बजरंगी भाईजान
मागच्याच पंधरवड्यात आपण एक आयडियल आणि अद्भुत दक्षिण भारतीय कलाकृती अनुभवली. मग आता या कलाकृतीला आपण हिंदीत आपल्या स्टाईलने टक्कर द्यायला नको? याच इच्छेला दमदार उत्तर देण्यासाठी आलाय बजरंगी भाईजान.एक परिपूर्ण अन उत्कृष्ट कलाकृती.
कहाणी:
मुन्नी (हर्षाली मल्होत्रा) हि एक पाकिस्तानी मुलगी. कर्मधर्मसंयोगाने चुकून पाकिस्तानातून भारतात हरवून येते आणि ती आपल्या पवन कुमार चतुर्वेदी उर्फ बजरंगी भाईजान (सलमान खान) ला सापडते.
तो आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला तिच्या आईपर्यंत पाकिस्तानात कसा पोचवतो या मुख्य धाग्याभोवती गुंतलेली कहाणी म्हणजे बजरंगी भाईजान. आता कुणालाही शंका येईल कि त्यात काय विशेष म्हणून. आणि ते खरेही आहे पाकिस्तानात एका हरवलेल्या मुलीला पोचवणे यात काहीही तीर मारण्यासारख नाही. पण जर ती मुलगी मुकी असली तर? हो ती मुलगी मुकी असते!!! तिला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊन एका मुक्या मुलीला तिच्या घरी पाकिस्तानात पोचवणे हा नक्कीच एका कहाणीचा विषय आहे. मग कहाणी हिंदी म्हणजे प्रेम,मैत्री,द्वेष इत्यादी इत्यादी भावना वेगवेगळ्या अनुषंगाने कथेत डोकावतात. गाणेही असतातच. पण भारतीय (हिंदी) मानसिकतेसाठी महत्वाच प्रकरण म्हणजे कहाणी. या एंड वर सलमानने पूर्ण यशस्वीपणे बाजी मारलेली आहे.
अभिनय:
सलमान खानचे कौतुक शब्दश: करावे तितके कमी इतके शानदारपणे त्याने पवन चतुर्वेदी उभा केलेला आहे. एका रिटायर्ड वेद विशारद पहलवानाचा मुलगा. पहलवानी आणि अभ्यासातही कमी. त्याच्या आयुष्यात अचानक घडलेला बदल. आयुष्यात झालेले नायिकेचे आगमन. आणि या सगळ्या कोलाहलातून त्याने केलेली मानवतेच्या पातळीवर एका मुक्या मुलीची मदत. करीना कपूर देखील एक नायिका म्हणून चित्रपटात आहे. पण तुम्ही बाहेर निघता तेंव्हा तुमच्या लक्षात राहतो तो सलमान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी. वास्तविक बघता नवाजुद्दिन सिद्दिकी हा एका सहाय्यक भूमिकेत आहे आणि त्या भूमिकेचे कथेतले आगमनही मध्यंतरानंतर होते. पण बाहेर पडताना तुम्हाला लक्षात राहतो तो त्याने रंगवलेला सहाय्यक आणि सालमन हे दोघच बस. हर्षाली मल्होत्रा या छोकरीचे कौतुक केल्याशिवाय बजरंगी भाईजानच्या अभिनयाचा उल्लेखही भविष्यात होणार नाही इतकी छाप तिने सोडलेली आहे. तिने रंगवलेली शाहिदा (मुन्नी) हि एक मुकी मुलगी आईपासून दूर आणि आईच्या शोधात. वाचताना महत्व फक्त एका वाक्यात संपत असल तरी बघताना पूर्ण चित्रपट उभा राहिला राव तीन तासांचा. खरोखर छोकरी अक्षरश: शाहिदा म्हणून जगलेली आहे पूर्ण कहाणीभर
दिग्दर्शन:
कबीर खान या आपल्या एक था टायगर वाल्या शिपच्या कप्तानाला यावेळेस सलमानने स्वत: एक निर्माता बनल्यावर रिपीट केलेला आहे. एक था टायगर मध्ये देखील भारतीय आणि पंजाबी जासूस यांची प्रेमकहाणी अशी वेगळीच थीम होती. आणि या वेळेस तर कहाणी खूपच वेगळी होती. पण कबीर खान स्वत: कहाणी सहलेखक आणि पटकथा व संवाद लेखकही असल्यामुळे तो सर्व आघाड्यावर शीपचा कप्तान होता. वास्तविक बघता भारत-पाकिस्तान मधील दरीला आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात सांधणे असा एक स्तुत्य प्रयत्न होता. भारत आणि पाकिस्तानमधील सर्वसामान्य लोकांना हि दरी नकोय. त्यांना हवाय तो शांततेचा मार्ग. हा संदेश देताना समोर सलमान असल्यावर आणि किक व जय हो च्या अपयशानंतर सर्व नजर बजरंगी भाईजान वर असल्यावर इतक्या स्फोटक कहाणीला दमदारपणे पेलून दाखवणे म्हणून कबीर खानचे कौतुक करावेच लागेल.
त्याच्या दिग्दर्शन शैलीच्या वेगळेपणाचे एकच उदाहरण घेऊ, कोणत्याही कहाणीला प्रेक्षकांच्या आतपर्यंत झिरपण्यास कोणत्याही सिनेमाचे पहिले दहा मिनीट मुख्य भूमिका बजावतात. या दहा मिनटात समोर पडद्यावर कुणीही असू दे पण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे. बजरंगीमध्ये पहिल्या दहा मिनटात सलमान नसतो पडद्यावर पण एका छोट्या मुलीला अप्रतिम रित्या हाताळून कबीर खान प्रेक्षकांना आपल्या खुर्चीवर पुढील तीन तास खिळवून ठेवतो. एक था टायगर मध्ये पहिल्या दहा मिटताच तो प्रेक्षकांना flash back थ्रू कहाणीच्या मुळावर नेतो. मान्य असू दे वा नसू दे पण हि नस जी कबीर खान ला गवसलेली आहे ती भविष्यात त्याला एक यशस्वी दिग्दर्शक पातळीवर नेईल हे नक्की.
संगीत:
बजरंगी भाईजान मध्ये संगीत प्रीतम चे आहे. वैयक्तिक रित्या प्रीतम जा मला नेहमीच वन सॉंग वंडर वाटत आला आहे . प्रीतम हा संगीत दिग्दर्शक असलेल्या बर्याचश्या सिनेमात केवळ एक गाण हे इतके अप्रतिम असते कि बर्याचदा केवळ ते गाणे कमर्शियल पातळीवर चालून जाते आणि बाकी ठणठणगोपाळ. धूम (टायटल सॉंग), रेस- १ (जरा जरा टच मी), ये जवानी है दिवानी (बदतमीज दिल) हे त्याची काही उदाहरणे. याही सिनेमात सगळेच गाणे आपापल्या जागी शोभतात पण आपल्या किर्तीनुसार एक गाणे अप्रतिम देऊन गेला आहे प्रीतम. अदनान सामी ची कौसर मुनीर लिखित गझल "भर दो झोली मेरी". या गाण्याचं सिच्युएशन इतक जबरदस्त होत आणि त्या गझलचे बोलही त्या प्रसंगाला साजेसे आहेत. सेल्फी ले ले सारखा "वेळ मारून ने" टाईप काम नाही. अदनान सामीने ती गझल अगदी अप्रतिम रित्या निभावलेली आहे. त्याच्या बुर्सटलेल्या वजनापेक्षाही ती गझल आणि त्याचे बोल प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
हिंदी सिनेमा कसा असतो? तर तो कहाणीवर अवलंबून असतो, त्या कहाणीला चारही अंगाने फुलवतो त्यातला कलाकारांचा अभिनय.पण हिंदी सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमासारखा व्यक्तीपुजक नसल्यामुळे कहाणी जर प्रेक्षकांना भावली तर आणि फक्त तरच कोणत्याही सिनेमाला हिंदीत हिट असा दर्जा मिळतो. केवळ एखाद्या अभिनेत्याची उपस्थिती हे हिंदीत कमर्शियल यशस्वीतेतच लक्षण नसते. याच आपल्या मागच्या जय हो आणि किक या आपल्या मागील अपयशावरून सलमान खान ने जबरदस्त धडा घेऊन बजरंगी भाईजान आणलेला आहे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असा हा हिंदी चित्रपट मला आवडला आणि नावं ठेवण्या इतकी कोणतीही गोष्ट यात जाणवली नाही म्हणून मी चित्रपटाला पूर्ण ५* देईन पाच पैकी बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा