रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

शिवाय

शिवाय

अभिनेता अजय देवगण हे आता दिग्दर्शक बनले असून कारकिर्दीतील या नव्या टप्प्यात प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून, शिवाय हे त्याचे नाव. कोणत्याही नवीन दिग्दर्शकाची पहिली कलाकृती जेंव्हा प्रेक्षक बघायला जातात तेंव्हा दिग्दर्शकांचे मूळ कल्पनेशी\कहाणीही\कन्सेप्टशी     एकनिष्ठ राहण्याच्या प्रयत्नात कहाणीची होणारी वाताहत हा एक कॉमन  सिन असतो. कौतुकास्पदरित्या अजय यातून सुटला असून एका वेगळ्या पण कदाचित मेनस्ट्रीम चित्रपटांशी फटकून असणाऱ्या कहाणीही एकनिष्ठ राहूनही अन मुख्य अभिनेता असूनही त्याची कहाणीवरील पकड अजिबात ढिली होत नाही.


शिवाय हा एक गिर्यारोहण प्रशिक्षक, त्याचे एका विदेशी युवतीशी फुललेले प्रेम अन त्याच्या मुलीचे विदेशी गुन्हेगारांकडून/अंग-तस्करांकडून झालेले अपहरण अन त्याने केलेला तिचा बचाव अशी एकदम वेगळीच कहाणी शिवाय मध्ये बघायला मिळते

अजय देवगण यात मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक दोन्हीहि असून, दोन्ही आघाडयांवर पुरेपूर प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरतो. शिवाय म्हणून त्याचे गिर्यारोहण प्रशिक्षक म्हणून वर्तन असो\ प्रेमाच्या आघाडीवर फुललेले रूप असो\ मुलीला वाचवताना व्याकुळलेला बाप असो सर्व आघाडीवर त्याच्यातील अभिनेता प्रेक्षकांची निराशा करत नाही हे नक्की. वास्तविक बघता काही स्टंट्स इतके अचाट आहेत सिनेमातले कि एक दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीही लाजावा. पण ज्या शिताफीने तो ते निभावून नेतो ते खरोखर कौतुकास्पद आहे. बाकी सगळे जाऊ देऊ पण सिनेमातील त्याच्या एंट्रीलाच जो ज्या पर्वतावरून उडी मारतो गिर्यारोहण प्रशिक्षण संदर्भात (ज्यामुळे त्याला आर्मीची ऑफर मिळते) ते शूटिंग हे प्रेक्षकांना समजत असूनही त्याचे चित्रीकरण ज्या जबरदस्तरीतीने करण्यात आले आहे ते बघून एखाद्या हॉलिवूड वाल्यानेही इम्प्रेस व्हावे. या चित्रिकरणात संगणकाचा हात किती असावा हा भाग वेगळा पण  हिंदी प्रेक्षकांसाठी हा अनुभव शब्दश: "अचाट" या कॅटेगरीत येतो हे नक्की. त्याचा फिजिकल फिटनेस या त्याच्या एन्ट्रीमुळेच प्रेक्षकांना तो पटवून देतो जो पुढे रजनीकांत लाजेल असे स्टंट्स कहाणीत असूनही प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतो अन हसवत नाही.   

त्यानंतर त्याचे एक बाप म्हणून व्याकुळ होणे अन मुलीच्या शोधार्थ धावपळ करणे हे प्रेक्षकांना पटणे महत्वाचे होते कारण नाही म्हटले तरी त्याचे त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्याचे कारण भारतीय प्रेक्षकांना पचण्यासारखे नव्हते. हे कारण प्रेक्षकांनी इग्नोर करावे अन नंतरच्या त्याच्या धावपळीकडे\अभिनयाकडे लक्ष द्यावे असा त्याचा हेतू असावा. त्यात अजय देवगण एक दिग्दर्शक म्हणून पूर्णतः यशस्वी होतो हे नक्की.

अजय देवगण हा ऍक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा, त्यामुळेच कि काय कदाचित पण एक वेगळा असा ऍक्शन डायरेक्टर सिनेमात नसूनही दक्षिणेकडील अभिनेते लाजतील असे शानदार ऍक्शन सिक्वेन्सेस\स्टंट्स शिवाय मध्ये आहेत. परममित्र रोहित शेट्टीकडील प्रोजेक्ट्स मध्ये ऍक्शन वर असणारा भर यातून आपोआप धडा शिकल्यामुळे कि काय कदाचित पण यांचे चित्रीकरण अप्रतिमरीत्या झालेले आहे.

एका चित्रपटाला वाहिलेल्या खानदानातील व्यक्ती असूनही आपल्या पहिल्याच दिग्दर्शनाच्या व्हेंचरचा मुहूर्त अजयने चुकवावा हे दुर्दैवी पण असे घडलंय खरं. आर्ट फिल्म या संकपनेकडे वळणारे चित्रपट दिवाळीत आणू नये कारण प्रेक्षकांची उत्सवी मानसिकता विरोधात जाण्याची पुरेपूर शक्यता असते, असा आजवरचा प्रॅक्टिकल अनुभव आहे. मला हा चित्रपट अजय देवगण चे दिग्दर्शन अन अभिनय दोन्हीसाठी आवडला म्हणून मी "शिवाय" ला 3 1/2* (साडे तीन) स्टार देईन पाचपैकी, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

बार बार देखो

निर्माता धर्मा प्रोडक्शन्स (जोहर फॅमिली) आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत, बार बार देखो. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्याच सुपरस्टार शाहरुख खानच्या “कभी अलविदा ना केहना” मध्ये पण एका चांगल्या कन्सेप्टची निरर्थक हाताळणी मुळे वाट लागली होती, त्या अनुभवाची आठवण धर्मा प्रोडक्शन्सला ‘बार बार देखो’ करून देणार हे नक्की.   



वास्तविक बघता  comparatively  वेगळी कल्पना होती. प्रेमात पडलेले जोडपे लग्न करण्याचा निर्णय घेते आणि या निर्णयात नवरदेवाची महत्वाकांक्षा आड येऊन लग्न तुटते. या कथेला भूत-भविष्य-वर्तमान या तिन्ही काळात निर्माता-दिग्दर्शकाने फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न लोकांना कितपत आवडतो यावर कमर्शियल याचे यश अवलंबून असेल.

सिद्दार्थ मल्होत्रा (करण जोहरचे “स्टुडंट ऑफ इयर”चे फाईंड) आणि कतरीना कैफ ये दोघे नायक नायिका म्हणून कहाणीला लाभलेले आहेत. कहाणी जरा वेगळी होती, भूतकाळात गुंतून न राहता आणि भविष्य काळाची व्यर्थ चिंता न करता वर्तमान काळाला पूर्ण 100% देऊन वर्तमान काळाला जगा असा संदेश देण्याचा लेखक श्री राव यांचा प्रामाणिक प्रयाण होता. मान्य कि सिद्धार्थ मल्होत्राने प्रयत्न पूर्ण केला पण तो पुरा पडला नाही. माझ्या मते तो एक चांगला मॉडेल आहे. त्याने कॅमेऱ्यासमोर येऊन आठ-दहा फोटो काढून निघून जाण्यातच त्याची भलाई आहे. 'आपण अभिनय करू शकतो' असा आव त्याने आणू नये.    अभिनेत्री कतरीना कैफ बद्दल काय लिहिणार, सुपरस्टार सलमान खानच्या मुळे वर आलेली एक व्यक्ती. इतक्या वर्षांनंतरहि इंग्रजी-हिंदी भाषेतले ट्रान्सफॉर्मेशन अभिनयात तिला जमू नये??

नित्या मेहरा या नवीन दिग्दर्शकाचे दिग्दर्शन बार बार देखो ला मिळालेले आहे. नित्या मेहरा या सहपटकथा लेखकही आहेत. दुर्दैवाने हे सोडून त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे काहीही विशेष नाही.
बऱ्याच ठिकाणी त्यांची अननुभवी हाताळणी नडली असे बघताना वाटून जाते पण नंतर नेटवर फिरताना मला लक्ष्यात आलं कि अनिल कपूरच्या '24' या मालिकेच्या दिग्दर्शकही त्याच आहेत. म्हणजे  "बंदी मे दम है" अगदीच नवीन नाही. कहाणीचा ठिसूळपणा हाच वाट लागण्यामागे मुख्य मुद्दा असावा.
करण जोहर ने एक दोन नव्हे चक्क पाच संगीतकारांच्या वेगवेगळ्या गाण्यांसाठी उपयोग केलेला आहे. आणि फॉरेन लोकेशन्स वगेरे वगेरे (पडद्यावरील) श्रीमंती थाटमाटहि करण्यात कसूर केलेली नाही. पण.....
कोणताही सिनेमा का बघावा किंवा का बघू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. मला बार बार देखो मध्ये कतरीना कैफचा 'भारतीय लूक' हि गोष्ट सोडून इतरही काहीही उल्लेखनीय जाणवले नाही. मला समजले नसेल असे असेल कदाचित, पण मी अर्धा स्टार (1/2*) 'बार बार देखो' ला देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर


शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

अकिरा

अकिरा

निर्माते/दिग्दर्शक ए आर मुर्गाडोस सोनाक्षी सिन्हा आणि अनुराग कश्यप अभिनीत एक नवीन चित्रपट घेऊन आले असून टायटल आहे 'अकिरा'. अकिरा हा एक संस्कृत शब्द असून त्याचा मराठीत अर्थ होतो 'डौलदार'. आणि शब्दश: सोनाक्षीने हा अर्थ या भूमिकेत ओतलेला आहे हे सांगण्यास विशेष.

या कहाणीत ए आर मुर्गाडोसने साऊथ पद्धतीने तीन तासांच्या वेळात बऱ्याच कहाण्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एसिड अटॅक, प्रेम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कहाणीतील नाट्य, महाविद्यालयीन जीवन या कोनांना स्पर्श करत शेवटी होणारा कहाणीचा ट्विस्टरुपी अंत म्हणजे अकिरा.




अभिनयात सोनाक्षी सिन्हा (अकिरा शर्मा), कोंकणा सेन-शर्मा (राव्या) आणि अनुराग कश्यप (ए सी पी राणे) या सगळ्यांनी आपापल्या भूमिकांना व्यवस्थित न्याय दिलेला आहे पण बाहेर निघताना लक्षात राहतो तो खलनायक अनुराग कश्यपच. एक खलनायक कसा असावा? तर खलनायकाने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना त्या भूमिकेचा/व्यक्तीचा द्वेष करण्यास भाग पाडावे. या मुद्द्यावर अगदी चपखलपणे बसलेली भूमिका म्हणजे अनुराग कश्यपचा ए सी पी राणे. सिस्टीम मधील लूपहोल्सचा फायदा उठवत वरची कमाई करणारा एक ए सी पी आणि त्या कमाईला पचवताना होणारे अनेक लफडे सांभाळणारा एक पोलिसवाला अप्रतिम रित्या अनुराग कश्यपने उभा केलेला आहे. आजपर्यंत अनुराग कश्यप मला एक दिग्दर्शक\निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून माहित होता पण इतका चांगला अभिनेता असेल हे मला नवीनच होतं. त्याने भविष्यात अभिनयाचा सिरियसली विचार करायला हरकत नाही माझ्यामते.     

ए आर मुर्गाडोस म्हटलं जी आपोआप आठवतो गजिनी. त्यानंतरही त्याने हॉलिडे केला अक्षयसोबत पण जी छाप गजिनीची पडली तिची बरोबरी करणे जमले नव्हते हॉलिडेला. या वेळेसही त्याने प्रयत्न उत्तम केलेला आहे यात वाद नाही पण सोनाक्षीची भूमिका फिजिकली फिट अभिनेत्रीची दाखवणे या भागाला महत्व देताना तिच्या अभिनयाकडे दुर्लक्ष झालेले आहे त्याचे. मान्य कि फिजिकली फिट अभिनेत्री हि त्या कहाणीची गरज होती पण आमचा अतुल कुलकर्णी एका छोट्याशाच भूमिकेत जी छाप सोडून जातो तसलं तिला जमलं नसतं काय? याचा निर्णय प्रेक्षक घेतीलच पण हे दुर्लक्ष कदाचित भोवेल.

खलनायकांसाठी कोणताही सिनेमा बघण्याचे हे दिवस नाहीत, मान्य. पण तरीही अनुराग कश्यपने खरोखर कमाल केलेली आहे अकिरात. त्याच्या अभिनयासाठी अन कहाणीच्या वेगळेपणासाठी मी अकीराला साडे तीन (3 1/2*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

YZ (मराठी चित्रपट)

YZ असे विचित्र टायटल का असा प्रश्न टायटल बघून रसिकांना पडू शकतो आणि ते योग्यही आहे कारण YZ हे दोन लेटर्स एका मराठी शिवीचा अपभ्रंश आहेत ज्याचा एक अर्थ साध्या शब्दांत होतो "बावळट".  कल्पक लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे हि जगावेगळी हिंमत दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि नंतर या टायटलचे समर्पक एक्सप्लेनेशन कथेत दिल्याबद्दल कौतुक. कधी कधी जाणवणारी एक मानसिक सणक जेंव्हा "किक" या नावाने हिंदीत येते आणि आमचेच मराठी लोक उचलून धरतात तेंव्हा आम्ही मराठी जनांनी असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असाच काहीसा विचार या जोडीने केला असेल आणि जन्माला आला YZ. काय नि कसे हे बघण्यासाठी सिनेमा बघावा कारण YZ चे कारण यावर अख्खी कथा उभी आहे सिनेमाची.
अबब\गजानन कुलकर्णी (सागर देशमुख) या एका लग्नाळलेल्या वराची कथा तीन अभिनेत्र्यांच्या कोनाने फिरून शेवटी संपते म्हणजे YZ . सागर देशमुखच्याच साथीने अक्षय टाकसाळे उर्फ बत्तीस याने ज्या यशस्वीपणे कथा पेलून दाखवलेली आहे त्यासाठी त्याचे विषेश कौतुक. मला वाटते हा अक्षयचा पहिलाच प्रयत्न असावा आणि जर पहिलाच असेल तर मराठी चित्रपट सृष्टीत एका उत्तम अभिनेत्याचे आगमन झाल्याचे तो सिद्ध करतो.
या तीन जरी अभिनेत्र्या असल्या तरी लेखक क्षितिज पटवर्धन याने व्यवस्थित कथा मांडलेली आहे जेणेकरून रसिकांचा उत्साह टिकून राहावा. प्रत्येक भिन्नलिंगी व्यक्ती हा लग्नासाठी बायको किंवा नवरा शोधताना एक विशिष्ट अपेक्षा आपल्या मनाशी निर्माण करीत असतो. मग जे प्रपोजल्स येतात ते आपल्या मनाशी निर्माण केलेल्या अपेक्षांशी ताडून त्या प्रतिमेला शोधण्याचा प्रयत्न करतो. लव्ह मॅरेज नावाच्या कल्पनांत नशिबवानाना हि प्रतिमा गवसलेली असते आणि अरेंज मॅरेज वाले हि प्रतिमा शोधताना जी प्रतिमा भेटते त्याच व्यक्तीत आपल्या मनातील प्रतिमा शोधतात. खूप मोठी कल्पना आहे हि पण लेखक क्षितिज पटवर्धन याचे खरोखर कौतुक कारण त्याने एका नाटकवाल्याच्या शिताफीने कथेची मांडणी केलेली आहे. मला माहित नाही कि क्षितिज नाटक लिहितो का ते पण नसेल तर त्याने नक्की लिहावे कारण त्याला प्रसंगानुरूप कथेची अंतरात्मा वळवण्याची हातोटी गवसलेली आहे माझ्यामते.
समीर विद्वांस हे YZ चे दिग्दर्शक. त्यांचे या कठीण कल्पनेला तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात लेखकाच्या साथीने प्रेक्षकांच्या गळी उतरवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.वास्तविक बघता इतकी कठीण कल्पना आहे हि कि प्रेक्षक कन्फ्युज होण्याची पुरेपूर संधी आहे\होती. पण तरीही समीरजीनी हिमतीने हि कल्पना यशस्वीपणे पेलून दाखवली. कोठेही बोट दाखवता येणार नाही या दुर्मिळ व्यवस्थितपणे.
ऋषिकेश-सौरभ आणि जसराज हे तीन संगीतकार चित्रपटाला लाभलेत. दोन गाणे अन तीन संगीतकार. यातील जसराज हे नाव पंडित जसराज यांचे असावे अशी मला दाट शंका आहे कारण केतकी माटेगावकर आणि स्वप्नील बांदोडकर यांचे 'प्रियकरा' हे गाणे पूर्ण अस्खलित संस्कृतमध्ये आहे. शाकुंतल या नाटकातील कालिदासाच्या नाटकातील हे गाणे असल्याचा संदर्भ मला नेटवर फिरताना सापडला.  या अस्खलित संस्कृत मधील गाण्यासाठी केतकी अन स्वप्नील या दोघांचेही विशेष अभिनंदन कारण त्या दोघांनीही हे गाणे समर्पकपणे पेलून दाखवले.
सागर देशमुख याने साकारलेला गज्या हा व्यक्ती आपल्याला रोजच्या जीवनात भेटणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीत कुठे-ना-कुठे लपलेला आढळतो. पण आपल्यातील भावनांना वाट मोकळी करून देणारा गज्या हा शेकडोंपैकी एखादाच असतो. 'लोक काय म्हणतील' या कन्सेप्ट खाली बाकी आपल्याला दिसणारे शेकडो गज्या दबून जातात. हि लेखकाला अपेक्षित कल्पना मला पटली अन आवडली म्हणून मी दिग्दर्शन-क्षितिज पटवर्धनची लेखणी अन मुख्य म्हणजे केतकी व स्वप्नीलचे एकमेव अस्खलित संस्कृत मधील  गाणे यासाठी चित्रपटाला साडेतीन (3 1/2) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर   

शनिवार, २३ जुलै, २०१६

कबाली

दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली  हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही.

साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते. पण लिंगा किंवा शिवाजी सारखी कहाणीची विशेष पातळी गाठणे लेखक/दिग्दर्शक प रणजित याना जमलेले नाही हे नक्की. आपला हिंदी कहाणी लेखक असता तर मलेशियातील स्थायिक भारतीयांच्या व्यथा/ चिनी घुसखोरीमुळे त्यांना मलेशियात होणारा त्रास\नायकाची प्रेमकहाणी\ त्याचा जीवनातील संघर्ष इत्यादी इत्यादी इत्यादी बाबीना एकमेकांत गुंतवत चार ते पाच हिंदी चित्रपटांच्या कहाण्या तयार होतील अशी कहाणी बनली असती. पण "सब कुछ रजनीकांत" हि कहाणी साकारणे जमले नसते.

सुपरस्टार रजनीकांत हा कबालीश्वरन या डॉन च्या मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक हे फक्त त्याला बघण्यासाठीच गर्दी करणार याचा अंदाज आधीच असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत अति-महत्व आहे. साधीशी गोष्ट सिनेमाच्या पहिल्याच पंधरा मिनिटात 25 वर्षे तुरुंगात घालवून तो बाहेर येतो अन या बाहेर येण्यात त्याचे जे स्वागत त्याच्या मंडळींकडून होते ते स्वागत अन त्याचे पार्श्वसंगीत याची पातळी  अतिशय उच्चं असल्याचे बाकी चित्रपटभर बघताना जाणवून जाते. वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्याची नायकाची भूमिका\प्रेम वगैरे करण्याची इच्छा असेल असे मला तरी वाटत नाही पण चाहत्यांच्या आग्रहाखातर तो करत असावा आणि या हि वयात तो बरोबरीच्या इतरांना पुरून उरतो हे जगाला आपोआप जाणवत असेल. चिनी अभिनेत्यांसोबतची त्याची जुगलबंदी, या वयातीलहि फिजिकल फिटनेस वगैरे कौतुक त्याच्या बद्दल आहेच. त्याच्या वयाचा उल्लेख करण्यामागे त्याचा फिजिकल फिटनेस आणि सिनेमाच्या सुरवातीच्या श्रेय नामावलीत त्याचा उल्लेख "पदमविभूषण रजनीकांत" असं होतो हे मला विशेष वाटलं. आपली मराठमोळी राधिका आपटे त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे पण जेवायला बसल्यावर भात-भाजी-पोळी असा सगळा जामानिमा ताटात असल्यावर कितीही व्यवस्थित कापलेला कांदा दिला तरी कुणी जेवल्यानंतर "किती सुंदर कापला कांदा" असा उल्लेख करतो का?? आणखी काय बोलावे!!!   

प रणजित यांचे दिग्दर्शन कबालीचे आहे. लिंगा किंवा गेला बाजार शिवाजी मध्ये राजनीकांतची ची की "लार्जर दॅन लाईफ" इमेज होती तशी इमेज निर्माण करण्यात कबाली कमी पडतो हे मात्र जाणवते. भलेही कहाणीला इतक्या विविध कोनांनी फिरवत प्रयत्न तसा केला असेल हे जाणवते पण तो प्रयत्न कमी पडतो हे मात्र नक्की. पण एक दिग्दर्शक हाच जेंव्हा लेखक असतो आणि कहाणीत नायकालाच महत्व द्यायचे आहे हि requirement त्याला अन निर्मात्याला क्लियर असते तेंव्हाच असे होत असावे. संतोष नारायणन यांचे संगीत कबालीचे आहे. दक्षिण भारतीय पद्धतीचे तीन किंवा चार गाणे आहेत पण या गाण्यांपेक्षा त्यांनी पार्श्वसंगीतात कमाल केलेली आहे. जिथे, जसे, जितके पाहिजे तसेच पार्श्वसंगीत आहे.

सुपरस्टार रजनीकांत हा एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून लोकांना आवडतच असेल. जर तीनही तास पडद्यावर कहाणी वगैरे इतर क्षुल्लक गोष्टींना नोटीस न करता त्याला बघण्याची तयारी असेल, तर तुमच्यासाठीच हा चित्रपट आहे.  मी माझ्यातर्फे कबालीला 2* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर 

शनिवार, ९ जुलै, २०१६

सुलतान

सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी  पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण  सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय?? शंकास्पद बाब आहे कारण मी जो शो बघितला त्या माझ्या दुपारच्या शोला जवळपास 70% खुर्च्या रिकाम्या होत्या.


सुलतान अली खान (सुपरस्टार सलमान खान) आणि आरफा (अनुष्का शर्मा) या दोन्ही कुस्तीपटूंच्या प्रेमाची घडलेली\बी-घडलेली आणि शेवटी पूर्ण झालेली कहाणी म्हणजे सुलतान.

सुपरस्टार सलमान खान हा कुस्तीपटू- रेसलर अश्या भूमिकेत आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ज्या शिताफीने त्याने दोन्ही भूमिका त्यातल्या विविधांगी कंगोऱ्यांसकट निभावून नेल्यात त्याला तोड नाही. कितीही चांगला दिग्दर्शक असता आणि समजा तुषार कपूर सुलतान खान असता तर......जस्ट इमॅजिन!!! सलमान ने खरोखर खूप मेहनत घेतल्याचे जाणवते बरेचदा विशेष करून क्लायमॅक्स ला. 
अनुष्का शर्मा(आरफा) या महिला कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. सलमान खानच्या भूमिकेसमोर तिची भूमिका मुख्य अभिनेत्री असूनही आपोआप एक सहाय्यक अभिनेत्री इतकी मर्यादित होते. रणदीप हुडा काही काळ सहाय्यक भूमिकेतून दर्शन देतो आणि छोटीशी भूमिका असली तरी तिची नोंद घ्यायला भाग पडतो.

अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कहाणी लेखक. आणि आदित्य चोप्रा बरोबर सहपटकथा लेखकही. आणि सांगण्यास समाधान की त्यांनी कुठेही आपल्या कर्तव्यात कसूर केलेली नाही. तसे पाहता सुलतानचा रेसलिंग क्लायमॅक्स हा सलमान ने कितीही मेहनत घेतली असती आणि दिग्दर्शक अननुभवी-कन्फ्युज्ड असता तर त्या मुख्य सीनची वाट लागली असती. पण त्यांनी सगळे व्यवस्थित निभावून नेले.  

विशाल-शेखर या जोडगोळीने संगीत सुलतानला आहे.  संगीतही अगदी उत्कृष्ट वगैरे नसले तरी अगदीच टाकाऊ कॅटेगोरीतही येत नाही. उलट ज्या शिताफीने सुलतान चा टायटल ट्रॅक आणि सच्ची-मुच्ची या दोन गाण्यांचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर वापर आहे ते निश्चितच  कौतुकास्पद आहे. आणि एक महत्वाचे सुरवातीलाच सलमान खानच्या एंट्रीला जे पार्श्वसंगीत आहे, काही सेकंदच, पण त्यासाठी विशेष कौतुक. कारण सलमानच्या एंट्रीलाच जर त्या भूमिकेची छाप पडली नसती तर पुढे जे इम्प्रेशन क्लायमॅक्स मुले क्रिएट होते त्यात फरक पडला असता हे नक्की

सलमान च्या चित्रपटांत तोच असतो डोळ्यांसमोर तीनही तास, दबंग 1-2, रेडी, वॉन्टेड, किक, बजरंगी भाईजान हे काही ठळक उदाहरणे, कहाणी काहीही असो पण पडद्यावर पूर्णवेळ तोच असतो आणि या परंपरेला सुलतान अपेक्षेप्रमाणे पुढे नेतो, अर्थात इथे कहाणीच तशी होती म्हणा पण तरीही ........ 
सुपरस्टार सलमान खान खरोखरच कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी अभिनयाच्या दृष्टीने सुलतान मध्ये करून गेलाय. त्याचा धर्म - पूर्वायुष्यातील त्याच्या चुका - त्याचा प्रेमभंग इत्यादी इत्यादी पूर्वग्रह आधी करून घेतलेला असेल तर हा चित्रपट बघणाऱ्यांसाठी नाही. मान्य की एक व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल व्यक्ती-दरव्यक्ती प्रेक्षकांचे मत बदलेल पण तरीही कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता जर हा चित्रपट बघितलात तर आवडण्याचीही दाट शक्यता आहे.  बाकी डिटेल्स बाजूला ठेवू पण ज्या तन्मयतेने त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी कुस्तीपटू-रेसलर उभा केलेला आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच त्याच्या जाणवणाऱ्या प्रचंड मेहनतीसाठी मी  माझ्यातर्फे सुलतानाला   पाच पैकी चार  (4*) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर