तू हि रे (मराठी)
मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक.
कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.
अभिनय:
मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.
दिग्दर्शन:
संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की.
संगीत आणि गीतकार:
मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे.
मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा