जर तरची गोष्ट
इरावती कर्णिक लिखित आणि अद्वैत दादरकर - रणजित पाटील दिग्दर्शित "जर तरची गोष्ट" या नाटकाचा २५२ व्वा प्रयोग बघण्याचा योग आज जुळून आला. ‘जर आणि तर’ मध्ये अडकलेल्या नात्याच्या, हसण्याच्या आणि रुसण्याच्या या विचित्र (!) गोष्ट निर्मितीचा प्रयत्न प्रिया बापट हिचा आहे.
समर (उमेश कामत) आणि राधा (प्रिया बापट) यांचे लग्न, लग्नानंतरचा डिव्होर्स आणि डिव्होर्सनंतर पल्लवी अजय (सती) आणि आशुतोष गोखले (अबीर) यांच्यासोबत जुळलेली नाती आणि नंतर सरतेशेवटी या नवीन नात्यातून परतलेली जुनी कहाणी असा सगळा गोतावळा म्हणजे "जर तरची गोष्ट" !
तर या कहाणीचा थोडाफार अंदाज वाचकांना लागला असेलच , तर पुढे जाऊन आपण कथेबद्दल जास्त काय बोलावे ? तर झाले असेल असे कि चार मित्र जमले असतील, आणि ठरवले असेल कि आपण नाटक काढू ! प्रिया म्हणाली असेल मी निर्मिती करते इरावती बाई लिहून देतील. मग कहाणी "आजकाल असेच असते" या सदराखाली सगळ्यांनी मिळून फायनलाईझ केली असेल.
दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील या दोघांनी मिळून केले आहे. बस या एका वाक्याउपर त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल काय सांगावे ?? शब्दमर्यादेनं दम तोडला माझ्या !!
मराठी रसिक हा एक निर्बुद्ध प्राणी असून आपण काहीही दाखवले तरी आपल्या "इमेजखाली" ते चालवून घेतल्या जाईल असा गैरसमज होण्याइतके उमेश कामत आणि प्रिया बापट मोठे स्टार मराठीत आहेत का ?? मी या नाटकाला माझे पैसे खर्च करून तिकीट काढून गेल्यामुळे मी या नाटकाला पाव (१/४)* देईन बाकी निर्णय मायबाप प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
(१५/६/२०२५)

