रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

मुंबई-पुणे-मुंबई 2



मुंबई-पुणे-मुंबई=2 

मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद  कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला.  "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले  मराठी चित्रपट असले तर आजच्याहि  जमान्यात  मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात. सुट्टी असो वा नसो पण मराठी चित्रपटांनी आजच्या जमान्यात तिकीट बारीवर शब्दश: अलोट गर्दी खेचणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे दोघंही आधीच्याच भागाप्रमाणे याही भागात असून त्यांनी त्यांची कहाणी पुढे नेलेली आहे आणि आधीच्या भागात  त्यांची नावे नव्हती फक्त एक मुंबईचा आणि एक मुंबईची अशी सारवासारव होती पण या भागात नामकरण करून गौतम प्रधान आणि गौरी देशपांडे यांची कहाणी नीटपणे मांडलेली आहे.
गौतम प्रधान हा पुण्याचा मुलगा आणि गौरी प्रधान हि मुंबईची मुलगी यांचा विवाहसोहळा संपन्न कसा होतो या धाग्याभोवती वेवेगळ्या अंगांनी फिरणारी कहाणी म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई २. पण यात समाधान कि कहाणीत कोणतेही फिल्मी ट्विस्ट नाही. वास्तविक बघता अंगद म्हैसकर (अर्णव) च्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना अशी शंका बरेचदा येते आणि त्यातही अभिनेत्री तिच्या निर्णयाबद्दल पक्की राहात नाही त्यामुळे या संशयाला बळकटी मिळते पण सरतेशेवटी चित्रपट "शेवट गोड" करून संपतो. पण सतीश राजवाडे हे लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना थोडेफार कन्फ्युज करण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
चित्रपटाची पहिल्या भागातील लोकप्रियता लक्षात घेता दुसया भागाची लोकप्रियता आधीच आगाऊ ठरवून/अपेक्षित धरून सतीश राजवाडेंनी बरेचसे प्रयोग करून बघितलेत मार्केटींगचे या भागात. बाकी जाऊ देऊ पण खानविलकर कि कोणीतरी या बिल्डर्सची जाहिरात करून देण्याची पद्धत त्यांनी वापरली. 
अविनाश-विश्वजित या संगीतकार जोडीलाच पहिल्या भागाप्रमाणे याहि भागात राजवाडेंनी रिपिट केलेले आहे. पण पहिल्या भागात "कधी तू" आणि "का कळेना" या दोनच गाण्यांनी जो प्रभाव या जोडीने निर्माण केला होता त्यांच्या १०%हि या वेळेस नाही. मान्य असो वा नसो पण या दोन गाण्यांचे पहिल्या भागाच्या यशातील योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. या वेळेस त्यांना ती जादू री-क्रिएट करणे अजिबात जमलेले नाही.
प्रेम आणि त्यानंतर लग्नाची/लग्नासाठी/लग्नापर्यंत इत्यादी इत्यादी जुळवाजुळव हा नाही म्हटले तरी सर्व वयोगटांत इंटरेस्टिंग विषय आहे. यावर मराठी चित्रपटात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे संवाद (dialogues ) पण अश्विनी  शेंडे  या लेखिकेने पटकथा आणि संवाद हि दुहेरी जबाबदारी सांभाळूनही दोन्हीकडे उत्तम न्याय केलेला आहे. त्यातही त्यांच्या संवाद लेखनासाठी त्यांचे विशेष कौतुक.
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीला सांभाळत सतीश राजवाडेंनी त्या दोघांकडूनही उत्तम अभिनय करवून घेतलाय पण मागील भागातली अविनाश-विश्वजित हि जोडी संगीत आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेली आहे. काही प्रसंगात "कधी तू" हे background म्हणून वापरले असते तरी चालले असते असे उगाचच प्रेक्षकांना बरेचदा वाटून जाते. मला सगळंच आवडल विशेष करून संवाद पण संगीताने माझा भ्रमनिरास केला म्हणून मी चित्रपटाला साडे तीन (३१/२)* स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर


बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

प्रेम रतन धन पायो


करिष्माई निर्माते-दिग्दर्शक सुरज बडजात्या हे नवीन चित्रपट त्यांची आवडती व्यक्तिरेखा "प्रेम" आणि या वेळेस प्रेम च्या भूमिकेत सलमान खान दुहेरी भूमिकेत असल्या तिकीट बारीवर गाजण्याच्या दृष्टीने परिपूर्ण मसाल्या सहित आलेले आहेत. पहिल्या विकेंडलाच गाठलेला शंभर कोटींचा आकडा हा दाखवतो कि जनता आधीपासूनच फक्त बडजात्याच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून आहे. पण कितीही नाकारले तरी रिपीट ऑडीयंस हि सुरज बडजात्या फिल्मची मागील काहीवेळची बनलेली  खासियत  या वेळेस कितपत चालते यावर या सिनेमाचे यश अवलंबून असेल. दिग्दर्शकाचे आणि मुख्य अभिनेत्याच्या जोडीचे प्री-इम्प्रेशनच इतके जबरदस्त कि पहिल्या तीन दिवसातच हिटचा दर्जा चित्रपटाने मिळवला पण यशस्वी होण्याचा दर्जा या  नंतर सुरु होईल, आणि तो मिळेल का हे अनुभवणे मजेशीर राहील !!!! 

सुरज बडजात्याचा सिनेमा म्हणजे पूर्ण शाकाहारी थोडक्यात पूर्ण कुटुंबाला सोबत नेउन देखील कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आवडेल असे काही ना काही सापडणारा एक दुर्मिळ सिनेमा असे आजवर इम्प्रेशन होते. मैने प्यार किया, हम आप के है कौन, हम साथ साथ  है आणि  विवाह   असल्या  एक से एक उत्तम कलाकृती सादर करणारा हा गडी. अर्थात मै प्रेम कि दिवानी हु सारखा अपवाद पण या केस मध्ये हा अपवाद देखील "सन्माननीय अपवाद"  आपोआप बनतो.  

सलमान खान दुहेरी भूमिकेत आणि त्यातही एक भूमिका राजाची आणि एक त्याच राज्यातल्या प्रजाजनाची. या दोन भूमिकांचा आपसात-सहकलाकारांशी  मेळ जमवताना लेखक स्वत:च कन्फ्युज झालाय का अशी शंका प्रेक्षकांना येते.  या दोन पैकी एक भूमिका जवळपास तीनही तासभर कहाणीच्या बाहेर असूनही हे विशेष. कहाणीलेखक-पटकथा लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता या चारही महत्वाच्या भूमिकांत सुरज बडजात्याच असल्यामुळे जसे विवाहच्या केसमध्ये उत्कंठावर्धक आणि तारुण्यपिटिकेला गवसणी घालणारी आगळी- वेगळी कथा असली वाहवा त्याने सगळ्या वयोगटातून त्याने मिळवली  त्याचप्रमाणे या  वेळेस रिपीट ऑडीयंस तर  सोडा पण मागील पुण्याईमुळे मिळालेला ऑडीयंसहि छी-थु करेल अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.  

लेखकाने cinematic लिबर्टी इत्यादी इत्यादी संकल्पनांचा आधार घेत  प्रेक्षकांना गृहीत धरणे हे हिंदी प्रेक्षकांसाठी नवीन नाही पण सुरज बडजात्या सारख्या प्रथितयश (!!!!!!) लेखक-दिग्दर्शकाने प्रेक्षकांना मूर्ख समजण्या इतपत कमतरता ठेवाव्यात याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. जास्त नाही आपण एकंच छोट  उदाहरण घेऊ एक राजाच्या कुटुंबातल्या आंतरिक बाबी भलेही बाहेरचा व्यक्ती राजवाड्यात त्यांचा आत्मज म्हणून शिरला तरीही इतक्या सहजा-सहजी बाहेरपर्यंत झिरपाव्यात?? बाकी प्रसंग हि सांगता येतील गृहीत धरल्याचे पण आधीची पुण्याई बघता इतकच सध्या पुरे बाकी बघणाऱ्या प्रेक्षकांनी आपापले ठरवावे.

आलोक नाथ हा सुरज बडजात्याचा लकी चार्म वाटायचा मला कारण त्याच्या गाजलेल्या प्रत्येक सिनेमात तो एक महत्वपूर्ण भूमिकेत होता."मै प्रेम कि दिवानी हु" मध्ये नव्हता आणि असा सिनेमा होता हे कोणाला आठवते का या प्रश्नाच्या उत्तरातच मला असे का वाटते याचे उत्तर आहे का?? या सिनेमातही आलोक नाथ नाही !!!! वास्तविक बघता अनुपम खेरच्या जागी त्याला बसवता आल असत पण.........

मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर आहे पण तिला प्रोमोसाठी वापरलेल्या गाण्यात कंबर हलवणे सोडून इतर काही महत्व नाही. सहाय्यक भूमिकेत नील नितीन मुकेशहि आहे पण त्याला तोंडी लावण्यापुरतेही महत्व नाही.
२००६ सालच्या विवाह मध्ये स्व.रवींद्र जैन यांचा म्हणजेच एका मेन स्ट्रीम चित्रपट क्षेत्रात नवीन संगीतकाराचा  वापर करून त्यांनी दिलेल्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी करून दाखवल्या नंतर सुरज बडजात्याची हिंमत वाढली अन या वेळेस त्याने संगीतासाठी चक्क  हिमेश रेशमियाचा वापर केला. पण ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा कितीही फुगला तरी कसोटीत त्रिशतक मारू शकेल का?? यातच जाणकारांना रेशमिया महाशयांना वापरणे योग्य कि अयोग्य  समजून जायला हवे. 

चित्रपटाला मी अर्धा स्टार देईन अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी आणि दिग्दर्शकाच्या पूर्वपुण्याईसाठी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

तलवार


२००८ सालच्या आरुषी तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना गुलजार या घेऊन आल्या आहेत "तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय कहाणी म्हणजे “तलवार”.
सध्या निकाल लागलेल्या त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते.   जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल? इत्यादी थिअरिजला स्पर्श करत सरते शेवटी CBI या तपाससंस्थेतील अंतर्गत राजकारणात/लाथाळ्यात तिच्या आई-वडिलांना झालेली शिक्षा हि निर्दोष असूनही झाली होती/आहे असे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतपत डिटेल समीक्षण करते. त्यासाठी लेखक विशाल भारद्वाजचे आणि दिग्दर्शक मेघना गुलजारचे खरोखर कौतुक.
या कहाणीच्या आत थोडक्यात शिरताना भारतीय नोकरशाहीत अंतर्गत राजकारण किती खोलवर रुजलेले आहे कि ते असल्या मोठमोठ्या प्रकरणांच्या कोर्टाच्या निकालावर तपासाद्वारे प्रभाव टाकू शकते हे दिसून येते. लेखक विशाल भारद्वाजने भारतीय नोकरशाहीवर कोणतीही टिकाटिप्पणी करण्याचे टाळून माझ्यामते कहाणीला भरकटण्यापासून वाचवलेले आहे. आरुषीच्या निकालावर कोणतीही थेट टिप्पणी न करता कहाणी पूर्णपणे त्या तपासाभोवती फिरते आणि शेवटी फक्त निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रेक्षकांना ठरवण्यास बाध्य करते. भारतीय नोकरशाहीत राजकारण आहे पण ते असे दृष्टीकोनात्मक पद्धतीने सीबीआय सारख्या तपास संस्थेत प्रभाव टाकत असेल हे खरोखर धक्कादायक आहे.

इरफान खान हा पोलिस अधिकारी अश्विन कुमार आणि नीरज काबी हा रमेश टंडन पक्षी आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांच्या भूमिकेत आहेत. कोंकणा सेन-शर्मा हि आरुषी उर्फ श्रुती टंडन (सिनेमात) हिच्या आईच्या भूमिकेत आहे. इरफान खान आणि नीरज काबी हे उत्कृष्टरित्या आपापल्या भूमिकांना वठवतात कारण सिनेमा पूर्णवेळ या दोघांभोवतीच फिरतो.
मेघना गुलजारचे कौतुक करावेच लागेल कारण ती विशाल भारद्वाज सोबत सहपटकथा लेखिकाही आहे आणि कहाणी कुठेही संथ बनून प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी तिने लेखक सोबतीने घेतलेली पदोपदी जाणवते. आरुषीच्या मृत्यूसंदर्भात दुसरी थियरी मांडताना म्हणजे ज्यामुळे डॉ राजेश तलवारला शिक्षा झाली ते विषद करताना कहाणी वरील पकड सुटण्याची पूर्ण संधी होती. पण त्या मुळ कारणाला विषद करणारी जी मिटिंग असते त्यात (धर्मप्रचारक) विनोद पेरणी करून त्या विनोदाखाली ते कारण तिने व्यवस्थित हाताळल आहे.   
आरुषी प्रकरण मीडियानेच मोठे केले होते २००८ साली आणि ऑनर किलिंगचा मुलामा देऊन वाढवले होते पण चित्रपटात विषद केलेली दुसरी थियरी देखील शक्य होती आणि कदाचित खरीही असू शकते. आरुषीची कहाणी चित्रपट रुपात प्रेक्षकांसमोर आली म्हणजे भविष्यात सध्या गाजणारे शिना बोरा प्रकरण हि भविष्यात येइलच याची खात्री वाटते.

मी चित्रपटाला विशाल भारद्वाजची कथा/पटकथा आणि मेघना गुलजार चे दिग्दर्शन यांच्या उत्कृष्टतेसाठी मुख्यत्वे तीन ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

मराठी - दगडी चाळ





मराठी-दगडी चाळ

"दगडी चाळ" या दोन शब्दांनी सगळ्यात आधी काय आठवते? तर मुंबईतला राजकारणी बनलेला डॉन अरुण गवळी अन त्याच्या कारवाया. कारण दगडी चाळ हा मुंबईतला भायखळा भागातला भाग हा त्याचा अड्डा किंवा घर होते कैक काळ. त्यामुळे दिग्दर्शकाने कितीही स्पष्ट पाटी दिली (सुरु होण्या आधी) तरी चित्रपटाच्या नावावरून आणि एका मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आणि बाकी डीटेल्स वरून प्रेक्षकांना काय तो अंदाज लागतोच.

दगडी चाळ आणि १९९६च्या आसपास असलेली तिथली मुंबईतली दहशत अन या दहशतीखाली फुलणारे प्रेम या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे दगडी चाळ.   

अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे नायक व नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत आणि मकरंद देशपांडे हे डॅडी उर्फ अरुण गवळी च्या भूमिकेत आहेत.मकरंद देशपांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या दगडी चाळ मधला डॉन डॅडी उभा केलेला आहे. त्यात राजकारणात घुसल्यामुळे कि काय पण अरुण गवळी च्या इमेजला धक्का न लावता त्याला थोडं उच्च पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अगदीच त्याचे निर्दोष असणे सिद्ध करणे हा हेतू नसला तरी त्याच्या प्रतिमेला उंचावणे हा हेतू आहे आणि मकरंदजी यात दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरेपूर उतरतात. पूजा सावंत हिच्या "सोनल" या भूमिकेचा उल्लेख करावाच लागेल कारण तिने उत्तम रित्या सगळी जबाबदारी निभावलेली आहे.
चंद्रकांत कणसे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवीन वाटताहेत कारण या आधी त्यांचे नाव मी तरी कधीच ऐकले नाही. त्यांचा हेतू अरुण गवळी यांची प्रतिमा उंचावणे अन जमल्यास प्रेक्षकांचे मनोरंजनहि करावे असा सीमित जाणवतो बर्याच प्रसंगात.

अमित राज यांचे संगीत चित्रपटाला असून अजय ताम्हाणे आणि प्रविण कमले यांची गीते आहेत. गाणे सगळे ठीक आहेत पण "धागा धागा" या हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख हा करावाच लागेल कारण ते गाणे शब्दश: अप्रतिम आहे. पूजा सावंत हिचे त्या  गाण्यातले सौंदर्य लक्षवेधक आहे.

मोरया मोरया हे सुरवातीचे गाणेही उत्तम असले तरी धागा धागा च्या सुरवातीच्या दोन ओळींचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर बर्याच ठिकाणी वापर आहे. कदाचित त्यामुळेच ते गाणे आपोआप लक्षात राहते प्रेक्षकांना.

मराठी सिनेमा अगदी डॉनची कहाणी वगेरे असला तरी "प्रेम" या कल्पनेपासून सुटलेला नाही. पण कहाणीत अजिबात टिकलेला नाही अभिनयाने तरला असला तरी मुळ कहाणीच  ठिसूळ असल्यामुळे काय बोलणार? त्यामुळे मी या चित्रपटाला मला पूजा सावंत बेहद्द आवडते म्हणून केवळ तिच्या प्रयत्नासाठी १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर     

किस किस को प्यार करू (?)

किस किस को प्यार करू (?)

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

पुन्हा सही रे सही (नाटक)

पुन्हा सही रे सही (नाटक)

मराठी नाटक म्हणजे काय अन ते उत्कृष्ट कसे असतात हे समजून घेण्यासाठी कमीत कमी एकदा तरी रसिकांनी बघावे असे एक नाटक म्हणजे "पुन्हा सही रे सही". या आधी सुयोग निर्मित अन केदार शिंदे लिखित/दिग्दर्शित असे हे नाटक होत पण आता टायटल बदलल "पुन्हा सही रे सही " झाल अन दिग्दर्शक तोच पण निर्माता बदलला. सौ सरिता भरत जाधव या निर्मात्या बनल्या असून त्या आता हे नाटक भरत जाधव इंटरटेनमेंट या banner खाली हे नाटक निर्मित करतात.
कोणत्याही नाटकात सिनेमासारखा डबल रोल शक्य असतो?? उत्तर आहे होय आणि दोन नाही तर दिग्दर्शकाच्या शक्कलेला अभिनेत्याच्या समर्पकतेचि जोड जर मिळाली तर एक दोन नव्हे तर चक्क चार - चार भूमिका एकच अभिनेता एकाच नाटकात उभ्या करू शकतो.

कहाणी:
मदन सुखात्मे या एका श्रीमंत उद्योगपतीच्या इस्टेटीच्या हास्यात्मक ढंगाने झालेल्या किंवा होत असलेल्या वाटण्या म्हणजे पुन्हा सही रे सही.

अभिनय:
भरत जाधव यांनी या नाटकात (मदन सुखात्मे,रंगा, हरी आणि गलगले) या चार भूमिका केलेल्या आहेत. या चार भूमिका करताना प्रत्येक भूमिकेत स्टेजवर येण्याचे टायमिंग, भूमिकेचे रंगमंचावरील विशिष्ट दार आणि प्रत्येक भूमिकेला समकक्ष सहाय्यक अभिनेत्यांशी हास्यात्मक किंवा व्यंगात्मक संवाद यांचे टायमिंग हे ज्या सहजतेने भरत जाधवला साधते ते शब्दश: अफलातूनच.मदन सुखात्मे याच्या पहिल्या भूमिकेने प्रवेश, मग हरी, रंगा आणि गलगले यांचे कहाणीतले आगमन आणि सरतेशेवटी मदन सुखात्मेने येउन केलेला शेवट या सगळ्या भूमिकांत भरत जाधव प्रेक्षकांना खिळवून टाकतो खुर्चीवर.

दिग्दर्शन:
केदार शिंदे हे या नाटकाचे दिग्दर्शक. सुयोग तर्फे जेंव्हा हे निर्मित व्हायचं तेंव्हा देखील हेच होते आणि आताही हेच आहेत. केदार शिंदेनी या नाटकात बर्याच कल्पनांना effectively वापरलेलं आहे. उदाहरणार्थ चारही भूमिकातून भरत जाधवच्या संबंधित भूमिकेचे आगमन रंगमंचावर होताच इतर भूमिकावाल्या रंगमंचावरील प्रकाशयोजना थांबवणे जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष जिथे पाहिजे तिथेच वेधल्या जाईल, भारतच्या चारपैकी तीन भूमिकांना repeatative डायलॉगज देणे इत्यादी इत्यादी. मान्य असो व नसो पण या नाटकाच्या यशात एका दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीचे श्रेय निर्विवादपणे आहेच.

अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या या अप्रतिम नाटकाला मी बापडा काय रेटिंग देणार? पण फक्त पाचपैकी पाच ५* देण्याची माझी हौस मात्र मी भागवून घेईन म्हणतो.

-समीर

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

तू हि रे (मराठी)


तू हि रे (मराठी)
मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक.
कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.
अभिनय:
मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.
दिग्दर्शन:
संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की.
संगीत आणि गीतकार:
मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे.
मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर