शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

अकिरा

अकिरा

निर्माते/दिग्दर्शक ए आर मुर्गाडोस सोनाक्षी सिन्हा आणि अनुराग कश्यप अभिनीत एक नवीन चित्रपट घेऊन आले असून टायटल आहे 'अकिरा'. अकिरा हा एक संस्कृत शब्द असून त्याचा मराठीत अर्थ होतो 'डौलदार'. आणि शब्दश: सोनाक्षीने हा अर्थ या भूमिकेत ओतलेला आहे हे सांगण्यास विशेष.

या कहाणीत ए आर मुर्गाडोसने साऊथ पद्धतीने तीन तासांच्या वेळात बऱ्याच कहाण्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एसिड अटॅक, प्रेम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कहाणीतील नाट्य, महाविद्यालयीन जीवन या कोनांना स्पर्श करत शेवटी होणारा कहाणीचा ट्विस्टरुपी अंत म्हणजे अकिरा.




अभिनयात सोनाक्षी सिन्हा (अकिरा शर्मा), कोंकणा सेन-शर्मा (राव्या) आणि अनुराग कश्यप (ए सी पी राणे) या सगळ्यांनी आपापल्या भूमिकांना व्यवस्थित न्याय दिलेला आहे पण बाहेर निघताना लक्षात राहतो तो खलनायक अनुराग कश्यपच. एक खलनायक कसा असावा? तर खलनायकाने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना त्या भूमिकेचा/व्यक्तीचा द्वेष करण्यास भाग पाडावे. या मुद्द्यावर अगदी चपखलपणे बसलेली भूमिका म्हणजे अनुराग कश्यपचा ए सी पी राणे. सिस्टीम मधील लूपहोल्सचा फायदा उठवत वरची कमाई करणारा एक ए सी पी आणि त्या कमाईला पचवताना होणारे अनेक लफडे सांभाळणारा एक पोलिसवाला अप्रतिम रित्या अनुराग कश्यपने उभा केलेला आहे. आजपर्यंत अनुराग कश्यप मला एक दिग्दर्शक\निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून माहित होता पण इतका चांगला अभिनेता असेल हे मला नवीनच होतं. त्याने भविष्यात अभिनयाचा सिरियसली विचार करायला हरकत नाही माझ्यामते.     

ए आर मुर्गाडोस म्हटलं जी आपोआप आठवतो गजिनी. त्यानंतरही त्याने हॉलिडे केला अक्षयसोबत पण जी छाप गजिनीची पडली तिची बरोबरी करणे जमले नव्हते हॉलिडेला. या वेळेसही त्याने प्रयत्न उत्तम केलेला आहे यात वाद नाही पण सोनाक्षीची भूमिका फिजिकली फिट अभिनेत्रीची दाखवणे या भागाला महत्व देताना तिच्या अभिनयाकडे दुर्लक्ष झालेले आहे त्याचे. मान्य कि फिजिकली फिट अभिनेत्री हि त्या कहाणीची गरज होती पण आमचा अतुल कुलकर्णी एका छोट्याशाच भूमिकेत जी छाप सोडून जातो तसलं तिला जमलं नसतं काय? याचा निर्णय प्रेक्षक घेतीलच पण हे दुर्लक्ष कदाचित भोवेल.

खलनायकांसाठी कोणताही सिनेमा बघण्याचे हे दिवस नाहीत, मान्य. पण तरीही अनुराग कश्यपने खरोखर कमाल केलेली आहे अकिरात. त्याच्या अभिनयासाठी अन कहाणीच्या वेगळेपणासाठी मी अकीराला साडे तीन (3 1/2*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा