रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

पुन्हा सही रे सही (नाटक)

पुन्हा सही रे सही (नाटक)

मराठी नाटक म्हणजे काय अन ते उत्कृष्ट कसे असतात हे समजून घेण्यासाठी कमीत कमी एकदा तरी रसिकांनी बघावे असे एक नाटक म्हणजे "पुन्हा सही रे सही". या आधी सुयोग निर्मित अन केदार शिंदे लिखित/दिग्दर्शित असे हे नाटक होत पण आता टायटल बदलल "पुन्हा सही रे सही " झाल अन दिग्दर्शक तोच पण निर्माता बदलला. सौ सरिता भरत जाधव या निर्मात्या बनल्या असून त्या आता हे नाटक भरत जाधव इंटरटेनमेंट या banner खाली हे नाटक निर्मित करतात.
कोणत्याही नाटकात सिनेमासारखा डबल रोल शक्य असतो?? उत्तर आहे होय आणि दोन नाही तर दिग्दर्शकाच्या शक्कलेला अभिनेत्याच्या समर्पकतेचि जोड जर मिळाली तर एक दोन नव्हे तर चक्क चार - चार भूमिका एकच अभिनेता एकाच नाटकात उभ्या करू शकतो.

कहाणी:
मदन सुखात्मे या एका श्रीमंत उद्योगपतीच्या इस्टेटीच्या हास्यात्मक ढंगाने झालेल्या किंवा होत असलेल्या वाटण्या म्हणजे पुन्हा सही रे सही.

अभिनय:
भरत जाधव यांनी या नाटकात (मदन सुखात्मे,रंगा, हरी आणि गलगले) या चार भूमिका केलेल्या आहेत. या चार भूमिका करताना प्रत्येक भूमिकेत स्टेजवर येण्याचे टायमिंग, भूमिकेचे रंगमंचावरील विशिष्ट दार आणि प्रत्येक भूमिकेला समकक्ष सहाय्यक अभिनेत्यांशी हास्यात्मक किंवा व्यंगात्मक संवाद यांचे टायमिंग हे ज्या सहजतेने भरत जाधवला साधते ते शब्दश: अफलातूनच.मदन सुखात्मे याच्या पहिल्या भूमिकेने प्रवेश, मग हरी, रंगा आणि गलगले यांचे कहाणीतले आगमन आणि सरतेशेवटी मदन सुखात्मेने येउन केलेला शेवट या सगळ्या भूमिकांत भरत जाधव प्रेक्षकांना खिळवून टाकतो खुर्चीवर.

दिग्दर्शन:
केदार शिंदे हे या नाटकाचे दिग्दर्शक. सुयोग तर्फे जेंव्हा हे निर्मित व्हायचं तेंव्हा देखील हेच होते आणि आताही हेच आहेत. केदार शिंदेनी या नाटकात बर्याच कल्पनांना effectively वापरलेलं आहे. उदाहरणार्थ चारही भूमिकातून भरत जाधवच्या संबंधित भूमिकेचे आगमन रंगमंचावर होताच इतर भूमिकावाल्या रंगमंचावरील प्रकाशयोजना थांबवणे जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष जिथे पाहिजे तिथेच वेधल्या जाईल, भारतच्या चारपैकी तीन भूमिकांना repeatative डायलॉगज देणे इत्यादी इत्यादी. मान्य असो व नसो पण या नाटकाच्या यशात एका दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीचे श्रेय निर्विवादपणे आहेच.

अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या या अप्रतिम नाटकाला मी बापडा काय रेटिंग देणार? पण फक्त पाचपैकी पाच ५* देण्याची माझी हौस मात्र मी भागवून घेईन म्हणतो.

-समीर

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

तू हि रे (मराठी)


तू हि रे (मराठी)
मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही. त्याला जर काही अर्थ असला आणि थोडीफार तरी प्रेक्षकांना कहाणी पटली तरच मराठीत कोणत्याही चित्रपटाला हिटचा दर्जा मिळू शकतो. हिंदीत काही अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे किंवा अप्रतिम संगीतामुळे बरेचदा त्यांचे काम चालून जाते. दक्षिणे सारखी अभिनेत्यांची उपस्थिती हे "mandatory" नसलं तरी हिंदीतही हे कारण खुपदा चालून जाते. विषयांतर होईल पण "जय हो" सारखे तद्दन ठोकळे हे हिंदीतल्या अभिनेता उपस्थितीचे एक उदाहरण. असो, आपले मराठी प्रेक्षक हे इतर हिंदी प्रेक्षकांसारखे कामचलाऊ गोष्टींवर फक्त अभिनेत्याच्या उपस्थितीमुळे मान टाकणाऱ्या इतर अमराठी किंवा दक्षिणी मानसिकते सारखे नसल्यामुळे हे होत असावं. याचसाठी मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेचे कौतुक कारण तिने अप्रतिम रित्या कहाणी काहीशी कन्फ्युजिंग असूनही निभावलेली आहे. “सिलुनु ओरु काढाल” या तमिळ चित्रपटावर अवलंबित कहाणी असूनही तिचे मराठी transformation लेखिकेने ज्या सफाईदारपणे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. कारण सूर्या या दक्षिणी सुपरस्टारचा तो चित्रपट निर्विवादपणे नायकप्रधान आणि थोडाफार "हे समजून घ्या, ते समजून घ्या" असल्या दक्षिणी पद्धतीचा असेल. पण म्हणूनच लेखिकेचे खरोखर कौतुक.
कहाणी:
स्वप्नील जोशी (सिद्धार्थ) आणि नंदिनी (सई ताम्हणकर) या अरेंज marriage केलेल्या जोडीची कथा म्हणजे तू हि रे. या कथेत "आठ वर्षांचा लीप" (म्हणजे आठ साल बाद) हि पाटी पहिल्या पंधरा मिनिटातच प्रेक्षकांना दिसते. पण लेखक आणि अनुभवी दिग्दर्शकाने नंतर सफाईदारपणे flash back ला वापरत प्रेक्षकांना कुठेही कन्फ्युज होऊ दिले नाही. अभिनय आणि कहाणीचा फ्लो अप्रतिमरित्या प्रेक्षकांना पोचतो. मध्यंतरानंतर कहाणीत भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित) हिचे आगमन होते आणि तिथेच कहाणी प्रेक्षकांच्या समजेतून सुटण्याचा चान्स होता. पण संजय जाधव आणि मनस्विनी लता रवींद्र यांचे खरोखर कौतुक कारण त्यांनी अगदी अप्रतिमरीत्या सगळे सिच्युएशन्स हाताळले आहेत. तमिळ बेस्ड असल्यामुळे कहाणीत कितपत फरक केला असेल हे बघण्याचा आपल्याला काहीही चान्स नाही. पण अनुभव दोन्हीकडचा असल्यामुळे बराच केला असेल असा अंदाज बांधायला अजिबात हरकत नाही.
अभिनय:
मराठी चित्रपटात कास्टिंग हि अगदी बेसिक गोष्य निर्विवादपणे सगळ्यात जास्त महत्वाची आहे असे मला वाटते आणि असे वाटण्याला बळकटी देणारी कास्टिंग यात बघायला मिळते. स्वप्नील जोशी (सिद्धार्थ), सई ताम्हणकर (नंदिनी) भैरवी भानुशाली (तेजस्विनी पंडित), प्रसाद (सुशांत शेलार), श्री. भानुशाली (गिरीश ओक) आणि त्या दोघांची एक छोटी मुलगी हे सग्गळे आपापल्या भूमिकात शोभून गेलेले आहेत.या सगळ्यांना निवडण्यात जी चतुराई संजय जाधवने सुरवातीलाच एक कास्टिंग डायरेक्टर म्हणून दाखवली असेल त्याचा उल्लेख हा करावाच लागेल. का याचेही उदाहरण बघू भैरवी हि एका राजकारण्याची मुलगी या भूमिकेत आहे आणि नंदिनी एक खेडवळ लग्न झाल्यावर शहरात गेलेली स्त्री. या दोन भूमिकांत एक बेसिक फरक आहे. मान्य कि अभिनयामुळे हा फरक manipulate होईल पण तरीही बेसिक कास्टिंगच जर अयोग्य असत तर नक्कीच फरक पडलाच असता.
दिग्दर्शन:
संजय जाधव हे नाव दुनियादारी मुळे नावाजल्या गेले. "तू हि रे" मध्ये संजय जाधव यांनी अरेंज marriage , प्रेम (यशस्वी आणि अयशस्वी) असल्या एकदम वेगवेगळ्या विषयांना एकत्रितपणे स्पर्श केलेला आहे. यातला प्रत्येक विषय हा एकेका स्वतंत्र चित्रपटांचा विषय आहे. त्यातही चित्रपट मराठी म्हणजे स्वप्नाळू भाव-भावनेला किनारा देत बर्यापैकी वास्तविकतेची फोडणी असल्याशिवाय काहीच शक्य नाही हे नक्की.या सगळ्या कसरतीला manage करत पडद्यावर कथा चितारत असता मराठी प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत किंवा कंटाळणार नाहीत हि जितकी अभिनेत्यांची जबाबदारी होती तितकीच दिग्दर्शकाची. संजय जाधव या आघाडीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवतात हे नक्की.
संगीत आणि गीतकार:
मराठी चित्रपटात संगीताला हिंदी किंवा दक्षिणी चित्रपटापेक्षाहि जास्त महत्व असते कारण मराठी रसिक हे गाण्यांना गाणे म्हणून consider न करता एक कविता म्हणून समजतात. आणि मराठीत अक्षरश: पैश्याला पसाभर कवी आणि चारोळीकार अस्तित्वात आहेत याची जाणीव झुक्या रोजच करून देतो. त्या संख्येला बघता हे खरे असावे हे पटते. अमितराज, पंकज पडघन आणि शशांक पोवार यांचे संगीत आणि गुरु ठाकूरची गीते तू हि रे ला लाभलेली आहेत. सगळेच गाणे अगदी background म्युजिकहि अगदी चपखलपणे आपापल्या जागी बसलेले आहेत. यासाठी जितके संगीताचे कौतुक तितकेच कदाचित थोडे जास्त कौतुक गुरु ठाकुरचे.
मराठीत हिंदीसारखी अमाप चित्रपटसंख्या नसते, प्रतिसादाची पातळी बघता ते शक्यही नाही पण सर्व दृष्टीने परिपूर्ण मराठी चित्रपट कमी सापडतात हे हि तितकेच खरे आहे. तू हि रे ला एक नावं ठेवण्याची जागा नसलेला अप्रतिम मराठी चित्रपट मला वाटला म्हणून मी पूर्ण पाच 5* देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

वेलकम बॅक



वेलकम बॅक 
मागील वेलकम-१ च्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न अर्थात सिक्वेल किवा पार्ट टू म्हणून दिग्दर्शक अनिस बाझ्मी घेऊन आलेत “वेलकम बॅक”. वेलकम हा त्यांचा मागील याच्या आधीचा भाग प्रचंड गाजला होता. अनिस बाझ्मी यांचे चित्रपट तुम्ही बघायला जाता तेंव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी कि खूप मोठी पात्रांची गर्दी अन त्या प्रत्येक पात्राला महत्व मिळुन त्याचा कथेत कुठे-ना-कुठे समावेश करत सरकणारी कथा. ही नक्कीच बाझ्मी यांची खासियत आणि आपल्या कथेत गर्दीतील प्रत्येक पात्राला त्याच्या वकुबानुसार समाविष्ट करत अभिनय करवून घेणे ही एक जगावेगळी गोष्ट अनिस बाझ्मी यांना साधलेली आहे. नो एन्ट्री-रेडी आणि वेलकम-१ ही त्याची काही ठळक उदाहरणे.
कहाणी:
वेलकम बॅक मध्ये अनिस बाझ्मी यांनी आपल्या पहिल्याच वेलकम मध्ये अर्धवट सोडलेल्या कथेला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळी पात्र तीच आहे नाना-अनिल कपूर वगेरे पण नायक म्हणून जॉन अब्राहम आणि नायिका म्हणून श्रुती हसनचा समावेश आहे. मागच्याच वेलकम मधील कथेतील काही गाजलेल्या सिक्वेन्सला-डायलॉगजला वगेरे वगेरे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पुन्हा वापरण्याची चतुराई दिग्दर्शकाने दाखवलेली आहे.
दिग्दर्शन:
अनिस बाझ्मी यांनीच वेलकम-१ चे दिग्दर्शन केले होते. आधी म्हटल्याप्रमाणे पात्रगर्दी करून मग त्या गर्दीला कथेत गुंतवत कथेच्या अनुषंगाने सोडवणे ही अनिस बाझ्मी यांची खासियत. या वेळेसही त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला जाणवतो पण डाळ गळलेली नाही. पूर्वप्रसिद्धी केल्याप्रमाणे दुबईतील शुटींगचा थरार-वाळवंटातील साहसदृश्ये इत्यादी इत्यादी जगावेगळी चाल चालण्याच्या नादात काही बेसिक गोष्टी सुटलेल्या जाणवतात.बेसिक गोष्टी उदाहरणार्थ कथेला पुढे नेताना मान्य कि कॉमेडी सिक्वेन्स असल्यामुळे वास्तविकतेशी ताडण्याचा प्रयत्न चुकीचा पण प्रेक्षकांना मूर्ख समजत कहाणीचा प्लॉट उभा असेल आणि दिग्दर्शकच जर लेखकही असेल तर काय हास्यास्पद प्रकार होईल?? सगळ्यात जास्त खुपणारी गोष्ट म्हणजे कथेचा शेवट. साहसदृश्ये वगेरे वगेरे वाळवंटातील साकारताना ती अर्धवट/अपूर्ण राहतील कि काय अशी शंका एकदाही अनुभवी दिग्दर्शकाला येऊ नये??
अभिनय:
नाना पाटेकर आणि अनिल कपूरची भाई म्हणून साकारलेली जोडगोळी पहिल्या वेलकम मध्ये प्रचंड गाजली होती. हा कथेचा पाया तोच असल्याचे ओळखत अनिस बाझ्मी यांनी त्या दोघांना परेश रावल सोबत रिपीट केलेला आहे. नाना आणि अनिल कपूर याही वेळेस आपापल्या भूमिकात शोभून जातात. पण नायक म्हणून समाविष्ट केलेला जॉन अब्राहम त्याच्या कथेतील सहभागाच्या वेळेसच प्रेक्षकांची डोक्याची शीर तडकावतो आणि जो शेवटपर्यंत जमिनीवर येत नाही. पहिल्या वेलकम मध्ये असलेल्या फिरोज खानच्या सामावेशाप्रमाणेच यात नसिरुद्दीन शहाचा समावेश आहे. पण पहिल्या वेलकम मध्ये असलेला जो विनोदाचा तडका होता तो साधने नसिरुद्दीन शहाला अभिनयातून अजिबात जमत नाही.
संगीत:
रेडी म्हणा नो एन्ट्री म्हणा व वेलकम-१ संगीत ही ठळक गोष्ट होत अनिस बाझ्मी यांच्या कलाकृतींमध्ये. या वेळेस संगीत आघाडीवर सपशेल लोटांगण आहे. कोणाचं/काय वगेरे डीटेल्स आपण दुर्लक्षित करू पण एक मला जाणवलेली ठळक गोष्ट कि एक आयटम सॉंग होत, कायको-बायको-सायको अशी गाणे दृष्टीने व्यवस्थित साधलेली यमका-यमकी होती पण पुन्हा एकदा डाळ गळलेली नाही.

अनिस बाझ्मी यांचे चित्रपट बघायला प्रेक्षक आपापल्या पुर्वानुभावाप्रमाणे जातीलच पण सिक्वेल बघताना आजही भारतीय प्रेक्षकांची मानसिकता परंपरागतच आहे. येथे आजही तनु वेडस मनु सारख्या उत्तम प्रयत्नाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू शकतो. वेलकम बॅक हा पहिल्या वेलकमचा सिक्वेल मला तद्दन बाष्कळ आणि फालतू वाटला म्हणून मी फक्त नाना आणि अनिल कपूरच्या अभिनयासाठी एक १ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर