शनिवार, २० जून, २०१५

ABCD - 2



ABCD - 2 

ABCD म्हणजेच anybody can dance या आपल्याच मागच्या वर्षीच्या गाजलेल्या चित्रपटाच्या पुढचा भाग म्हणजेच सिक्वल घेऊन दिग्दर्शक रेमो डिसुझा आले असून पूर्णत: नवीन कथानक आहे अन पहिल्या भागाशी कथेचा काहीही संबंध नाही. पहिल्या भागातील पात्र हे तसेच दुसर्या भागात वापरण्यात आले असून त्यांची नावं (कथेतील) फक्त बदलण्यात आलेली आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच हा हि चित्रपट पूर्णत: नृत्य आणि त्यातील टेक्नीकॅलिटीला वाहिलेला असून या हि भागात प्रभू देवा हे महत्वाच्या भूमिकेत (मागच्या भागाप्रमाणेच) आहेत. कदाचित पुढचा भाग कमर्शियली टिकण्याच्या दृष्टीने या वेळेस श्रद्धा कपूर अन वरुण धवन हि जोडी मुख्य नायक-नायिकेच्या भूमिकेत आहेत आणि मागच्या भागातील गणेश आचार्य यांचे मुख्य भूमिकेत पात्र नाही.

पहिल्या भागाच्या वेळेस अशी बरीच चर्चा होती कि पूर्णत: नृत्याला वाहिलेला एक चित्रपट हिंदी मुख्य चित्रपटधारेत टिकणार नाही. पण त्या चित्रपटाला जनतेने निर्मात्या/दिग्दर्शकाच्या अपेक्षेबाहेर पसंती दिली. इतकी कि मुख्य नायक नायिकेला घेऊन दुसरा भाग घेऊन येण्याची हिंमत त्यांनी केली. आणि हि हिंमत करण्यात कोठेही कसूर केलेली नाही हे मात्र जाणवून नक्कीच जाते.


कहाणी:
"fictious " हा मुंबईचा नालासोपारा येथील एक डान्स ग्रुप. त्या ग्रुपच्या सत्य घटनेवर आधारित हि कथा असं डिस्क्लेमर सुरवातीलाच मिळते आणि सगळ्यात शेवटी त्यांचे (खरेखुरे) फोटोदेखील टायटल नंतर दिसतात.

एक डान्स ग्रुप जो अमेरिकेपर्यंत जाऊन तेथील नृत्य स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोचतो. हि आणि इतकीच कहाणीची स्टोरीलाइन पण हे execute करताना त्यांनी घेतलेले कष्ट आणि केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा हि झाली डिटेल कहाणी. आता नृत्य हाच मुख्य विषय असल्यामुळे पूर्ण कहाणीत कोठेही त्यावरचा फोकस कमी होत नाही. पण सांगण्यास आनंद कि जरी नृत्य आणि त्यातील टेक्नीकॅलिटी यावर फोकस असला तरी पूर्ण कहाणीत सर्वसामान्य प्रेक्षकाला 'समजल नाही ब्वा' असं कधीच वाटत नाही.

अभिनय:
वरुण धवन आणि `श्रद्धा कपूर यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे कारण नायक-नायिका असूनही या कथेत मुख्य व्यक्तिरेखांनी नृत्यनिपुण असणे हि एक महत्वाची requirement होती. पण सांगण्यात आनंद कि दोघेही समर्थपणे आपापल्या भूमिका निभावतात आणि काही प्रसंगात तर वरुण धवन नृत्यात प्रभू देवाला बरोबरीची टक्कर देतो. या बरोबरच नायक नायिका असल्यामुळे प्रेम हे आहेच. मग आपापल्या भावनांचे प्रदर्शन करण्यात देखील दोघेही यशस्वी झालेले आहेत.Lauren Gottilieb हिचे कौतुक करावेच लागेल. मागील भागातही ती कथेच्या अनुषंगाने एका महत्वाच्या भूमिकेत होती आणि या हि भागात कदाचित तिची नृत्य निपुणता श्रद्धा कपूर पेक्षा जास्त आहे हे ओळखून तिला कथेत श्रद्धा कपूरसोबत रिप्लेस केलेले आहे. कारण काहीही असो पण अप्रतिम डान्स तिचा.दिग्दर्शक/अभिनेते हे मागच्या भागाप्रमाणेच या हि भागात नृत्य शिक्षक किंवा मुख्य कोरिओग्राफरच्या भूमिकेत आहेत आणि शब्दश: समर्थपणे भूमिकेला निभावून नेतात ते.

दिग्दर्शन:
रेमो डिसुझा हे स्वत: एक उत्तम कोरिओग्राफर आहेत. त्यांची नृत्य निपुणता/समज इत्यादी इत्यादी बद्दल कुणाला शंका असण्याचे कारणच नाही. पण तरीही नृत्याला कथेचा अनुषंगाने पूर्ण वाहिलेला एक चित्रपट जेंव्हा तुम्ही काढता तेंव्हा या बेभरवशी बॉलीवूडच्या कमर्शियल दुनियेत तिकीटबारीचाही हिशेब करावाच लागतो आणि हो रेमोलाही चुकलेला नाही. मागील भागात अतिशय अप्रतिमरीत्या execute केलेला शेवटचा डान्स हि खासियत बनून गेली होती. या भागात मागचा जसा डान्स होता तसाच प्रयत्न शेवटच्या डान्समध्ये भारताचा झेंडा आणि एका पात्राला सहनुभूतीद्वारे प्रेक्षकांच्या भावनांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. बरेच प्रसंग त्याने अप्रतिमरीत्या execute करवलेले आहेत उदाहरणार्थ सुरवातीचे वरुण धावांचे अपयश मग त्याचे त्याच्या आईला आठवून खंत नृत्याद्वारे व्यक्त करणे भलेही प्रसंग छोटा असला तरीही सुरवातीलाच असल्यामुळे प्रेक्षकांची पकड घेणारा होता आणि जो चुकला असता तर खर नव्हत काही. पण सांगण्यास आनंद कि जमला.
मागील वर्षी हैप्पी न्यू इयर नावाचा सुपरस्टार शाहरुख खानचा एक चित्रपट होता. ज्याचा कथेचा मुख्य विषय हा हि नृत्यच होता पण फोकस भावभावनावरच पूर्ण होता. टेक्नीकॅलिटीज पूर्णच दुर्लक्षित होत्या. हि देखील कथा बर्याच प्रमाणात त्या चित्रपटाशी मिळती-जुळती पण फोकस जास्त प्रमाणात नृत्य आणि अभिनेत्यांची नृत्य निपुणता यावर. हेच मुख्य अन महत्वाच जर जमल नसत तर कठीण होत. पण जमल.

मला चित्रपट आवडला पण सगळ्यात महत्वाच्या सगळ्यात शेवटचा डान्स इम्प्रेसिव्ह वाटला नाही जो कि असायला हवा होता म्हणून मी चित्रपटला साडे तीन ३(१/२) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .
-समीर 

रविवार, १४ जून, २०१५

ज्युरासिक वर्ल्ड




ज्युरासिक वर्ल्ड 

ज्युरासिक पार्क या स्टीवन स्पीलबर्गच्या चित्रपटाने हॉलीवूड चित्रपट व्यवसाय - तेथील तंत्रज्ञ इत्यादी गोष्टीना जगभर अचाट प्रसिद्धी मिळवून दिली. इतकी कि डायनासॉर अन ज्युरासिक पार्क म्हटले कि स्टीवन स्पीलबर्गच जगभर लोकांना आठवतो.या ज्युरासिक पार्क सिरीजचे नंतर तीन पार्टस (सिक्वेल) पण निघाले. याच कथेची री ओढत दिग्दर्शक कोलिन ट्रेवेरोव्ह पुन्हा एकदा ज्युरासिक वर्ल्ड (कदाचित चौथा पार्ट) हि काल्पनिक कथा घेऊन आलेले आहेत.
कहाणी:
डायनासॉरला अब्जावधी वर्षानंतर जिवंत करून त्यांच्या जिवनाच जनतेसमोर केलेले/मांडलेले प्रदर्शन आणि त्या प्रयत्नात झालेली काहीतरी गडबड अन अपरिमित हानी अशी ज्युरासिक पार्क मागची मुख्य कन्सेप्ट कन्सेप्ट/थीम होती. पहिल्या गाजलेल्या प्रोजेक्ट नंतर, नंतरच्या प्रत्येक प्रयत्नात थोड्याफार फरकाने हाच मुख्य दुवा होता. ज्युरासिक वर्ल्डहि त्याला अपवाद नाही पण या वेळेस ज्युरासिक पार्क मधेल्या डायनासॉरला R & D मध्ये बनवताना त्यांच्या जीन्स मध्ये केलेला बदल अन या वेळेस त्या बदलामुळे झालेली गडबड असा बदल करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला.

तंत्रज्ञान:
हॉलीवूड मध्ये असणारे एकूणच निर्मिती आणि हाताळणी तंत्र हे आपल्या हिंदी चित्रपट सृष्टी पेक्षा फार फार प्रगत आहे. मानवावर येणारी एखादी अनैसर्गिक आपदा आणि त्या आपदांपासून मानव जातीचा केलेला/झालेला बचाव या थीमवर बनलेले चित्रपट हे बनवणे आणि त्या पासून जगभरातून कमाई करणे हि हॉलीवूड चित्रपटसृष्टीची खासियत. या त्यांच्या इम्प्रेशनला जगणारे तंत्राचा वापर झालेला दिसतो. छोट्या छोट्या गोष्टी उदाहरणार्थ एका डायनासॉरच डॉल्फिन प्रमाणे वाहत्या पाण्यातून उडी मारणे मान्य कि हा एका तंत्राचा प्रकार आहे पण त्या तंत्रच execution शब्दश: उत्कृष पातळीवर (नेहमीप्रमाणेच) आहे. तंत्रज्ञान अर्थातच टेक्निकली हॉलीवूड हे बॉलीवूड पेक्षा उत्कृष्ट होत आणि राहील कारण वास्तविक बघता आमचा "लिंगा" हा रजनीकांतचा चित्रपटही असच भव्य होता पण धरणाच्या बांधकामाच exection करताना अनेक ठिकाणी भाव-भावनांना महत्व दिल्या जाऊन टेक्निकल कमी झाकण्यात आली.

हॉलीवूड आणि बॉलीवूड या दोन चित्रपटसृष्टीत मुख्य फरक कसा याचे एक उदाहरण या चित्रपटामुळे मिळते. बॉलीवूड मध्ये अर्थात हिंदी चित्रपटसृष्टी भावना(प्रेम/दु:ख इत्यादी इत्यादी), अभिनय क्षमता, कथा, दिग्दर्शन या मुख्य पायावर असते आणि हॉलीवूड चित्रपटसृष्टी कथा, पटकथा आणि कथे अन पटकथेला सांधणारे टेक्निकल आस्पेक्ट्स यावर अवलंबून असते हे या चित्रपटामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

मला सर्व दृष्टीने चित्रपट आवडला. कुठेही/कोणतीही कमी जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला पूर्ण ५ * देईन. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मंगळवार, ९ जून, २०१५

देवाचा 'सुपर कंप्युटर'

सहज अस वाटल,कि देवा जवळ समजा सुपर कॉम्प्यूटर असला तर तो किती बिझी असेल,म्हणजे पहा ना प्रत्येकाच्या पाप अन पुण्यांचे हिशेब ठेवण प्रत्यक्ष देव जरी असला तरी लोकसंख्या इतकी आहे  कि त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी सुपर कोम्पूटर असेलच .फॉर ex. या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पुण्य केल आहे त्याला या जन्मात हे सुख द्या या दुसर्या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पाप केल होत याला हे दु: द्या किती जिकिरीच काम असेल .जर कविता लिहू असे म्हटले तर किती खतरनाक सब्जेक्ट होईल

देवाचा 'सुपर कंप्युटर'
देवाचा हिशेब कसा असेल
मला पडला होता प्रश्न
उत्तर शोधता शोधता उत्तर गवसलं
अन चक्क भेटला वरचा  सुपर कम्प्युटर

विचार करा किती त्रासला असेल तो
देवाचा 'सुपर कंप्युटर'
कारण म्हणे हिशेब ठेवण नसते जोक
खास करून अजिबात नाही 'वर'

या व्यक्तीने केल फक्त  इतकच  पुण्य
याला आता  घडवा हा दैवयोग
अन त्या  व्यक्तीचे हे पाप
याला आता फक्त योगायोग

यांनी हि सेवा
केली होती त्या वेळेस
म्हणून याचं काम
अडायला नको या वेळेस

बर देवही नसेल  पक्का
आपल्याच निर्णयावर
दर वेळेस त्याचीच कमांड फिरते
चित्रगुप्ताच्या  कोणत्याही डिसिजनवर

कुणाजवळ उपलब्ध  असते 
केलेल्या पापांना डिलीटचे ऑप्शन
कुणाला  तोही  पर्याय  नाही
उरते यमाचे फक्त लांच्छन

कधी मी असा  विचार करतो कि
मी चित्रगुप्त नाही हे किती बरय
अप्पर व्ह्यू ने ब्रॉड गोष्टी
बघाव्या लागत नाहीत हे किती चांगलय

'हा' म्हणे मागच्या जन्मात
होऊच शकायचा नाही एकाग्र
मग त्याला या जन्मात
बनवा एकदम कुशाग्र

'हिचा' म्हणे मागच्या जन्मात
देवावर नव्हता विश्वास
या जन्मात देवाला
वाटली पाहिजे भक्ती खास

हा होता मागच्या जन्मात
अगदीच जीवन वेस्ट
याला बनवा या जन्मात
अगदी समकक्ष बिल गेट्स

'हा' म्हणे मागच्या जन्मात
होता राजकीय पण अपयशी कार्यकर्ता
याला म्हणे मग या जन्मात
बनवा त्याच पक्षाचा सर्वेसर्वा

मग वेळ आली कि
मीच त्याला थांबवल
म्हटल तुझी आपबिती बस झाली
आता माझ डोक गरगरल

मला भारतीय नोकरशहांची सवय
म्हटल बोल मित्रा काही जमते का?
माझ पाप असेलच हिशेबात
पुण्यात बदलण शक्य वाटते का 

मग शेवटी तो म्हटला
म्हणे इथे होत नाहीत कोणतेच काम भ्रष्ट
म्हणे देवाचा पूर्ण वचक आहे
विचारहि   करू नका नतद्रष्ट


समीर

शनिवार, ६ जून, २०१५

दिल धडकने दो......



दिल धडकने दो......

कोणत्याही सिनेमात एक कहाणी असते. ती कहाणी काही ठराविक पात्रांच्या भोवती फिरत असते. त्यात मग भाव-भावना-दु:ख-प्रेम इत्यादी इत्यादी मालमसाला नीटपणे जोडून जे नाट्य आकाराला येते ते म्हणजे यशस्वी सिनेमा. झोया अख्तर हे नाव कशाची आठवण देते? तर "अख्तर" आडनावाशी संबंधित इतर यशस्वी व्यक्ती आणि जिंदगी न मिलेगी दोबारा. "जिंदगी ना मिलेगी दोबारा" सारखा असं एखादंच दुर्मिळ उदाहरण असते जे "उत्तम " या सदरात वर उल्लेखित काही गोष्टींची कमी असूनही मोडते.
झोया अख्तर म्हणजे एक अशी दिग्दर्शक जी पात्रांच्या कथेतील बारकाव्यांवर खूप जास्त होमवर्क केल्यामुळे आपोआपच त्यांना चितारण्यात यशस्वी होते हे जिंदगी ना मिलेगी दोबारा मुळे प्रेक्षक अनुभवून आहेत. तर मग त्याच परंपरेत एका पंजाबी घराण्याची-घरातील पात्रांची कथा घेऊन ती आलेली आहे.

कहाणी:
एक पंजाबी घर - हाय सोसायटीत म्हणजेच उच्चभ्रू वर्गात मोडणारे - त्या घरातील व्यक्ती आणि त्यांचे आपसातील अन इतरांशी (प्रेम या दृष्टीने) चितारलेले संबंध म्हणजे "दिल धडकने दो". हि कहाणी चितारताना प्रेक्षकवर्ग हा सगळाच मुंबईत किंवा विदेशातला म्हणजेच सांपत्तिक दृष्ट्या उत्तम category तला नसून फक्त उच्चभ्रू वर्गाला डोळ्यापुढे ठेवून हि कहाणी mould करण्यात आलेली आहे अशी शंका खूप ठिकाणी प्रेक्षकांना आल्याशिवाय राहत नाही. सुरवात होते परीवातल्या विविध व्यक्तींच्या निरनिराळ्या बाजूना स्पर्श करते - त्यांचा नीट शेवट करते अन संपते. हिंदी सिनेमात कदाचित पहिल्यांदाच (आर्ट फिल्म हि संकल्पना वगळता) व्यावसायिक ऑन स्ट्रीम केलेला एक प्रयोग.

अभिनय:

अनिल कपूर या व्यक्तीने कदाचित पहिल्यांदाच एक बाप रंगवलेला आहे. झोया अख्तर थोडक्यात अख्तर या आडनावाभोवती असणारे वलय आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा ला मिळालेले यश बघता या (कदाचित) प्रायोगिक प्रयत्नातही बरेच चांगले अभिनेते एकत्र केलेले आहेत. अनिल कपूर - रणवीर कपूर - प्रियांका चोप्रा - अनुष्का (वहिनी) हि काही उदाहरणे.

दिग्दर्शन:
आधीच उल्लेखल्या प्रमाणे झोया अख्तर हि कहाणीतील पात्र निवड - या पात्रांचा कहाणीशी संबंध - त्यांचा असणारा स्क्रीन प्रेजेंस इत्यादी इत्यादि बाबींवर व्यवस्थित होमवर्क करून आलेली जाणवते.
जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये स्पेन मधल्या त्या पारंपारिक सोहळ्याला बॉलीवूड मध्ये पडद्यावर आणणे असे प्रयोग तिने केले होते तसाच एक महत्वाचा प्रयोग तिने येथेही केलेला आहे.त्या कुटुंबातल्या मुक्या प्राण्याला narrator म्हणून पूर्ण कहाणीभर वापरलेला आहे. हा कथेनुसार प्रयोग शोभला असला तरी हिंदीत नवीनच.

वेगवेगळ्या नवनवीन प्रयोगांना चितारताना कदाचित दिग्दर्शक त्यात वाहवत जाण्याचा चान्स असतो. कदाचित "काम करा पण असे काम करा ज्यात आनंद मिळतो" हा संदेश देण्याचाही प्रयत्न असू शकतो पण जो स्वच्छपणे जमलेला नाही.बॉलीवूड मध्ये सहजा-सहजी न आढळणारा एक नवीन प्रयोग- भलेही जमलेला नसला तरीही - झोया अख्तर आणि अनुष्का (वहिनी) मला आवडते म्हणून मी चित्रपटाला १* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, ३१ मे, २०१५

तनु वेड्स मनु रिटर्न्स



तनु वेड्स मनु रिटर्न्स 

निर्माता दिग्दर्शक आनंद राय (आपले रांझणा वाले हो) हे त्यांच्याच जुन्या तनु वेड्स मनु चा सिक्वेल अर्थात परत टू घेऊन आले आहेत. सिक्वेल म्हटल्यावर तो पहिल्या भागावरच अवलंबून हवा. जर तो तसा नसेल लोकांचा इंटरेस्ट निघून जातो. पण तनु वेड्स मनु बद्दल सांगण्यास आनंद कि कहाणी पूर्णपणे पहिल्या भागावर अवलंबून आहे. आणि पहिला जिथे संपतो तिथूनच पुढे दुसरा सुरु होतो पण तरीही दुसरा बघताना पहिला बघितलेला असण्याची आवश्यकता जाणवत नाही. पूर्णपणे वेगळे कथानक आहे आणि ते पहिल्या भागावर अवलंबून असले तरी त्याचे संदर्भ संवादात मिळतात. त्यामुळे पहिला बघितलेला नसला तरी दुसरा बघूनही समजण्यात काहीही गफलत होत नाही. या बाबीवर आनंद राय खूप मोठे मैदान मारतात कारण सिक्वेल म्हटले कि आपल्याला असते हॉलीवूड ची सवय. कुठलाही सिक्वेल जर आधीचे पार्ट बघितलेले नसतील तर पटकन उतरत नाही. सिक्वेल हा हॉलीवूडमध्ये आधीच्याच कहाणीवर इतका अवलंबून असतो कि बस... तर सांगायचा मुद्दा हा कि हा पार्ट टू असला तरी पण तुम्ही पहिल्यांदाच जाऊनही नीट एन्जॉय करू शकता.
कहाणी:
पहिल्या भागात दोन व्यक्ती प्रेमात पडतात. त्याचं लग्न होते आणि तेथे कहाणी संपते. मग आता दुसर्या भागात लग्नानंतरच त्यांचं आयुष्य कसं बनल असेल? इंटर्नल consequences असतील का?
असतील तरी त्यांचा स्वभाव (पहिल्या भागानुसार) बघता त्यांनी ते कसे handle केले असतील?
अश्या प्रश्नांचे उत्तरं घेऊन दुसरा भाग आलेला आहे. लेखक पहिल्या आणि दुसर्या भागाचेही हिमांशू शर्माच आहेत पण त्यांनी कोठेही conceptual अतिशयोक्ती केलेली नाही. नाहीतर असल्या प्रकरणात काहीतरी संदेश देणे- कौतुक मिळवणे- अवार्ड्स मिळवण्याची इच्छा बाळगणे असल्या विविध कारणांखाली "अती" म्हणजेच practically घडण्यास अशक्य असल्या बाबींचा समावेश केल्या जातो. मग या बाबींना कहानिशी-पहिल्या भागाशी वगेरे तारतम्य सांभाळण्यात दिग्दर्शकाची पकड सुटते.पण येथे लेखकाने असे काहीही घडू दिलेले नाही.
अभिनय:
तनु त्रिवेदी (कंगना राणावत) हिने अक्षरश: एकहाती आणि समर्थपणे तोलून धरलेला हा चित्रपट आहे.
तिचे मनुशी (आर माधवन) पटणे- न पटणे इत्यादी साकारताना पहिल्या भागातला तोच बिनधास्तपणा साकारलेला आहे. आणि तरीही नवेपणा देखील itroduce केलेला आहे. या (थोड्याफार) नवेपणाचा मला जाणवलेला मला जाणवलेला संदर्भ म्हणजे तिचे राजा अवस्थी (जिमी शेरगिल) सोबतचे काही प्रसंग. पण कदाचित दुसर्या भागात ती लग्न झालेली आणि पहिल्या भागात कुमारी असा फरक असल्यामुळे तो कोरडेपणा असावा. आर माधवन या व्यक्तीने काहीही जास्त संवाद नसतानाही फक्त expressions मनु शर्मा तोललेला आहे. आणि याचमुळे तो व्यवस्थित जमून आलेला आहे. पण तनु बर्याच प्रसंगात इतकी जमून आलेली आहे कि हा गडी नायक न राहता सहाय्यक व्यक्तिरेखा बनतो. पण हि तनुच्या (कंगनाच्या) अप्रतिम अभिनयाची एकप्रकारची असलेली पावतीच.
दिग्दर्शन:
आनंद राय यांनी सिक्वेल मधेही पहिल्या भागावर अवलंबून असणेपण सोडलेले नाही आणि तरीही नवीन प्रेक्षकांना तो समजेल कुठेही न समजल्यासारखा वाटणार नाही याची काळजी घेतलेली आहे हे वाटल्याशिवाय राहत नाही. भलेही संगीत हा कमर्शियल यशासाठीचा एक अतिशय महत्वाचा घटक यात कमी पडतो.पण ती कमी कहाणी अन दिग्दर्शकाचे कहाणी हाताळण भरून काढते.

पहिला भाग हा उत्तम होताच पण हा दुसरा भागही अप्रतिमरीत्या बनलेला आहे. एखादा सामान्य व्यक्ती चित्रपटगृहात तीन तास एन्जॉय करणे या हेतूने जातो. बाकी काहीही त्याचा हेतू नसतो. बर्याच काळानंतर या हेतूला पूर्णपणे खरा करणारी एक कलाकृती. मराठीत सिक्वेल्ची अपेक्षा इतकी नाही पण भविष्यात "मुंबई-पुणे-मुंबई" चा सिक्वेल कधी बनला तर तो असाच अर्थपूर्ण असावा अशी मला प्रामाणिक अपेक्षा आहे. हिमांशू शर्माचे अप्रतिम कहाणी आणि पटकथा लेखन अन कंगनाच्या अप्रतिम अभिनयासाठी मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

रविवार, २४ मे, २०१५

अगबाई अरेच्या-२ (मराठी)




अगबाई अरेच्या-२ (मराठी)

अगबाई अरेच्या या आपल्या पहिल्याच चित्रपटाचे टायटल दुसर्या चित्रपटात वापरून त्या सिक्वेल सारखे २ हे शीर्षक देऊन केदार शिंदे हा नवीन चित्रपट घेऊन आलेला आहे पण सांगण्यास आनंद जी हा चित्रपट म्हणजे सिक्वेल नाही. पूर्णत: वेगळे कथानक आहे आणि या कथानकाचा पहिल्या भागाशी काहीही संबंध नाही.मागच्या अगबाई अरेच्या मध्ये "गालावर खळी" स्वप्नील बांदोडकरचे गाजलेले गाणे होते. भलेही तो चित्रपट कथानकासहित विस्मृतीत गेला असेल पण हे गाणे आणि अजय-अतुलचे "मल्हार वारी" हे गाणे विसरणे अशक्यच. तिकीटबारीवर तो चित्रपट खूप गाजला होता पण त्या गाजण्यामागे या दोन गाण्यांचा सहभाग खूप मोठा आहे.याच पहिल्या भागातले "मन उधाण वार्याचे गुज पावसाचे" हे शंकर महदेवनचेहि उत्कृष्ट गाणे होते.

असे जर आहे तर हा पार्ट २ असा दुसरे भागासारख नाव घेऊन का आला असेल ? पहिल्या भागात कथेच्या नायकाला दुसर्याच्या मनातल ओळखण्याची शक्ती आपोआप मिळते आणि त्याचा तो कसा वापर करतो या भोवती फिरणारे ते कथानक होते. या भागात अशी कोणतीही शक्ती वगेरे कथेत नाही पण मी बघितलेल्या केदार शिंदेच्या मुलाखतीप्रमाणे प्रेमात मन-कान-नाक-डोळे-जीभ-त्वचा हे medium खूप महत्वाची भूमिका बजावतात. मग पहिला भाग हा पूर्णत: मनावर अवलंबून जर होता तर हा भाग स्पर्श अर्थात त्वचा या medium वर अवलंबून आहे. म्हणून हा पार्ट २ असावा. आणि केदार शिंदे हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक मोठे नाव. त्यामुळे पुढील काही वर्षात याच रेंज मध्ये पुढील पार्ट दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. त्या मुलाखतीत तरी मला असं जाणवलं आता बघुयात कि व्यावसायिक गणितं केदार शिंदेच्या पाठीशी राहतात कि त्याला थांबवतात.

अभिनय:सोनाली कुलकर्णीच्या अप्रतिम अभिनयाचे कौतक असल्याशिवाय अगबाई अरेच्या-२ चा उल्लेखहि अशक्य इतका अप्रतिम अभिनय तिने केलेला आहे. सोनाली कुलकर्णी म्हणजे दिल चाहता है आणि डॉ प्रकाश बाबा आमटे वाली (दुसरी नाही), नाहीतर सिनली कुलकर्णी मराठी चित्रपट सृष्टीत दोन आहेत. गैसमज होण्याची शक्यता आहे.तर या सोनाली कुलकर्णीने रंगवलेली शुभांगी कुडाळकर हि यातली मुख्य व्यक्तिरेखा. हिच्या अवतीभोवती पूर्ण काहीही सुरवात ते शेवट पर्यंत फिरते. पण सांगण्यास आनंद कि सोनाली कुलकर्णी कोठेही कमी पडत नाही. हि कहाणी तिचा तिच्या (कोणत्याही) प्रेमाला होणारा स्पर्श आणि त्याचे aftereffects अश्या एका वेगळ्याच विषयाभोवती गुंफलेली आहे.
दिग्दर्शन:
केदार शिंदे यांचे दिग्दर्शन हि चित्रपटाची जमेची बाजू, यांच्या दिग्दर्शन क्षमतेबद्दल कुणाची शंका असण्याची शक्यताच नाही. आणि तरीही कुणाला शंका आल्यास "सही रे सही" किंवा "पुन्हा सही रे सही" हि त्यांची दोन नाटके बघून घ्यावीत. गैरसमज दूर होईल.
तर स्पर्शावर बेतलेले एक कथानक आणि त्यातही मराठी म्हणजे प्रेम हा कहाणीचा अनिवार्य भाग. या स्पर्श आणि त्याचे कहानिशी corelation सांभाळताना दिग्दर्शकाची पकड सुटेल असे बरेचशे प्रसंग होते. सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे सोनाली कुलकर्णीच्या मुख्य व्यक्तिरेखेला किती काळ फुटेज देणे. तिला कमी काळ जरी पडद्यावर आणल असत, एडिटिंग वगेरे मध्ये रोल काटला असता तरी फरक पडला असता. येथे केदार शिंदे मैदान मारतात.

पहिला भाग हा सुपर डुपर हिट होता. मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड वगेरे पण जर दोन असे सिक्वेल सारखे शीर्षक वापरताय तर मग थोडा फार संबंध पहिल्या भागाशी दाखवायला हरकत नव्हती असं वाटून जाते. आणि सगळ्यात महत्वाचा भाग रोहित शेट्टी जसे त्याचा चित्रपटात दिग्दर्शनाचे श्रेय Rohit Shetty & team असं आपल्या पूर्ण संचाला देतो, तीच पद्धत इथेही केदार शिंदे & team अशी श्रेयनामावलीत दिग्दर्शनाच्या श्रेयासाठी वापरलेली आहे. पण मग त्याची सगळ्यात मुख्य गोष्ट फॉलो केलेली नाही. mouth to mouth publicity साठी कोणत्याही चित्रपटाचा शेवट मुख्य भूमिका बजावतो.
तर चित्रपटाचा संथ शेवट आणि संगीत हे दोन मुख्य मुद्दे अगबाई अरेच्या-२ मध्ये कमी पडतात म्हणून मी चित्रपट ३* देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, ११ एप्रिल, २०१५

कॉफी आणि बरेच काही (मराठी)




कॉफी आणि बरेच काही (मराठी)

मराठी सिनेमा हा "प्रेम" या सार्वत्रिक ज्वलंत विषयावर अवलंबून असतो पण या विषयाला नीट हाताळलं तर काही अप्रतिम कथा पडद्यावर उतरतात याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "कॉफी आणि बरेच काही" वास्तविक प्रेम हा विषय असा कि हिंदी चित्रपटसृष्टीमुळे शारीरिक लगट हि एक आवश्यक factor असतो असा प्रेक्षकांचा समज. पण मराठी मानसिकता लक्षात घेता शारीरिक लगटिला बायपास करून फक्त भावभावनांचे खेळ आणि त्यातून कहाणीचा हैप्पी एंड असा एक दुर्मिळ योग दिग्दर्शक/लेखक प्रकाश कुंटे यांनी जमवून आणलेला आहे.
कहाणी:
वैभव तत्ववादी (निषाद) आणि प्रार्थना बेहरे (जाई) या दोघा software कंपनीतल्या कलीग्सची कहाणी म्हणजे "कॉफी आणि बरेच काही". निषाद सिनियर अन जाई ज्युनिअर आणि या दोघांची हि घडलेली हि कहाणी.
अभिनय:
सध्याचे arrange marriage करणारे तरुण मुलं/मुली स्वत:ला जस समजतात अगदी तशीच जोडी निषाद पडद्यावर उतरवण्यात वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरेला यश मिळालं आहे. नेहा महाजन ने उभी केलेली आभा हि जाईची बहिण पण छोट्याश्या भूमिकेत असली तरी छाप उमटवून जाते.
दिग्दर्शन:
वास्तविक बघता अर्रेंज marriage साठी जी आधी दाखवण्याची जी भेट असते त्याने सुरवात होणारी हि कहाणी आणि प्रेमाकडे वळताना भरकटण्याचा १०१% चान्स होता पण प्रकाश कुंटे यांनी प्रेक्षकांचं कुठेही कन्फ्युजन होणार नाही याची काळजी सगळीकडे घेतल्याचं जाणवते. सध्या सुध्या शब्दातून त्यांनी मराठी मानसिकतेला कहाणी पचेल अशी सोय केलेली आहे.
लग्न करताना क्रश म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा फक्त अपिअरन्स (सौंदर्य/दिसणे) महत्वाचे नसून
सोबत राहताना पटणे हे हि महत्वाचे असते या एका चाकोरीपासून वेगळ्याच पण मराठी मानसिकतेसाठी महत्वाच्या विषयाला हात घालणाऱ्या चित्रपटला मी साडे तीन ३ १/२ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर