एका लग्नाची पुढची गोष्ट
"एका लग्नाची गोष्ट" या प्रशांत दामलेंच्याच जुन्या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच "एका लग्नाची पुढची गोष्ट" या नाटकाचा प्रयोग क्रमांक ७७१ आणि प्रशांतजींचा वैयक्तिक १३२५२ वा प्रयोग बघण्याचा भाग्य आज लाभले. एका लग्नाची गोष्ट मधील मन्या (प्रशांत दामले) आणि मनी (कविता मेढेकर) यांचे त्या नाटकांत प्रेम होते आणि मग लग्न होऊन 'ते' नाटक संपते. या नाटकांत दोघंही चाळीशीच्या घरात आहेत आणि वयानुसार त्यांच्या नात्यांत होणाऱ्या दुराव्याचा कसा कस लागतो याचे कथानक म्हणजे "एका लग्नाची पुढची गोष्ट" . अद्वैत दादरकर हे या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक आहेत.
तर या नाटकांत मन्या व मनी हे दोघंही छानपैकी आपल्या संसारात मश्गुल असतात, त्यांना एक २२ वर्षांचा मुलगाही असतो आणि तो बंगलोर ला कुठेतरी शिकत असतो. तर जसे जसे त्यांचे वय वाढत जाते तसं तसं त्यांच्या नात्यांत एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो. लग्नानंतरच्या जीवनात येणाऱ्या बदलांमुळे नवरा बायकोच्या नात्यांत मानसिक रित्या कितपत ताण निर्माण होतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मुखत्वे लग्नापूर्वीचे प्रेम आणि रोमँटिक संबंध लग्नानंतर कसे बदलतात, या बदलामुळे त्यांच्या आपापसातील कम्युनिकेशन मध्ये कसा बदल होतो हे जाणवून देण्याच्या प्रयत्न नाटकांत आहे.
त्यांच्या नात्यांत येणारा हा रुक्षपणा दूर करण्यासाठी मनी हि पुरु (अद्वैत दादरकर) आणि कश्मिरा (मृणाल चेंबूरकर) यांच्या साह्याने एक प्लॅन राबवते. आणि तो प्लॅन यशस्वी झाल्यामुळे मन्याच्या मनात पुन्हा प्रेमाची पालवी फुटून त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत होतात.
अभिनयाबद्दल बोलायचे म्हटल्यास प्रशांत दामलें बद्दल काय बोलणार..? ते अभिनय तर छान करतातच पण गातातही हि अप्रतिम आणि नाचतातही खूप सहज . सुरवातीला चिडचिडा आणि नंतर भावूक झालेला मन्या खूप छान उभा केलाय. त्यांचे "मला सांगा " आणि "ती परी "ह्या दोन गाण्यांशिवाय तिसरं गाणंही ऍड केलंय. "तू हि असावा मी ही असावी" असे बोल आहेत त्या गाण्याचे. आधीची दोन्ही गाणी आवडत होतीच पण हे तिसरं गाणंही छान जमून आलंय.कविता मेढेकर यांनी उत्कृष्ट रित्या नात्यांतील दुरावा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायकॉलॉजिकल थिरपीचा वापर करून तिने पुरु व कश्मिरा सोबत रचलेला प्लॅन आणि त्याचे केलेलं execution बऱ्यापैकी पटते. आणखी एक नेपथ्याचा अति वापर न करता कथानक समजावण्यासाठी तिचाच दोन-तीन दा दिग्दर्शकाने वापर केलेला आहे. म्हणजे ती एंट्री प्रेक्षकांतून घेते, नाटकांत दोन-तीनदा कथेपासून वेगळी होऊन प्रकाशयोजनेच्या साहाय्याने काय चाललंय स्टेजवर ते समजावते. ते बरोबर शोभलंय. याला लेखक-दिग्दशर्क अद्वैत दादरकर ची नवीन संकल्पना कदाचित म्हणता येईल पण ती शोभलेली आहे व्यवस्थित, प्रेक्षकांना कथानक समजते पूर्णपणे.
सरतेशेवटी midlife क्रायसिस या प्रत्येकच विवाहित जोडप्याच्या आयुष्यातील अनिवार्य घटनेभोवती विनोदी अंगाने गुंफणाऱ्या या कथानकांस मी पूर्ण पाचपैकी पाच स्टार (५*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर (08/06/2025)

Thank you for sharing your review. This is must watch play.
उत्तर द्याहटवा