दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर
सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली २ म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेल. एखादा हॉलिवूडचा सिनेमा ज्या शिताफीने कम्प्युटर ग्राफिक्सचा उपयोग करून सजलेला असतो, त्याला टक्कर देणारी कम्प्युटर ग्राफिक्सची करामत बाहुबली २ मध्ये आहे. जवळपास प्रत्येक फ्रेम मध्ये असणारी कम्प्युटर ग्राफिक्स ची करामत जेंव्हा तुम्हाला कोठेच ओळखू येत नाही पूर्ण वेळ, तेंव्हा निश्चितच अप्रतिम पातळीवर पोचलेला सिनेमा असे याचे वर्णन करावेच लागेल.

बाहुबली २ म्हणजे बाहुबली १ च्या कथेबरोबर होणारी तुलना हे अपेक्षितच आहे. पण लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या पटकथेबरोबर ज्या शिताफीने कथेची मांडणी केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण बाहुबली २ हा कोठेही कहाणीसाठी बाहुबली १ वर अवलंबून वाटत नाही, जेथे आहे तेथे कहाणीचा संदर्भ संवादांच्या माध्यमातून बेमालूमपणे पडद्यावर उभा करण्यात आला आहे. जेणेकरून प्रेक्षकांना कोठेही "समजले नाही" असा फील येतच नाही.अडीचशे कोटींचे शब्दश: महाप्रचंड बजेट असलेल्या चित्रपटाकडून हे अपेक्षितही होतेच म्हणा.पण तरीही असं वाटण्याचं execution अप्रतिमरीत्या पडद्यावर केलेलं आहे हे नक्की. मागच्या बाहुबली १ मध्ये कटप्पा ने बाहुबलीला का मारलं याचा उल्लेख कमीत कमी या कथेत होईल असे वाटते पण नाही, कथेत/संवांदांत तो संदर्भ आहे पण तुटपुंजा आहे अगदी.
प्रभास चा बाहुबली, राणा दग्गुबत्तीचा बल्लालदेव अन सत्यराजचा कटप्पा हे नायक आणि अनुष्का शेट्टीची देवसेना या सगळ्या नायक नायिकांची कामगिरी उल्लेखनीय या सदरात मोडते. तमन्नाहि आहे काही प्रसंगात पण अगदी काहीच प्रसंगात. प्रभास ने ज्या कमांड ने बाहुबली (अमरेंद्र + महेंद्र) उभा केलेला आहे त्याला खरोखर तोड नाही. बल्लालदेवचा राजा बनण्याचा हव्यास, त्यासाठी तो करत असलेले षडयंत्र, कटप्पाची बाहुबलीला असलेली साथ इत्यादी इत्यादी विषयाबरहुकूम प्रसंगात प्रत्येक जण शोभून गेलेला आहे. अनुष्का शेट्टीही मुख्य नायिका आहे पण ती शब्दश: सुंदर दिसलेली आहे पूर्ण सिनेमात. अगदी शेवटच्या काही प्रसंगात तिचे म्हातारे दिसणे आवश्यक होते. पण ती कदाचित प्रयत्न करूनही म्हातारी दिसू शकलीच नाही.
प्रभास अन राणा दग्गुबत्ती हे दोघेही फिजिकली शब्दश: प्रचंड मेहनत घेत असल्याचे जाणवून देतात कैक प्रसंगात. तुलना करु नये पण आपला हिंदीतला अक्षय कुमार सोडून कोणीही करोडपती अभिनेता इतकी मेहनत घेऊ शकत नाही हे नक्की. आपली खानावळ जिम वगैरे करून "दाखवू" शकतात फिजिक पण ज्या मेहनतीची जाणीव प्रभास करवतो तसे हिंदीत कुणालाच शक्य नाही आणि मराठी तर कुठे स्पर्धेतही नाही करोडोंच्या. आपल्या मराठीला आता सैराटचीच पुण्याई शंभरएक वर्षे पुरेल आणखी..........
एस एस राजामौलीनचे दिग्दर्शन हे बाहुबली श्रुंखलेचे सगळ्यात मोठे यश. मान्य कि सगळे अभिनेते आपापल्या भूमिकांत शोभले पण अडीचशे कोटींच्या
जहाजाचा कॅप्टनच कचखाऊ असता तर?? अडीचशे कोटींचा प्रोजेक्ट धुळीला मिळाला असता. पण एस एस राजामौलीचे खरोखर कौतुक. कारण त्यांनी दुसरा भाग असूनही प्रेक्षकांना कुठेही 'न समजल्याची' भावना येऊ दिली नाही. तीन तासांच्या चित्रपटांत प्रत्येक फ्रेम इंग्रजी शब्द आहे ना "लॅव्हिश" त्याप्रमाणे चित्रित केली. बाकीचे जाऊ देऊ देऊ डिटेल्स पण प्रभासची एंट्री हि खास असली पाहिजे हा एक उल्लेखनीय असा
त्यांचा कटाक्ष. पहिल्या बाहुबलीत खांद्यावर शिवलिंग घेत त्याचे महत्व सांगत तर दुसऱ्या बाहुबलीत राजमातेची अग्नीला घेऊन जाण्याची कवायद सुरु असतानाची हत्तीच्या फायटिंग मधली एंट्री. मान्य कि या
फायटिंगमधला बराचसा भाग हा कम्प्युटर ग्राफिक्स असावा. पण हा एंट्रीचा महत्वाचा भाग हा भरपूर मेहनत करून किंवा कम्प्युटर ग्राफिक्स असल्यास भरपूर पैसे खर्च करून चित्रित केल्यासारखा वाटतो. पहिल्या बाहुबलीत एंट्री नंतर पूर्ण चित्रपटभर प्रभास भरून राहिला होता. या त्याच्या 'भरून राहण्यात' त्याच्या एंट्रीचा महत्वाचा वाटा होता. तेच काम बाहुबली २ मध्येही त्याच्या
एन्ट्रीमुळे घडते. या लहानश्या निरुपद्रवी पण अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी एस एस राजामौलीचे विशेष कौतुक.
एम एम करीम चे संगीत बाहुबली २ ला लाभलेले आहे. एम एम करीम मला जिस्म मधल्या 'आवरापन बंजारापन" या गाण्यामुळे आठवतात अन आवडतात. बाहुबली २ मध्ये एकदम छप्पर फाड के अत्युत्तम संगीत नाही. पण कमीही पडत नाही कुठेच.
अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा महेंद्र बाहुबलीची एंट्री कथेत झालेली आहे. त्यामुळे बाहुबली ३ पुढच्या काही वर्षात पडद्यावर आल्यास आश्चर्य वाटायला नको. हॅरी पॉटर चे अनेक भाग,
सगळे सारख्याच पात्रांचे पण कथेच्या नाविन्यामुळे आम्हीच भारतीय दर वेळेस डोक्यावर घ्यायचो. मग बाहुबलीची आणखीही भाग आले तर प्रेक्षकांनी स्वीकारण्यात काहीही हरकत नाही कारण टेक्निकली बाहुबली २ हा बाहुबली १ पेक्षा हाताळणीत सरस वाटला मला. म्हणजेच एस एस राजामौली अनुभवांतून शिकताहेत हे नक्की. कोणतीही खोट नसलेल्या बाहुबली २ ला मी पाच पैकी पाच (५*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा .
-समीर