बाहुबली
अतिशय प्रचंड प्रमाणात प्रदर्शनपूर्व गाजावाजा झालेली कलाकृती, अडीचशे कोटीचे बजेट पासून अक्षरश: नवीन वसवलेल्या एका बोलीभाषे पर्यंत अनेकानेक दंतकथा आणि समोर येतो "बाहुबली"
दक्षिण भारतीय चित्रपटांची हि खरोखर खासियत असते कि कहाणीत कमतरता असतीलही कदाचित पण ते इतका जीव ओतून कहाणीला रंगवतात कि माणूस त्या जाणवणाऱ्या मेहनतीच्याच प्रेमात पडतो. भलेही काल्पनिक कथा अस डिस्क्लेमर सुरवातीला देऊनही व्यक्ती कहाणीत इतका गुंतून जातो कि नकळतपणे कहाणीच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतो.
अडीचशे कोटींचे बजेट, मग शानदार फॉरेन लोकेशन्स, जबरदस्त वेशभूषा, हाय-फाय चारचाक्या इत्यादी इत्यादी आपल्या अपेक्षेत असते हिंदी चित्रपटसृष्टीला अनुसरून पण यांपैकी काहीही नाही. उपरोल्लेखित गोष्टींपैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही तुम्ही चित्रपट रसिक असा वा नका असू बाहेर पडताना चित्रपटाबद्दल काहीही खराब बोलत नाही. दिग्दर्शक-पटकथा लेखक आणि सह कहाणी लेखक एस एस राजमौलीचे हेच सगळ्यात मोठे यश. माउथ-टू-माउथ पब्लिसिटिच्या पहिल्याच पायरीवर पुर्णपैकी पूर्ण गुण मिळवण्यात चित्रपटाला यश मिळते. हा दक्षिण भारतीय चित्रपट असल्यामुळे याचे हिंदी व्हर्जन आल्यास बाहुबलीची मुख्य भूमिका कुणी करावी असा विचार तुमच्या (हिंदी) मनातचमकलाच समजा तर मध्यंतराच्या आधीपर्यंत "कुणीही" चालेल असे वाटणारे आपण मध्यंतरा नंतर फक्त ह्रिथिक रोशन आणि टायगर श्रॉफ पाशी येउन थांबतो त्या दोघांच्या असलेल्या फिजिकल फिटनेस मुळेच.
हिंदी किंवा भारतीय असं म्हणू चित्रपटसृष्टीवर नेहमीच टीका होते कि टेक्निकली खूप खूप कमी आहे म्हणून. या टीकेला समर्थ नाही म्हणता येणार पण बर्याच अंशी उत्तर देणारी एक कलाकृती म्हणून भविष्यात बाहुबलीचे नाव घेतल्या जाईल. जास्त डिटेल आपल्याला कळत नाही पण लक्षात येणारी ठळक गोष्ट म्हणजे छायाचित्रण. विमानातून शूट करून जमिनीवरचे अगदी अप्रतिमरीत्या रेखाटलेले युद्ध. अक्षरश: इतके शानदाररित्या कि "३००" नावाचा एक हॉलीवूडपट आला होता त्याची बरोबरी करणारे छायाचित्रण अन स्पेशल इफेक्ट्स. मान्य करा वा नका करू पण हि गोष्ट भारतीय (सगळ्याच) चित्रपटसृष्टीत दुर्मिळ.
कहाणी:
दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे निर्विवादपणे नायक प्रधान. हि कहाणी थोडी प्राचीन काळची आहे. म्हणजे राज्य- राज्याचा अपेक्षित उत्तराधिकारी-त्यावरून रंगलेले नाट्य आणि त्याचा झालेला शेवट. हा शेवट नीटपणे न करता तेथेही स्पष्टपणे दिग्दर्शकाने सिक्वेलची मुहूर्तमेढ केलेली आहे. म्हणजे कहाणीला पुढे नेण्यासाठी का होईना पण बाहुबली पार्ट टू नक्की येणारच.
अभिनय:
कहाणीत दोन भाऊ प्रभास आणि राणा दग्गुबत्ती. पण त्यांचा उल्लेख न करता बाहुबली पुढे सरकरणारच नाही.आता कहाणीच थोडीशी वेगळी मग नायकही त्या भूमिकेला तोलून धरणारा हवा. पण सांगण्यास आनंद कि प्रभास आणि राणा दग्गुबत्ती हे दोघेही शब्दश: पुरून उरतात आपापल्या भूमिकांना. प्राची कालचे युद्ध, घोडेस्वारी, रथांचे handling आणि रथांवरून युद्ध कौशल्य दाखवणे इत्यादी इत्यादी बाबी खरोखर अप्रतिम रित्या राजामौलीने हाताळलेल्या आहेत. नाही म्हणायला थोड्यावेळासाठी तमन्ना देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण मध्यंतरानंतर थोड्या वेळाने ती गायब होते आणि पुन्हा दर्शन देत नाही . तिच्या भूमिकेच्या अस्तित्वाचे मुख्य कारण प्रभास (बाहुबलीच्या) व्यक्तिरेखेचे आपल्याच जीवनाच्या भूतकाळातले आगमन बस. एक गाणही आहे पण तोंडी लावण्यापुरते. एम एम करीमला काही काम. अभिनयासाठी सत्यराज म्हणजेच कटप्पाचा उल्लेख करावाच लागेल. एका महत्वाचा सहाय्यक भूमिकेत तो आहे. कोठेही अतिशयोक्ती न होऊ देत अप्रतिमरीत्या आपले फक्त अस्तित्व जाणवून गेलाय तो.
कोणताही चित्रपट का बघावा किंवा का बघू नये याची कारणे व्यक्तिपरत्वे बदलतात. या कारणात वय-आणि अनुभव हे महत्वाची भूमिका बजावतात. एकादी गोष्ट जी मला आवडते तिचा एखाद्या वाचकाला तिटकारा असू शकतो. पण तरीही रिव्ह्यू मी लिहिला अन तो तुम्ही वाचताय या न्यायाने मी बाहुबलीला दिग्दर्शन-स्पेशल इफेक्ट्स आणि सगळ्याच अभिनेत्यांच्या मेहनतीसाठी पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा