शनिवार, २३ जुलै, २०१६

कबाली

दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली  हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही.

साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते. पण लिंगा किंवा शिवाजी सारखी कहाणीची विशेष पातळी गाठणे लेखक/दिग्दर्शक प रणजित याना जमलेले नाही हे नक्की. आपला हिंदी कहाणी लेखक असता तर मलेशियातील स्थायिक भारतीयांच्या व्यथा/ चिनी घुसखोरीमुळे त्यांना मलेशियात होणारा त्रास\नायकाची प्रेमकहाणी\ त्याचा जीवनातील संघर्ष इत्यादी इत्यादी इत्यादी बाबीना एकमेकांत गुंतवत चार ते पाच हिंदी चित्रपटांच्या कहाण्या तयार होतील अशी कहाणी बनली असती. पण "सब कुछ रजनीकांत" हि कहाणी साकारणे जमले नसते.

सुपरस्टार रजनीकांत हा कबालीश्वरन या डॉन च्या मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक हे फक्त त्याला बघण्यासाठीच गर्दी करणार याचा अंदाज आधीच असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत अति-महत्व आहे. साधीशी गोष्ट सिनेमाच्या पहिल्याच पंधरा मिनिटात 25 वर्षे तुरुंगात घालवून तो बाहेर येतो अन या बाहेर येण्यात त्याचे जे स्वागत त्याच्या मंडळींकडून होते ते स्वागत अन त्याचे पार्श्वसंगीत याची पातळी  अतिशय उच्चं असल्याचे बाकी चित्रपटभर बघताना जाणवून जाते. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्याची नायकाची भूमिका\प्रेम वगैरे करण्याची इच्छा असेल असे मला तरी वाटत नाही पण चाहत्यांच्या आग्रहाखातर तो करत असावा आणि या हि वयात तो बरोबरीच्या इतरांना पुरून उरतो हे जगाला आपोआप जाणवत असेल. चिनी अभिनेत्यांसोबतची त्याची जुगलबंदी, या वयातीलहि फिजिकल फिटनेस वगैरे कौतुक त्याच्या बद्दल आहेच. त्याच्या वयाचा उल्लेख करण्यामागे त्याचा फिजिकल फिटनेस आणि सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेय नामावलीत त्याचा उल्लेख "पदमविभूषण रजनीकांत" असं होतो हे मला विशेष वाटलं. आपली मराठमोळी राधिका आपटे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे पण जेवायला बसल्यावर भात-भाजी-पोळी असा सगळा जामानिमा ताटात असल्यावर कितीही व्यवस्थित कापलेला कांदा दिला तरी कुणी जेवल्यानंतर "किती सुंदर कापला कांदा" असा उल्लेख करतो का?? आणखी काय बोलावे!!!   

प रणजित यांचे दिग्दर्शन कबालीचे आहे. लिंगा किंवा गेला बाजार शिवाजी मध्ये राजनीकांतची ची की "लार्जर दॅन लाईफ" इमेज होती तशी इमेज निर्माण करण्यात कबाली कमी पडतो हे मात्र जाणवते. भलेही कहाणीला इतक्या विविध कोनांनी फिरवत प्रयत्न तसा केला असेल हे जाणवते पण तो प्रयत्न कमी पडतो हे मात्र नक्की. पण एक दिग्दर्शक हाच जेंव्हा लेखक असतो आणि कहाणीत नायकालाच महत्व द्यायचे आहे हि requirement त्याला अन निर्मात्याला क्लियर असते तेंव्हाच असे होत असावे. संतोष नारायणन यांचे संगीत कबालीचे आहे. दक्षिण भारतीय पद्धतीचे तीन किंवा चार गाणे आहेत पण या गाण्यांपेक्षा त्यांनी पार्श्वसंगीतात कमाल केलेली आहे. जिथे, जसे, जितके पाहिजे तसेच पार्श्वसंगीत आहे.

सुपरस्टार रजनीकांत हा एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून लोकांना आवडतच असेल. जर तीनही तास पडद्यावर कहाणी वगैरे इतर क्षुल्लक गोष्टींना नोटीस न करता त्याला बघण्याची तयारी असेल, तर तुमच्यासाठीच हा चित्रपट आहे.  मी माझ्यातर्फे कबालीला 2* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर 

शनिवार, ९ जुलै, २०१६

सुलतान

सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी  पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण  सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय?? शंकास्पद बाब आहे कारण मी जो शो बघितला त्या माझ्या दुपारच्या शोला जवळपास 70% खुर्च्या रिकाम्या होत्या.


सुलतान अली खान (सुपरस्टार सलमान खान) आणि आरफा (अनुष्का शर्मा) या दोन्ही कुस्तीपटूंच्या प्रेमाची घडलेली\बी-घडलेली आणि शेवटी पूर्ण झालेली कहाणी म्हणजे सुलतान.

सुपरस्टार सलमान खान हा कुस्तीपटू- रेसलर अश्या भूमिकेत आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ज्या शिताफीने त्याने दोन्ही भूमिका त्यातल्या विविधांगी कंगोऱ्यांसकट निभावून नेल्यात त्याला तोड नाही. कितीही चांगला दिग्दर्शक असता आणि समजा तुषार कपूर सुलतान खान असता तर......जस्ट इमॅजिन!!! सलमान ने खरोखर खूप मेहनत घेतल्याचे जाणवते बरेचदा विशेष करून क्लायमॅक्स ला. 
अनुष्का शर्मा(आरफा) या महिला कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. सलमान खानच्या भूमिकेसमोर तिची भूमिका मुख्य अभिनेत्री असूनही आपोआप एक सहाय्यक अभिनेत्री इतकी मर्यादित होते. रणदीप हुडा काही काळ सहाय्यक भूमिकेतून दर्शन देतो आणि छोटीशी भूमिका असली तरी तिची नोंद घ्यायला भाग पडतो.

अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कहाणी लेखक. आणि आदित्य चोप्रा बरोबर सहपटकथा लेखकही. आणि सांगण्यास समाधान की त्यांनी कुठेही आपल्या कर्तव्यात कसूर केलेली नाही. तसे पाहता सुलतानचा रेसलिंग क्लायमॅक्स हा सलमान ने कितीही मेहनत घेतली असती आणि दिग्दर्शक अननुभवी-कन्फ्युज्ड असता तर त्या मुख्य सीनची वाट लागली असती. पण त्यांनी सगळे व्यवस्थित निभावून नेले.  

विशाल-शेखर या जोडगोळीने संगीत सुलतानला आहे.  संगीतही अगदी उत्कृष्ट वगैरे नसले तरी अगदीच टाकाऊ कॅटेगोरीतही येत नाही. उलट ज्या शिताफीने सुलतान चा टायटल ट्रॅक आणि सच्ची-मुच्ची या दोन गाण्यांचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर वापर आहे ते निश्चितच  कौतुकास्पद आहे. आणि एक महत्वाचे सुरवातीलाच सलमान खानच्या एंट्रीला जे पार्श्वसंगीत आहे, काही सेकंदच, पण त्यासाठी विशेष कौतुक. कारण सलमानच्या एंट्रीलाच जर त्या भूमिकेची छाप पडली नसती तर पुढे जे इम्प्रेशन क्लायमॅक्स मुले क्रिएट होते त्यात फरक पडला असता हे नक्की

सलमान च्या चित्रपटांत तोच असतो डोळ्यांसमोर तीनही तास, दबंग 1-2, रेडी, वॉन्टेड, किक, बजरंगी भाईजान हे काही ठळक उदाहरणे, कहाणी काहीही असो पण पडद्यावर पूर्णवेळ तोच असतो आणि या परंपरेला सुलतान अपेक्षेप्रमाणे पुढे नेतो, अर्थात इथे कहाणीच तशी होती म्हणा पण तरीही ........ 
सुपरस्टार सलमान खान खरोखरच कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी अभिनयाच्या दृष्टीने सुलतान मध्ये करून गेलाय. त्याचा धर्म - पूर्वायुष्यातील त्याच्या चुका - त्याचा प्रेमभंग इत्यादी इत्यादी पूर्वग्रह आधी करून घेतलेला असेल तर हा चित्रपट बघणाऱ्यांसाठी नाही. मान्य की एक व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल व्यक्ती-दरव्यक्ती प्रेक्षकांचे मत बदलेल पण तरीही कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता जर हा चित्रपट बघितलात तर आवडण्याचीही दाट शक्यता आहे.  बाकी डिटेल्स बाजूला ठेवू पण ज्या तन्मयतेने त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी कुस्तीपटू-रेसलर उभा केलेला आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच त्याच्या जाणवणाऱ्या प्रचंड मेहनतीसाठी मी  माझ्यातर्फे सुलतानाला   पाच पैकी चार  (4*) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर    

रविवार, २९ मे, २०१६

लाल इश्क (मराठी)

प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय?? उत्तर आहे होय, जर अनुभव गाठीशी असेल तर बाहेरच्या भाषेतील निर्माताही मराठीत येउन व्यवस्थित सगळं manage करू शकतो........



एक अभिनेता आणि त्याची आधीची अर्धवट प्रेमकथा आणि कथेत दुसर्या नायिकेचे आगमन आणि या दोन्ही प्रेमकथांचा वेगवेगळा अन शेवटी एकत्र शेवट अशी एक वेगळीच  कहाणी चित्रपटात बघायला मिळते.कहाणीची सुरवातच इतकी जोरदार कि खून अन त्याचा शोध घेणारा पोलिस अधिकारी. मग हि कथा प्रेमकहाणी भोवती दोन कोनानी फिरल्यावर सरतेशेवटी त्या खुनाचा झालेला उलगडा. वास्तविक बघता या कहाणीला दोन नायिका असूनही एक थ्रिलर कहाणी म्हणून मोजणे जास्त संयुक्तिक ठरेल !! पण तरीही पूर्णत: थ्रिलर म्हणता येणार नाही कारण कथेची विविधांगी उठाठेव. खून-खुनाचा हेतू-खुनाची प्रक्रिया-खुनाचा शोध अन खुनाचा उलगडा अन शेवटच्या काही मिनिटात समजलेले खुनाचे कारण असल्या विविध कोनानी फिरणारी कहाणी आपण थ्रिलर या संकल्पनेतच मांडायला हवी.ते काहीही असो एका बाहेरच्या निर्मात्याने मराठीत येउन एक छानशी कहाणी उत्कृष्टरीत्या सादर केलेली आहे.

सुपरस्टार स्वप्नील जोशीने साकारलेला चित्रपट अभिनेता यश पटवर्धन आणि दोन नायिका १. अंजना सुखानी आणि समिधा गुरु आणि सोबतच जयंत वाडकर एका महत्वाच्या भूमिकेत/खलनायकाच्या भूमिकेत. स्वप्नील जोशीने आजवर एक romantic मराठी हिरो अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे पण त्याच्या romantic नसलेल्या अभिनय क्षमतेला वाव देणारी कलाकृती म्हणून भविष्यात लाल इश्क चे नाव घेतले जाइल. अंजना सुखानी हि हिंदी अभिनेत्री खरे पाहता पण मराठीची तयारी तिच्याकडून दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी चांगली करवून घेतलेली आहे हे बरेचदा जाणवते. पण हशा पिकावते समिधा गुरु तिच्या "बाबू" संबोधण्याच्या पद्धतीने. हे "बाबू" संबोधन इनक्लुड कार्यासाठी दिग्दर्शकाचा हेतू काहीही असो पण झालंय ते हास्यास्पद. दोन्ही अभिनेत्र्यांच्या अभिनयातील कमतरतेबद्दल बरेच विशद करता येईल पण सध्या त्यांचे सौंदर्य अन स्वप्नील  जोशीचा अभिनय हीच अभिनयाची खासियत.

एक मराठी सिनेमा, एक त्रिकोणी  प्रेमकथा आणि उल्लेखनीय  नसलेले संगीत अशी एक कथा म्हणजे लाल इश्क. दोनच गाणे आणि त्यातीलही "चांद मातला" हे जरा सुश्राव्य गाणे आणि बाकी सगळाच  ठणठणगोपाळ. अर्थात तशी कथेचीच मागणी त्यामुळे सुसह्य

संजय लीला भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्य दिव्य सेट्स-वजनदार संवाद-उत्तम संगीत आणि शानदार पटकथा असे एक इम्प्रेशन त्याने सोडलेले आहे. पण यावेळेस सगळे व्यवस्थित जुळून आलेले  असले तरी संगीताची अनुपस्थिती आणि मंदावलेली पटकथा याने बोर्या वाजवलेला आहे. मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

शनिवार, ७ मे, २०१६

सैराट

मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच. त्यामुळे बाकी सगळे जाऊ द्या पण लेखक-दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजुळेंचे त्यासाठी विशेष अभिनंदन.



नागराज मंजुळेंचा सिनेमा म्हणजे थोडाफार "आर्ट फिल्म" संकल्पनेकडे असलेली कहाणी अशी सर्वसाधारण रसिकांची मानसिकता त्यांनी बनवून ठेवलेली आहे. पिस्तुल्या अन fandry हे त्यांचे आजवरचे दोनच चित्रपट पण या संकल्पनेकडे वळणारे.पण प्रेम या संकल्पनेला घेऊन शेवट सोडून इतर कुठेही फारसा आर्ट फिल्मकडे न वळणारा एक चित्रपट आपण बनवू अशी कल्पना त्यांना तरी असेल का? देव जाणे!!  पण बनवला खरा. 

आर्ची अन परश्या हि एक टीनेजर जोडी. त्यांचे घडलेले प्रेम अन झालेला दु:खांत अशी कहाणी सैराट मध्ये आहे. सोशल साईट्सवर मी या कहाणीचा जातीशी वगेरे संबंध असून त्याच्याशी संबंधित खूप इंटरेस्टिंग चर्चा बघितल्या. पण चित्रपट प्रत्यक्ष बघितल्यावर समजल कि सैराट मध्ये कोणताही प्रत्यक्ष उल्लेख नाही. जो आहे तो इतका अप्रत्यक्ष आहे कि तुम्ही जोडूही शकता किंवा दुर्लक्षितहि करू शकता. पूर्णपणे बघणार्याच्या मानसिकतेवर अवलंबून. पण एक लहानसा स्कोप मात्र मंजुळेंनी सोडलेला आहे. पण माझ्या मते तसा कोणताही प्रत्यक्ष आक्षेपार्ह उल्लेख नाही.

आणखी एक महत्वाचं, आजपर्यंत मी बघितलेली कोणत्याही सिनेमाची एक सगळ्यात वेगवान कथा-पटकथा म्हणजे सैराट. पटकथेचा वेगळा साचा हाताळताना पकड सुटून भंगलेली कहाणी याचे संदर्भ पैश्याला पसाभर उपलब्ध आहेत. पण यशराज फिल्म्स किंवा धर्मा प्रोडक्शन्स यांना टक्कर देणारी जबरदस्त कथा-पटकथा अन ती हि मराठीत हे एक दुर्मिळ कॉम्बिनेशन निर्माण करण्यात नागराज मंजुळे अपेक्षेबाहेर यशस्वी झालेत हे नक्की. कथेचा वेग इतका जोरदार कि फक्त मध्यंतरापर्यंतच्या सैराट इतक्या कथेवर दोन किंवा तीन मराठी सिनेमे आणि चक्क एक हिंदी सिनेमा निघू शकला असता. तरीही  मध्यंतरा नंतरची कथेची महत्वाची बाजू आपण विचारात घेतलेली नाही हे येथे उल्लेखनीय. या प्रचंड वेगाच्या  धबधब्याला सावरताना, कोठेही एक मराठी प्रेक्षक जो मुळात बारीक चिरफाड करत कोणताही  सिनेमा बघतो, आपला इंटरेस्ट गमावणार नाही हि काळजी घेणे म्हणजे एक प्रचंड मोठे दिव्य. पण नागराज मंजुळे ते करून दाखवतात. या साठी त्यांचे खरोखर विशेष अभिनंदन.

नागराज मंजुळे हेच कथा-पटकथा लेखक-दिग्दर्शक अन झी Talkies बरोबर निर्मातेपण. थोडक्यात एक ऑल-इन-वन package. आज सिनेमा चालतोय म्हणून ठीकाय पण जर नीट बनला नसता तर त्यांचे जीणे हराम होईल इतकी टीका त्यावर झाली असती. सध्या उत्कृष्ट सिमेमावरच होत असलेली चर्चा अन त्या चर्चेतील सूर बघता असा अंदाज लावायला हरकत नसावी. याची त्यांना कल्पना नसेल असे मला वाटत नाही पण तरीही त्यांनी हि कलाकृती उभारली आणि मुख्य म्हणजे यशस्वीपणे पेलून दाखवली.त्यांचा मुळचा पिंड आर्ट फिल्मकडे वळणारा त्यामुळे त्यांनी स्वभावाप्रमाणे दु:खांत ठेवला. आपल्या सगळे गुडी गुडी बघण्याची सवय त्यामुळे तो दु:खांत खुपतो पण तोच कदाचित माउथ-टू-माउथ पब्लिसिटी साली प्रेरक असेल का?? भलेही या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येईल पण तरीही या दु:खांता मुळे निगेटिव्ह पब्लिसिटी मात्र होत नाहीये आजघडीला हे तिकीटबारीने दाखवून दिलेले आहे.
रिंकू राजगुरू (अर्चना पाटील-आर्ची) आणि आकाश ठोसर (प्रशांत काळे-परश्या) या दोघांची हि प्रेमकहाणी. त्यातही रिंकू राजगुरू हिची अभिनय क्षमता हि उत्कृष्ट कि काय (!!) हे कदाचित दिग्दर्शकाने आधी ओळखल्यामुळे असेल पण हि पूर्ण वेगवान पटकथा तिच्या भूमिके भोवती फिरते. नागराज मंजुळे यांचे या मुळच्या कास्टिंग साठीही विशेष अभिनंदन कारण मुख्य दोन्ही व्यक्तिरेखांचे कास्टिंग त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे घडवून आणलेले आहे. कास्टिंग डायरेक्टर वेगळा असणे हि चैन एका मराठी सिनेमाला परवडत नसावी असा माझा अंदाज आहे पण मुख्य दिग्दर्शक म्हणून या बेमालूम कास्टिंगचे श्रेय निर्विवादपणे नागराज मंजुळेंचेच. बाकीहि भूमिका आहेत, पर्श्याचा गोतावळा - आर्चीचा गोतावळा, पण इतकी वेगवान पटकथा 8५% सीन्समध्ये आर्चिसभोवताल फिरते आणि तिला मिळालेला "विशेष दखल अभिनयासाठी" हा  राष्ट्रीय पुरस्कार योग्य असल्याचे आर्ची सिद्ध करून दाखवते. 

अजय-अतुल या शब्दश: "महान" संगीतकार जोडगोळीचे संगीत हे सैराटचे मुख्य यश. तीन किंवा चारच  मुख्य गाणे पण ज्या ताकदीने त्या गाण्यांचा चित्रपटातील वापर आहे तो प्रेक्षकांना बांधून ठेवतो अन गुंतवून ठेवतो.  हि बाब मराठीत दुर्मिळ आणि म्हणूनच अनुभवण्यासारखी. त्यातही याच जोडीचे background music  म्हणजेच पार्श्वसंगीत. पण तेथेही त्यांची महान संगीत क्षमता ते प्रेक्षकांना जाणवून देतात. बाकी जाऊ देऊ पण परश्या-आर्चीची जी पहिली भेट होते तेथे आपला आजवरचा चित्रपटांचा अनुभव आपल्याला एखादं गाणं असेल असा अंदाज लावू देतो पण गाणे नाही आणि पार्श्वसंगीतासाठीचे जे कडवे आहे ते फिट्ट बसते\शोभते प्रसंगाला. अजय-अतुल हेच दोघे या सगळ्या गाण्यांचे लेखक. सगळ्या गाण्यांसाठी कौतुक पण "झिंगाट" साठी विशेष कौतुक. झिंगाट गाण्याचं कथेतील जे स्थान आहे ते महत्वाचे आहे कारण या गाण्यानंतर आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीला वेगळे वळण लागते किंवा ओहोटी लागते असे म्हणू पण हे गाणे जर जमले नसते तर काही खरं नव्हतं.  पण हि शक्यता तर दूरच इतके जबरदस्त गाणे कि कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दहा गाण्यात भविष्यात मोजले जाईल हि शक्यता निर्माण करून जाते हे गाणे. 

चांगले चित्रपट मराठीत बनतच नाही, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पगडा असलेला विनोदी काळ सोडून चित्रपट निर्माते बाहेरच पडत नाही वगेरे वगेरे असंख्य कारणे मी वेगवेळ्या चर्च्यानमध्ये बघितलेली आहेत. "कट्यार काळजात घुसली", " नटसम्राट" आणि आता "सैराट" नंतर या चर्च्याना एक पॉजीटिव्ह वळण लागेल अशी अशा बाळगतो आणि माझ्यातर्फे सैराटला पूर्ण पाच पैकी पाच (५ * ) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर  

रविवार, २० मार्च, २०१६

इच्छा नि आवश्यकता



"आवश्यकता" हा जीवनाचा न टाळण्याजोगा भाग
त्या देर-सवेर पुर्ण होतातच
काळानुसार  कधी ना कधी
त्या पुर्ण होण्यासाठी पळवाट मिळवतातच

खरा प्रश्न हा असतो कि
इच्छांना महत्व द्यावे कि आवश्यकताना??
दोघींचेही एकमेकांशी सख्य
पण नशिबाचा कस लागतो प्रत्यक्षात उतरताना

आवश्यकता कुणाच्याही शेवटी  पूर्ण होतातच
त्यात काहीही नवल नसते  
पण आवश्यकतांनी  इच्छांच रूप घेतल
आणि मग कुणि लक्ष्य मिळवलं तर मात्र नवल असते

आवश्यकता या  एखाद्या फकीराच्याही असतात
कशाही तो त्या पूर्ण करतोच करतो !!!
आणि इच्छा या एखाद्या राजाच्याही असतातच
त्या साठी तो गाऱ्हाणे  रडतोच रडतो !!!

हाच असेल बहुधा  देवानी नेमलेला
नशिबाचा मुख्य कार्यभाग
सगळ्यांना नेहमीच सगळंच मिळाल
तर देवाने शेवटी कुठे घ्यावा सहभाग

-समीर 

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

England Vs South Africa


आपल्या आय पी एलच्या फायनल सारखा अक्षरश: उत्कंठा शिगेला पोचवणारा 20-20 आंतरराष्ट्रीय सामना आज विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीतच बघायला मिळाला. अर्थात भारतीय पिचचा वाटा असला तरी खेळाडूंचे योगदान दुर्लक्षित करता येणारच नाही. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २३० धावांचा पहाड उभा केला. आणि प्रत्युत्तरात इंग्लंडने डेल स्टेन असलेल्या गोलंदाजांच्या तोफखान्याचा सामना करत लक्ष्य २० षटके व्हायच्या आधीच गाठलं. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या मानसिकतेच प्रदर्शन यातून स्पष्टपणे घडलं असे मला वाटलं. इंग्लंडच्या डावात १७ व्या षटकात मॉरीसला जरा फटका पडल्यावर आफ्रिकन खेळाडू पूर्ण आशा सोडून बसले होते आणि आशा न सोडता प्रयत्न केला असता तर चित्र निश्चितच वेगळं राहिलं असतं. वास्तविक बघता त्यांच्या फिल्डिंगने त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचून दिला. पण त्यांच्या पराभवाला हि खचलेली मानसिकताच शेवटी कारणीभूत ठरली.आजपर्यंतच्या २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसर्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा धावांचा पाठलाग केल्याबद्दल इंग्लंड संघाचे अभिनंदन.
-समीर

मंगळवार, १५ मार्च, २०१६

New Zealand Vs India

New Zealand beat India by 47 runs
still I will appreciate Indian performance for-
1. Captain Dhoni's bold decision to finish Ashwin's quota of all 4 overs before 10th over
2.Captain did not loose his calmness after getting hit for a six to Ashwin on 1st ball of match
3. Jaspreet Bumrah's bowling skill specially his ability to bowl yorkers is exceptional compared to other Indian bowlers
4.In 2007 world cup India loose first match against New Zealand and then went on to win the world cup.
On this positive note, I support Team India.