शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

अमर फोटो स्टुडियो

एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ  आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला  स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच  अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर  आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ.


मनस्विनी लता रवींद्र म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या लेखीका आणि नुकत्याच गाजलेल्या "ती सध्या काय करते" च्या पटकथा लेखिका.  त्यांनी एक  गुंतागुंतीची कथा नाटकाचा कोणतेही रिटेक नसलेल्या अन लोकेशन बदलण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या वातावरणात अगदी कौतुकास्पद रित्या उभी केलेली आहे.

अमेय वाघ, सखी गोखले सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर या सगळ्यांचाच अप्रतिम अभिनय हे अमर फोटो स्टुडिओ चे मुख्य यश. अमेय वाघ ने अक्षरश: तीन ते चार वेगवेगळ्या भूमिका सराईतपणे वठवल्यात. आणि आजोबा - वडील - मुलगा या तीनही पिढ्यांच्या अभिनयात सुव्रत जोशी कोठेही कमी पडत नाही. उलट दुसऱ्या अंकात एक असा प्रसंग येतो कि त्याला एकाच सीनमध्ये दोन भूमिका कराव्या लागतात. त्या प्रसंगात फक्त वेशभूषेच्या फरकाने दोन भूमिका वठवून सुव्रत जोशी  अगदी अप्रतिम रित्या दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर पुरून उरतो. सखी गोखले हिने पण तिच्या भूमिकेत जीव ओतलेला आहे. स्टेजवरून खाली प्रेक्षकांत कहाणीच्या प्रसंगान्वये शिरून प्रेक्षकांना कहाणीत समरस होण्यास भाग पाडण्याचा तिचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता.

 एक अप्रतिम नाटक जे मनोरंजनाचा हेतू पूर्ण करते. वास्तविक एका नाटकाला रेटिंग मी काय देणार पण तरीही या नाटकाला ५* देण्याचा मोह मी चुकवणार नाही.

-समीर