपोआप नाटकाचा प्राण बनलेत.पूर्वाश्रमीची कथा एका नाटकात विशद करताना नाटकात flashback ची सोय नसल्यामुळे सगळे काही मंचावरील अभिनेत्यांच्या हातात असते कि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना कोणतेही कन्फ्युजन न व्हावे आणि लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित कथा प्रेक्षकांपर्यंत नीट पोचावी. पण सांगण्यात समाधान कि जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले हे कुठेही कमी पडत नाहीत.

दिग्दर्शन:
क्षितीज पटवर्धन हे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. प्रेक्षकांना कन्फ्युज न होऊ देत कथा त्यांच्यापर्यंत पोचावी हा त्यांचा प्रयत्न बरेच ठिकाणी कळून येतो. फक्त नायक नायिकेच्या संवादांच्या सहाय्याने जेंव्हा दिग्दर्शकाला flashback उभा करायचा असतो तेंव्हा तो कसा उभा करावा याचे एक खरेखुरे प्रात्यक्षिक म्हणजे "दोन स्पेशल"

दोन स्पेशल हा बघावा जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले च्या अप्रतिम अभिनयासाठी. त्या दोघांच्या अभिनयासाठी मी हे नाटक रेकमंड करीन आणि मी नाटकाल पाचपैकी तीन ३* देईन माझ्याकडून बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा