शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

मराठी - दगडी चाळ





मराठी-दगडी चाळ

"दगडी चाळ" या दोन शब्दांनी सगळ्यात आधी काय आठवते? तर मुंबईतला राजकारणी बनलेला डॉन अरुण गवळी अन त्याच्या कारवाया. कारण दगडी चाळ हा मुंबईतला भायखळा भागातला भाग हा त्याचा अड्डा किंवा घर होते कैक काळ. त्यामुळे दिग्दर्शकाने कितीही स्पष्ट पाटी दिली (सुरु होण्या आधी) तरी चित्रपटाच्या नावावरून आणि एका मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आणि बाकी डीटेल्स वरून प्रेक्षकांना काय तो अंदाज लागतोच.

दगडी चाळ आणि १९९६च्या आसपास असलेली तिथली मुंबईतली दहशत अन या दहशतीखाली फुलणारे प्रेम या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे दगडी चाळ.   

अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे नायक व नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत आणि मकरंद देशपांडे हे डॅडी उर्फ अरुण गवळी च्या भूमिकेत आहेत.मकरंद देशपांडे यांनी अगदी अप्रतिम रित्या दगडी चाळ मधला डॉन डॅडी उभा केलेला आहे. त्यात राजकारणात घुसल्यामुळे कि काय पण अरुण गवळी च्या इमेजला धक्का न लावता त्याला थोडं उच्च पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अगदीच त्याचे निर्दोष असणे सिद्ध करणे हा हेतू नसला तरी त्याच्या प्रतिमेला उंचावणे हा हेतू आहे आणि मकरंदजी यात दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरेपूर उतरतात. पूजा सावंत हिच्या "सोनल" या भूमिकेचा उल्लेख करावाच लागेल कारण तिने उत्तम रित्या सगळी जबाबदारी निभावलेली आहे.
चंद्रकांत कणसे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवीन वाटताहेत कारण या आधी त्यांचे नाव मी तरी कधीच ऐकले नाही. त्यांचा हेतू अरुण गवळी यांची प्रतिमा उंचावणे अन जमल्यास प्रेक्षकांचे मनोरंजनहि करावे असा सीमित जाणवतो बर्याच प्रसंगात.

अमित राज यांचे संगीत चित्रपटाला असून अजय ताम्हाणे आणि प्रविण कमले यांची गीते आहेत. गाणे सगळे ठीक आहेत पण "धागा धागा" या हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख हा करावाच लागेल कारण ते गाणे शब्दश: अप्रतिम आहे. पूजा सावंत हिचे त्या  गाण्यातले सौंदर्य लक्षवेधक आहे.

मोरया मोरया हे सुरवातीचे गाणेही उत्तम असले तरी धागा धागा च्या सुरवातीच्या दोन ओळींचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर बर्याच ठिकाणी वापर आहे. कदाचित त्यामुळेच ते गाणे आपोआप लक्षात राहते प्रेक्षकांना.

मराठी सिनेमा अगदी डॉनची कहाणी वगेरे असला तरी "प्रेम" या कल्पनेपासून सुटलेला नाही. पण कहाणीत अजिबात टिकलेला नाही अभिनयाने तरला असला तरी मुळ कहाणीच  ठिसूळ असल्यामुळे काय बोलणार? त्यामुळे मी या चित्रपटाला मला पूजा सावंत बेहद्द आवडते म्हणून केवळ तिच्या प्रयत्नासाठी १* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर     

२ टिप्पण्या: