गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

(संगीत) देवबाभळी

 



(संगीत) देवबाभळी

संत तुकाराम हे एकमहान संत होते , मान्य, पण त्यांच्या या जगावेगळ्या विठूवेडाचा त्यांच्या घरात काय परिणाम झाला असेल ??सगळे जग व्यवहारिकतेच्या पाशांत गुरफटलेले असताना त्यांच्या या वेडामुळे त्यांचे घर जागेवर उरले असेल ?? सावकारीचा त्यांच्या सगळा वडिलोपार्जित  डोलारा त्यांनी आपल्या हाताने विसकटून टाकला तेंव्हा त्यांच्या घरात काय परिणाम झाला असेल ??? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे/आपापल्या दृष्टिकोनपरत्वे भिन्न भिन्न कोनांनी लगडलेले सापडेल पण त्याचे उत्तर प्रत्येक मानवी कोनांतून वेगळे मिळेल हेच खरे.

तर लेखक/दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याना असलाच काहीसा प्रश्न पडला असावा. व्यक्तिपरत्वे वेगळे कोन हे मिळत असल्याचे रसिकांना माहित आहेच, तर त्यांचे विचार पडद्यावर ओघळले तेच मुळी (संगीत) देवबाभळी या नाटकाचा स्वरूपात. हे आपले नेहमी असते तसे डायलॉग्स, इमोशन्स असे शब्दांकनात चिंबलेले नाटक नाही तर संगीत नाटक आहे म्हणजेच मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते या दोन मुख्य पात्रांच्या गानरूपी संवादांत कथानक उलगडून दाखवणारे नाटक आहे आणि म्हणूनच त्याला संगीत नाटक म्हटलेले आहे.

 

संत तुकाराम म्हणजे विठुरायाच्या भक्तीत पूर्णपणे तहान भूक - घरदार विसरून सर्वस्व विठ्ठलाच्या पायी अर्पिलेला एक व्यक्ती. तर अश्या या जगावेगळ्या भक्ताची काळजी विठूरायाला नसेल का ?? तर "अवली' हि त्यांची बायको गर्भवती असताना त्यांना (संत तुकारामांना)  शोधत फिरते,तेंव्हा विठुरायाचे हृदय द्रवून तो रखुमाईला (लखुबाईला) त्यांच्या भक्ताच्या गर्भवती बायकोची काळजी घ्यायला पाठवतात. ती अवलीची काळजी घेताना या सर्व प्रसंगाला तिच्या दृष्टिकोनातून एक वेगळाच आयाम जोडते. आणि अवली - लखुबाई च्या संवादरूपी गाण्यांतून जी कथा रसिकांपर्यंत पोचते ती म्हणजेच "देवबाभळी".  

मुळात संगीत नाटक म्हणजेच गाण्यांतून फिरणारी कथा . आणि गाणे हा गाभाच असल्यामुळे त्याचे संगीत हे उत्तमच हवे. नुसते उत्तम नव्हे तर सर्वसामान्य प्रेक्षकांच्या गळी उतरून कोणत्याही प्रकारचा त्यांचा रसभंग होऊ देता कथेला पुढे सरकवत कथेचे सगळे आयाम कोण्याही गोंधळाविना अंतिम स्थानी पोचणे हे एक शब्दश: दिव्यच. तर अमर ओक यांनी हे शिवधनुष्य लेखक/दिग्दर्शक प्राजक्त देशमुख च्या साथीने लीलया पेललेले आहे.

अमर ओक यांचे नाटकासाठी महत्वाचे योगदान तितकेच महत्वाचे किंबहुना कांकणभर जास्तच महत्वाचे योगदान शुभांगी सदावर्ते (अवली) आणि मानसी जोशी (लखुबाई) या पात्रांचे. अवली आणि लखुबाई हे नुसते दोन पात्रच नव्हे तर संगीत नाटक असल्यामुळे मुख्य गायिकाही दोघीही आहेतच. पण आपापल्या जबाबदार्यांना दोघीनींही पूर्ण न्याय दिलेला आहे. नाटकामध्ये पाच मिनिटेही प्रेक्षक लक्ष भरकटून कथेपासून वेगळे होत नाहीत तर एका संगीत नाटकाच्या कथेंत गुंतून राहतात. होय हे योगदान निर्विवादपणे दोन्ही गायिका आणि अमर ओकचेच.

सध्याच्या काळांत आपण बऱ्याचदा नाटकांचे कौतुकं वाचतो पण देवबाभळीचे मागच्या ६२ प्रयोगांपैकी ५५ प्रयोग हे हाऊसफुल गेलेत. आजच्या OTT किंवा TV च्या जमान्यात हि एक विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे हे नक्की. प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत येताहेत हे नाटक बघायला याचे खरोखर कौतुक आहेच.

मी या नाटकाला माझ्या दृष्टीकोनातून  पूर्ण पाचपैकी पाच (*) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-          समीर पाठक

(२५/१२/२०२५)