सोमवार, २५ जानेवारी, २०१६

गुरु (मराठी)


गुरु (मराठी)

मराठीतले करिष्माई दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘दुनियादारी’ आणि ‘तू ही रेया मागील वर्षीच्या  सिनेमांच्या यशानंतर आता  ‘गुरू’ हा नवा सिनेमा घेऊन आलेले आहेत. मराठी सिनेमाचा एकूणच प्रेक्षकवर्ग बघता हा सगळा इत्यंभूत विचारशील प्रेक्षकवर्ग असतो त्यामुळे दक्षिण भारतीय पद्धतीच्या कथा पडद्यावर मांडल्यावर प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील हे बघण्यासारखे राहील. दुनियादारी अन तू हि रे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून गेले. कदाचित त्यामुळे या चित्रपटाची पब्लिसिटी इतर मराठी सिनेमांपेक्षा भरपूर होत असल्याचे जाणवले. त्यात दिग्दर्शक संजय जाधव हेच स्वत: निर्माता जोडीपैकी एक निर्माता बनलेत या सिनेमासाठी त्यामुळेही कदाचित फरक पडला असावा. कारण काहीही असो पण पब्लिसिटी इतक्या प्रमाणावर आहे कि बस.

संजय जाधव यांनी दुनियादारी मध्ये तरुणाई अन तू हि रे मध्ये प्रेम व्यवस्थित हाताळल होत. इतर मराठी दिग्दर्शकांपेक्षा निश्चितच उत्तम रीतीने. गुरु मध्ये संजयजी स्वत:च लेखक जोडीपैकी एक (आशिष पाठारे सोबत) असल्यामुळे कि काय पण कहाणीत एकदम नवीन विषय निवडला आहे. पहिल्या पंधरा मिनिटात "गुन्हेगारी विश्वाकडे" वळणारी कथा असे इम्प्रेशन देणारी कहाणी नंतर उर्मिला कोठारेच्या कथेतल्या आगमनानंतर "प्रेमाकडे" वळली असे वाटते आणि मध्यंतरापर्यंत पोचेपर्यंत स्थलांतरितांच्या प्रश्नांना हात घालते. कितीही नाही म्हटल तरी इतक्या शिताफीने इतक transformation आणि ते हि मराठीत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या या विषयांना मांडणी करून प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत याची काळजी ही संजयजींनी घेतल्याचे बरेचदा जाणवते. या कहाणीचा शेवट कसा होतो हे निश्चितच बघण्यासारखे आहे कारण त्यातही मुरली शर्मा या हिंदीतल्या कसदार रंगमंच अभिनेत्याला खलनायक म्हणून मराठीत संजयजींनी गळाला लावून बाजी मारलेली आहे. मुरली शर्मा मराठी उच्चारात कोठेही कमी पडत नाही आणि खलनायक म्हणून छाप सोडून जातो.

संजयजिचा मराठी चित्रपट म्हणजे स्वनिल जोशी अन सई ताम्हणकरची जोडी अस आजवर समीकरण होत. त्यांनी एकाच वर्षात दोनदा तिकीटबारीवर हे समीकरण गाजवूनही दाखवल. पण गुरु मध्ये मात्र समीकरण बदलून दुनीयादारीतला दिग्या म्हणजेच सुपरस्टार अंकुश चौधरीला मुख्य अभिनेता म्हणून पुढे आणलेले आहे. अंकुश चौधरीचे कौतुक कारण त्याने दिग्दर्शकाच्या नवीन प्रयोगाला साथ देत मराठी चित्रपटात दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिक्वेन्सेस पेलून दाखवले. फायटिंग सिक्वेन्सेस बघून असे वाटले कि दक्षिण बारतीय पध्दतीप्रमाणे नायकप्रधान शेवट असेल पण तेथेच कदाचित संजयजी मधलं मराठीपण जागलं आणि मराठी पद्धतीप्रमाणे त्यांनी कथेचा शेवट करवला.  दुनियादारी मधल्या मीनूचे  म्हणजेच उर्मिला कानेटकरचे  ओवी या नावाने नायिका म्हणून  प्रेक्षकांना दर्शन घडते. तिने तिचा वाटा व्यवस्थित निभावला असून एका मुख्य अभिनेत्रीचे पात्र व्यवस्थित निभावलेले आहे.पण विशेष कौतुक अभिनयासाठी खलनायक मुरली शर्माचे कारण त्याने मराठीतला नसूनही मराठीत व्यवस्थित सगळ हाताळलेल आहे.   
  
संगीत हा मराठी प्रेक्षकांसाठी जिवाभावाचा विषय कारण मराठीत संगीत असते ते गाण्यांना म्हणजेच बेसिकली कवितांना आणि झुक्या रोजच दर्शन घडवतो कि मराठीत कवी-कवियित्री किती मुबलक आहेत याचे. पण सांगण्यास खरोखर आनद कि अमितराज-पंकज पडघन आणि प्रफुल्ल कार्लेकर असे तीन संगीत दिग्दर्शक असूनही संगीत उच्च पातळीचे आहे. दुनियादारी आणि तू हि रे मध्ये संगीत हे उच्च दर्जाचे होते. तीच संगीताची क्वालिटी संजयदाने गुरु मध्येही मेंटेन केली आहे स्वत: निर्माता बनल्यावर सुद्धा. "फिल्मी" आणि "mango डॉली" या दोन गाण्यांचा विशेष उल्लेख संगीतासाठी होइल.

फिल्म इंडस्ट्रीत  गुरु म्हटला कि  आधी आठवायचा मणिरत्नमचा आणि अभिषेक बच्चनच गुरु जो रहमानने सजवला होता. आपला मराठीतला गुरु अगदी तितका उच्च पातळीवर पोचला नसला तरी नेहमीसारखा विस्मृतीतही जाणार नाही. मला हा चित्रपट दिग्दर्शन-कहाणी आणि विशेष म्हणजे संगीत या साठी आवडला म्हणून मी चित्रपटाला ३.५ * देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर         

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

एयरलिफ़्ट



एयरलिफ़्ट

तेलाच्या भांडणात, सद्दामच्या सुवर्णकाळात, इराकने कुवैतवर आक्रमण केले, त्या काळात कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी कदाचित मानवी इतिहासातील सगळ्यात मोठी सुटका मोहीम (Evacuation) आखण्यात आली होती. जरा इकडे-तिकडे वाचन करण्याची सवय असेल तर या मोहिमेचे  कौतुक बरेच ठिकाणी बघितले असेल. या कथेपासून प्रेरित होऊन अक्षय कुमार त्या कथेवर बेस्ड सिनेमा घेऊन आला असून एक मनापासून केलेला चांगला प्रयत्न असे याचे वर्णन करता येईल. या मोहिमेत जवळपास दिड लाख लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे भारतात २०० विमानांच्या सहाय्याने आणण्यात आले होते असे मी वाचले होते, म्हणून मला उत्सुकता होती कि तितकी adjustment शुटींग मध्ये दिग्दर्शकाने कशी केली असेल पण चित्रपटात हजाराच्या आसपास व्यक्ती होते. कदाचित तितका practical बदल cinematic लिबर्टी म्हणून दिग्दर्शकाने घेतला असावा.

कहाणी:
१९९० साली १५ बिलियन डॉलरचे कर्ज इराकवर कुवैतचे होते. या कर्जाला चुकवणे तर दूरच पण वेगवेगळ्या कारणांना उकरून काढून इराकने कुवैतवर आक्रमण केले होते. त्या काळात बरेचसे भारतीय पोटापाण्यासाठी कुवैतमध्ये गेले होते, साहजिकच ते युद्धात फसले. त्या लोकांना सोडवून सुरक्षितपणे परत आणण्यासाठी "ऑपरेशन सेफ होमकमिंग" नावाची जी मोहीम आखण्यात आली होती त्या मोहिमेचे पडद्यावर रेखाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे एयरलिफ़्ट. 
         
अभिनय:
अक्षय कुमार यात रणजीत कट्याल या व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे जो सगळ्यांना व्यवस्थित सोडवून परत आणतो. हि बहुधा काल्पनिक भूमिका असावी कारण मी तरी या व्यक्तीचे नाव कुठेही वाचले नाही. अक्षय कुमार एक खरा प्रोफेशनल अभिनेता कारण तो या मोहिमेचे नेतृत्व करणारा व्यावसायिक म्हणून शोभून गेला चित्रपटभर. एक उच्चपदस्थ दुसर्या देशात जाऊन प्रसंग आल्यावर भारतीय म्हणून भारतीयांच्या मदतीला धावून गेलेला व्यक्ती हि विचित्र सिच्युएशन अक्षय कुमारने एका अभिनेत्याच्या सराईतपणे हाताळली. नेतृत्व करत असताना त्याला येणारे अनेकानेक प्रॉब्लेम्स, ते सोडवताना त्याची दमछाक इत्यादी व्यवस्थित साकारले अक्षयने. आधीच्या काळात मनोज कुमार प्रसिद्ध होता कि जो फक्त देशभक्तीपर कहाणी असलेले चित्रपट आणून चालवून दाखवायचा. सध्याच्या पिढीत मला वाटते अक्षय कुमार त्याच मार्गावर चालायला लागलेला आहे.

दिग्दर्शन:
 राजा कृष्ण मेनन हे दिग्दर्शक आहेत एयरलिफ़्टचे, त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात खूप मोठा विषय हाताळण्याची हिम्मत त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यात कुठेही ते कमी पडत नाहीत. दीड लाखांची व्यक्तीसंख्या शुटींगसाठी सोयीचे म्हणून हजारावर खाली आणणे हि सगळ्यात मोठी adjustment त्यांनी केली. या चलाखीला कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही कारण १९९० म्हणजे जवळपास २६-२७ वर्षे मागे जाऊन उकरून काढण्याइतका उत्साह कोणीही दाखवणार नाही. पण त्या मोहिमेत श्री.बेदी नावाचे केंद्र सरकारचे विदेश मंत्रालयातील एक आयएएस  अधिकारी होते. त्यांनी प्रचंड मेहनत/मदत/भारतातील नेतृत्व इत्यादी केले होते असे वाचल्याचे मला पक्के आठवते. त्यांचा सिनेमात उल्लेख नाही. हे मला चुकीचे वाटले कारण सुरवातीला तुम्ही रियल लाइफ़ बेस्ड अशी पाटी देता आणि अशी कन्नी मारता. पण कदाचित माझा जो सोर्स होता तो faulty असेल किंवा यांचे महत्व कहाणीत तितकेसे नसेल. 

संगीत:
सुरवातीचे एक आयटम सॉंग सोडले तर चित्रपटात गाणेच नाही. पण ती कमी दोन्ही  संगीत दिग्दर्शक अंकित तिवारी आणि अमाल मलिक यांनी पार्श्वसंगीतात भरून काढलेली आहे कारण पार्श्वसंगीताचा मुबलक वापर चित्रपटभर आहे. 

कोणताही मालमसाला नसलेले अन मुख्य म्हणजे संगीत विरहीत पूर्णपणे कहाणीवर अवलंबून असलेले चित्रपट खूप कमी असतात,एयरलिफ्ट त्यापैकीच एक. मला चित्रपट आवडला म्हणून मी चित्रपटाला ३(तीन) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

कार्टी काळजात घुसली


कार्टी काळजात घुसली (मराठी नाटक)

प्रशांत दामले fan फाउंडेशन या नावाने निर्मात्या सौ गौरी प्रशांत दामले या नवीन नाटक घेऊन आल्या असून एक उत्तम प्रयत्न असे या नाटकाचे वर्णन करता येईल.वसंत सबनीस हे या नाटकाचे लेखक असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उचललेली आहे.होणार सून मधली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान या नाटकात मुख्य स्त्री भूमिकेत असून नाटक म्हणजे एखाद्या मालिकेसारख (वेळकाढू) प्रकरण नसून एक लाइव्ह अभिनय प्रकरण आहे हे समजून-उमजून तिने प्रशांतजींना समर्थपणे साथ दिलेली आहे.

कहाणी:
कार्टी काळजात घुसली म्हणजे बापापासून दुरावलेल्या एका मुलीची कथा जी आपल्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते. वास्तविक बघता तेजश्री प्रधान हि नाटकात नायिका आहे असे म्हटल्यावर तिची आणि प्रशांतजींची जोडी कशी जमवली असेल याबाबत प्रेक्षकांना उत्कंठा वाटणे साहजिक आहे. पण लेखक वसंत सबनीस यांनी हि उत्कंठा पुरेपूर शमवली असून पहिल्या पंधरा मिनिटातच उत्तर मिळते प्रेक्षकांना.

अभिनय:
नाटकाभीनयाचे जागतिक विक्रमकर्ता प्रशांत दामले  हे संगीतकार के के आणि तेजश्री प्रधान हि त्यांची मुलगी कांचन यांच्या भूमिकेत असून त्या दोघांनी आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे.

प्रशांत दामले यांच्या केके चा उल्लेख विशेष करून त्यांच्या विनोदाच्या टायमिंग साठी. मान्य कि नाटक लिखित संहितेत असते पण तरीही त्यातील विनोदाला लाइव्ह प्रेक्षकांसमोर उभा करणे कथेतील विनोदाच्या टायमिंग चुकू देता आणि नाटकाचा मूळ विषय बघता मुळातील गंभीरतेच्या गाभ्याला धक्का लागू देता हे मुख्य अभिनेत्यासाठी निश्चितच कौतुकास्पद. प्रशांतजींचे कांचनसोबतचे काही प्रसंग हे कथेला पुढे सरकवण्यासाठी भावनात्मकदृष्ट्या आव्हानात्मक होते. ते हि त्यांनी अप्रतिम रित्या निभावून नेलेत. म्हणजे एकच व्यक्ती तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात रंगमंचावर लाइव्ह प्रेक्षकांसमोर भावनात्मक (इमोशनल) प्रसंग निभावतो आणि संहितेतील विनोदाच्या फोडणीलाही पुरून उरतो हे निश्चितच कौतुकास्पद आहे.  आणि याच सोबत काही प्रसंगात प्रेक्षकांना त्यांच्या गायनकलेचेही दर्शन घडते

तेजश्री प्रधान हिने रंगवलेली भूमिका म्हणजे कांचन१८ वर्षांपासून वडलांपासून दुरावलेली एक मुलगी जेंव्हा परत आपल्या वडिलांना भेटते तेंव्हाची एका मुलीची दोलायमान मन:स्थिती तेजश्रीने अप्रतिम रित्या उभी केलेली आहे. काही प्रसंगात तिची भूमिका कथेला पुढे नेण्यासाठी एक सपोर्ट इतकीच मर्यादित आहे तर काही प्रसंग पूर्ण तिच्या भूमिकेच्या गांभीर्यावर उभे आहेत पण सांगण्यास कौतुक कि तिने समर्थपणे सगळे प्रसंग तोलले आणि निभावून नेलेले आहेत. होणार सून मधल्या जान्हवीमुळे तिला घरोघरी प्रसिद्धी मिळाली पण या नाटकामुळे तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळेल.

कोणत्याही नाटकात पटकथा एक महत्वाची भूमिका बजावते. या नाटकात भावनात्मक प्रसंग उभे करण्यात पटकथा आणि संवाद लेखक कमी पडले अशी शंका प्रेक्षकांना बाहेर निघताना येते. अर्थात व्यक्ती-दरव्यक्ती आकलन करण्याचा फरक असल्यामुळे असेल कदाचित पण मला असे वाटले म्हणून मी या नाटकाला प्रशांतजी आणि तेजश्री दोघांच्या अभिनयासाठी साडे तीन   [ /]* दिन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर