"ती सध्या काय करते" (?/!)
प्रत्येक प्रौढ पुरुषी मनात "ती"ची एक प्रतिमा असते. लहानपणी/तरुणपणी, कोणीतरी/कुठेतरी/कधीतरी भेटलेली. या तीची प्रतिमा धूसर किंवा स्पष्ट हे बघणार्यावर अवलंबून असते पण clarity कितीही विवादित असली तरी "ती" अस्तित्वात असते हे नक्की. प्रथितयश मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे या सदाबहार कल्पनेला घेऊन आपल्यासमोर आले आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रुपेरी पडद्यावरील आगमन हि या चित्रपटाची त्याच्या विषयाप्रमाणेच एक खासियत. खरं तर हा विषयच इतका सदाबहार आहे कि कोणत्याही संवेदनशील मनाची पाकळी अलगद उलगडणारा. बरे तुमच्याजवळ संवेदनशील मन नसले तरी, तुमच्या मनात अलगद शिरून तुम्हाला भूतकाळात जाण्यास बाध्य करणारा हा विषय. त्यामुळे सगळेच अप्रतिम जुळून आलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनात स्थान न मिळवले तरच नवल!!
अनुराग आणि तन्वी हे मित्र अन मैत्रीण. या दोघांची लहानपण-तारुण्य अन प्रौढपण यांची कहाणी म्हणजे 'ती सध्या काय करते' !! या कहाणीत अनुरागचे लहानपण, तारुण्य अन प्रौढपण यातल्या विविध कला दिग्दर्शकाने कौतुकास्पदरित्या टिपलेल्या आहेत. लहानगा अनुराग, तारुण्यातला अनुराग अन जरासा मोठा झाल्यावर mature झालेला अनुराग यांच्यातील फरक हा रसिकांना पटणे हे या कहाणीला प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यास आवश्यक होते, कितीही चांगला विषय असला अन या आघाडीवर अपयश असतं तर कपाळमोक्ष (तिकीटबारीवर) नक्की होता. हा फरक प्रेक्षकांनी विश्वास ठेवण्यालायक जुळून आलेला आहे.
अनुरागचे आणि तन्वीचे लहानपण हा या कहाणीच्या पाया बनविण्यासाठी आवश्यक घटक होता. हृदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्निहोत्री यांनी अक्षरश: अप्रतिमरीत्या हे लहानपण उभे केलेले आहे. मध्यमवर्गीय अन अपेक्षांना बासनात न बांधणारे लहानपण जे सदैव सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते.सकारात्मक तर असते पण या सकारात्मकतेतही
practicality ची कास न सोडणारे लहानपण. या अभिनेता वा अभिनेत्रीने दिग्दर्शकाच्या अपेक्षांना जरा चुकविले असत तर जो पाया कहाणीच्या मजबुतीसाठी आवश्यक होता तो ठिसूळ राहिला असता अन.......
वास्तविक बघता 'ती' च्या बद्दल हळवे असणारे कोणतेही 'त्या'चे मन ज्या वयात तिला बघते ते वय म्हणजे तारुण्य आणि म्हणूनच कदाचित पण या कहाणीत सगळ्यात नजाकतदार अन अन साकारण्यास कठीण हि भूमिका अभिनयची होती. अभिनयात नावाप्रमाणेच बऱ्याच ठिकाणी तो उजवा असल्याचे भासवून देतो प्रेक्षकांना. बरेच प्रसंग असे होते
उदा. त्याचा कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या फेयरवेलला तन्वीसोबतचे शेवटचे भांडण असे कि त्यात तो जर पुरला नसता तर दिग्दर्शकाला अपयशी हा शिक्का मिळवून देण्यात मुख्य हिस्सा त्याचा असता. पण तसे तर घडले नाहीच उलट मराठी चित्रपटसृष्टीला एका उत्कृष्ट अभिनेत्याने आपल्या आगमनाची चुणूक दाखवून दिलेली आहे हे मात्र नक्की.
त्याच्या भूमिकेप्रमाणेच तिची भूमिकाही इथे महत्वाची होती. ती सध्या काय करते (?/!) हा प्रश्नच मुळात एखाद्या त्याला पडेल जेंव्हा एखाद्या त्याला एखाद्या तिच्याबद्दल काहीतरी माहित असेल. ती एक मैत्रीण जी 'वीट' येण्याइतकी सवयीची. जिच्या असण्याची इतकी सवय एखाद्या त्याला व्हावी कि तिच्या नसण्याने तो जिवंतपणी नेस्तनाबूत व्हावा. आर्या आंबेकर ने अपेक्षेबाहेर उत्कृष्टरित्या हि भूमिका निभावलेली आहे हे नक्की. तिचे सौंदर्य हे एका मध्यमवर्गीय मराठी मुलीचे प्रतीक म्हणून इतके व्यवस्थितरीत्या शोभून गेलेले आहे कि कदाचित म्हणूनच बघणारा प्रत्येक 'तो' त्याच्या 'ती'ला शोधतो यात अन बघणारी प्रत्येक 'ती' आरसा. 'ती सध्या काय करते (?/!)' या शीर्षकातील ती म्हणजेच तरुणपणची. आणि म्हणूनच या चित्रपटाची खरी नायिका.
सुपरस्टार अंकुश चौधरी म्हणजेच आमचा 'दुनियादारीतला दिग्या' अन येथे प्रौढ अनुराग देशपांडे बनलेला आहे. प्रेयसीशी ब्रेक-अप झाल्यानंतर उन्मळून पडलेला पण नंतर स्वतःच स्वतःला सावरून कालांतराने एक यशस्वी व्यक्ती बनलेला 'तो'. प्रौढ तन्वी आहे तेजश्री प्रधान. ती हि तिच्या आयुष्यात मश्गुल पण त्याच्याशी सामना होताच ती हि थोडीशी अडखळते. अगदी क्षुल्लक भूमिका दोन्ही अप्रतिमरीत्या निभावल्यात दोघांनीही.
सतीश राजवाडेंचे दिग्दर्शन हे 'ती सध्या काय करते' (?/!) चे मुख्य यश. सतीश राजवाडे म्हणजे 'प्रेमकथांना अप्रतिमरीत्या हाताळणारा व्यक्ती' अशी एक प्रेक्षकांची मानसिकता मुंबई-पुणे-मुंबई (१/२) अन 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या दोन मुख्य यशानंतर त्यांनी अन झीने मराठी प्रेक्षकांची बनवून ठेवलेली आहे. पण या मानसिकतेत 'फक्त स्वप्नील जोशी बरोबर' या शब्दांना वगळण्यास प्रेक्षकांना बाध्य करण्यात राजवाडे यशस्वी होतात हे नक्की. वेवेगळ्या वयातल्या प्रेमकथांना हाताळताना एकाचवेळेस (म्हणजे एकाच तीन तासांच्या कथेत/पडद्यावर) फक्त भाव-भावनांना महत्व देऊन मराठी प्रेक्षकांना पचेल इतपत संयमितरित्या हाताळणे हे नक्कीच कठीण होते. मुळात तीनही वयातल्या या प्रेमकथांना हाताळताना त्या-त्या वयाप्रमाणे त्यांच्या भावनांना 'manipulate
' करणे हेच जोखमीचे होते. हे शिवधनुष्य व्यवस्थित पेलल्याबद्दल सतीश राजवाडेंचे कौतुक.
"ती" हा प्रत्येक "त्या"च्यासाठीचा नाजूक विषय. अगणित "त्या"च्यासाठी भळभळणारा अन काही मोजक्या “त्या”च्यासाठी आयुष्याचे सार बनलेला. अश्या या विचित्र गोष्टीत म्हणजे कश्या तर एका 'त्या'ला महत्व दिले तर दुसरा 'तो' नाराज व्हायचा अन तिच्यासाठी व्हायसेव्हर्सा. तर असल्या या नाजूक विषयावर लेखक सतीश राजवाडे अन पटकथा लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे विशेष कौतुक कारण आपापल्या भूमिकांना दोघेही यशवीपणे पुरेपूर निभावतात.
मराठीत आता खरोखर दिवस बदलले असून मागील वर्षीच्या 'कट्यार', 'नटसम्राट' अन सैराट नंतर यावर्षीची सुरवात करण्याचे अप्रतिम कारण
असणाऱ्या 'ती सध्या काय करते' ला मी पाच पैकी पाच (५*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर

मी सध्या काय करतो ?
उत्तर द्याहटवानुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ह्या विश्वात म्हणे दोन हजार अब्ज आकाशगंगा आहेत. तर या अब्जावधी आकाशगंगांमधल्या अब्जावधी ग्रहांपैकी एका ग्रहावरच्या अब्जावधी लोकांपैकी मी एक !
एवढ्या प्रचंड विस्तारलेल्या विश्वात माझी ओळख ही आमच्या गल्लीतल्या तिसऱ्या घराच्या पलीकडे जाणार नाही हे मी आधीच ओळखलं होतं. ते ही त्या घरात गोडलिंब आणायला आई मला वारंवार पाठवायची म्हणून! असं असताना, मी सध्या काय करतो हा प्रश्न एखाद्या मुलीलाचं काय अगदी कोणालाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय! अनेक वर्षांनी एखाद्या ठिकाणी गर्दीत मी दिसलोच तर 'देवा,हा अजून आहेच का ?'असा प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझ्याविषयी असणाऱ्या ह्या सार्वत्रिक अनास्थेचं एकमेव कारण,'मी तेंव्हातरी काय करायचो?' या प्रश्नाच्या उत्तरात आहे!
तसं आमच्या लहानपणी लोकसंख्येचा उद्रेक वगैरे व्हायचा असल्यामुळे एका वर्गात 'साठ-सत्तरचं'(!) मुलं असायची. अश्यावेळी उजवीकडल्या दुसऱ्या लाईनीतील पाचव्या बाकड्यावर बसलेल्या माझ्याकडे बाईंचं लक्ष जाण्याची शक्यता कमीच होती. त्यासाठी वर्गात असलेली अप्रतिम प्रकाशयोजना आणि आमचा एकंदरीतच शैक्षणिक अंधार ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. तरीसुद्धा कर्मधर्मसंयोगाने बाईंनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं देण्यासाठी हात वर केला तरी तो त्यांना दिसत नसे. वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं हे ब्राउनी पॉईंट्स मिळवण्यासारखं असतं. त्याचा प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अप्रत्यक्ष फायदे असतात. तर ब्राउनी पॉईंट आमच्या नशिबात नव्हते. मग आम्ही वर्गात फेमस कसे होणार? मग एखादी मुलगी आमच्याकडे कशी बघणार? आणि “मी सध्या काय करतो” हा प्रश्न तिला कसा पडणार? तसं शाळेतल्या एका पद्धतीप्रमाणे, तिमाही-सहामाही परीक्षेचा निकाल सांगताना वर्गात त्या त्या विद्यार्थ्याला पुढे बोलावून मोठ्याने सांगायचे. इथे फेमस व्हायचा थोडाबहुत चान्स होता. पण आमचा रोल नंबर चाळीस-बेचाळीस आणि मार्कही साधारण तेव्हढेच !! त्यामुळे पुढे जाऊन निकाल घेऊन येण्याची परिक्रमा मी ०.००३ सेकंदात पूर्ण करायचो. मग तीसुद्धा संधी गेली (त्या शिक्षकांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल कारण्याएवढं कायद्याचं ज्ञान त्यावेळी नव्हतं ह्याची खंत वाटते.) तसं वर्गात जोड्या लावण्याचे प्रकार भरपूर चालायचे. पण जोडी 'लावण्यायोग्य' अशीही स्वतःची ओळख मी कधी निर्माण करू शकलो नाही. आणि मी स्वतः लावलेल्या जोडीची व्हॅलिडिटी अट्ठेचाळीस तासाच्या वर टिकत नव्हती. शाळेच्या वार्षिक उत्सवात हिंदी-मराठी गाण्यांवर मुलामुलींचे नाच बसवण्यात यायचे. तिथेही आमची वर्णी कधी लागली नाही. फारच फार 'शूर आम्ही सरदार' या गाण्यासाठी कोरस मध्ये मला उभं करायचे. बरं शाळेत जाऊद्या, पण रिक्षातून येताजाता एखाद्या मुलीशी ओळखबिळख व्हावी म्हणावं तर बोंबलायला आमचं घर शाळेच्या बोडख्याशी! प्रार्थनेचा 'पssssssssssहिsssssssला नमस्कार' सुरु झाल्यावर घरून निघालं तरी पाचव्या नमस्कारापर्यंत मी शाळेत पोहोचायचो. अश्या प्रकारे आमचं शालेय जीवन तर 'ती'च्याविनाच गेलं.
'कॉलेजमध्ये गेल्यावर भेटतेच ना बे' या एकमेव आशेवर आम्ही शालेय शिक्षण पूर्ण केलं. पण मधल्या या कालखंडात जग किती बदललंय हे आमच्या ध्यानातच आलं नाही. शाळेतल्या "चल हो बाजूला" म्हणणाऱ्या साळकाया- माळकाया आता "ओह एक्सक्यूज मी प्लीज" म्हणत होत्या. अन आम्ही अजूनही "आय माय कमीन सर?" च्या पलिकड़े गेलो नव्हतो. त्यांच्या नवीन कोऱ्या स्कुटया आमच्या हर्क्युलस बाबाच्या शेजारी ऐटीत उभ्या राहायच्या. आता ब्राउनी पॉईंट्स मिळवायची पद्धतही बदलली होती. त्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करून नोट्स वगैरे काढाव्या लागायच्या. चला एकवेळ ते ही केलं असतं, पण नोट्स काढायला समोरचा कुठल्या विषयावर बोलतोय हे तरी कळायला हवं ना? आमच्यातले काही उत्साही कार्यकर्ते प्रॅक्टिकलच्या वेळी मुलींना मदत करायला जायचे. जणू इंजिनाचा शोध यांच्या परसातचं लागला होता या थाटात बोलायचे. मला तर व्हर्नीयर (का कॅलिपर काय म्हणतात ते?) वापरून रीडिंगही घेता येत नव्हतं. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे माझे कॉलेजमधले मित्र 'जोड्या लावणे' खेळत नव्हते. 'अबे कोणाशीही लाव पण लाव' अशी भूमिका असायची. कारण त्यांचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. शेवटी काही सीनियर्सनी,'नजरेत येण्यासाठी' आम्ही गँदरिंगमध्ये वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये सामील व्हावं असं सुचवलं.पण आमची 'नसलेली ख्याती आणि असलेले गुण' बघता आम्हाला दरवेळी एकच कमिटी मिळायची. डिसिप्लिन कमिटी !! केंद्रीय मंत्रीमंडळात समाजकल्याण मंत्र्याचं जे स्थान असतं तेच कॉलेज गॅदरिंगमध्ये डिसिप्लिन कमिटीचं असतं. त्यांना कोणीही विचारत नाही! उलट नुसतेच उभे असतात म्हणून एखादयाची बॅग पकडायची जबाबदारी त्यांच्यावर येते. गॅदरिंगच्या त्या दोन दिवसात एखाद्या मुलीने मदत मागितलीच तर ती जास्तीत जास्त 'ह्या नाटकाची प्रॅक्टिस कुठे सुरु आहे रे?' एवढं विचारण्यापुरती असते! शेवटी आमचं कॉलेजही तिच्याविनाच गेलं.
उत्तर द्याहटवाअर्थात या सगळ्यासाठी इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही. पण आत्यंतिक वेंधळेपणा, अफाट न्यूनगंड आणि तरीसुद्धा असलेली बेफिकीर वृत्ती(किंवा निर्लज्जपणा म्हणा हवं तर) परमेश्वराने आमच्यांतच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही. बरं एवढं असताना मुलींनी इंप्रेस व्हावे ही मनीषा तरी बाळगू नये, पण नाही ना ! येताजाता एखाद्या मुलीने चुकून एकदा जरी आमच्याकडे बघितलं तर स्वप्नांचे इमले डायरेक्ट वरातीपर्यंत पोहोचायचे! नंतर ह्याच मुलींच्या लग्नाच्या वराती आमच्या डोळ्यासमोरून गेल्या.
या परिस्थितीत ती सध्या काय करते हा प्रश्न मला शंभर मुलींच्या बाबतीत पडत असला तरी मी सध्या काय करतो असं प्रश्न एक शंभरांश मुलींनाही पडणार नाही.आणि पडलाच तर त्याचे तिच्या मनातले संभाव्य उत्तरं खालीलप्रमाणे नसावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना !
"तो सध्या काय करतो?....कॉलेजमधून बाहेर पडला असेल ना एव्हाना?
--चिनार
म्हणतात की पहिले प्रेम विसरता विसरत नाही. असाच एकाचा अनुभव नक्कीच वाचा. कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या...
उत्तर द्याहटवाअज्ञात क्रमांक पाहून सुरेशने नाक मुरडतच विचारले *"कोण ?"*
समोरचा मंजुळ आवाज विचारत होता, *"सुरेश का ?"*
आवाज एकदम ओळखीचा वाटला. मग सुरेशने विचारले *"हो, आपण ?"*
*मी रोल नंबर २९..."* आवाजातून ओळख जाणवली, खात्रीसाठी त्याने पुन्हा विचारले *"रोल नंबर २९"?*
*"हो, मी roll no २९ बोलतेय ! ".*
हळूच स्वयंपाकघरात डोकावलं, तर बायको पोळ्या लाटण्यात मग्न होती. निनाद हॉलमधून गच्चीवर आला. छातीची धडधड आता वाढली होती, श्वासही थोडा अडखळला, तोंडातून शब्द फुटेल कि नाही असं वाटू लागलं.
नकळत तो भूतकाळात गेला. जिच्यासाठी आपण जीव ओवाळून टाकायचो, तरीही ती ढुंकूनही आपल्याकडे पहायची नाही त्या *रोल नंबर २९ ला* आज आपली गरज लागावी, आठवण यावी या कल्पनेनेच तो सुखावला.
आता काय बोलाव हे कळतच नव्हतं, पण तिचा आवाज ऐकून तो परत भानावर आला, *"काय कुठे आहेस ? खूप वर्षात भेट नाही, फोन नाही, शशीने नंबर दिला म्हणून फोन करतेय."*
तिचा आवाज ऐकतच रहाव असं त्याला वाटत होत.
आता मात्र तिने अजून एक बॉंब टाकला, *"भेटायचय होतं तुला, कधी वेळ आहे ?"*
त्याला क्षणभर वाटल म्हणावं, *‹तुझ्यासाठी कधीपण"*, पण मनाला आवर घालत तो म्हणाला *"रविवारी"*.
तिने पुन्हा विचारले, *"कुठे भेटूयात, तुझ्या घरी कि माझ्याकडे येतोस ?"*
आता त्याला स्वर्ग दोन बोटेच उरला होता. अजून हुरूप आला *"एखाद्या तटस्थ ठिकाणी भेटूयात का ?"*
*"कुठे हि... "* ---- ती.
मग त्याने शहरातील एका मोठ्या शानदार हॉटेलच नाव सुचवलं. भेटीचं ठिकाण आणि वेळ निश्चित झाली. आता पुढचे चार दिवस त्याला युगापेक्षाही मोठे वाटू लागले.
अचानक एक मोदी जाकेट घेवून तो घरी आला. एक दिवस सलून मध्ये जाऊन फेशिअल मसाज थोड्या भुर्या झालेल्या केसांना रंग, असं सगळा सेटअप बदलला. नवऱ्यातील बदल पाहून, बायकोने विचारले, तर रविवारी फार महत्वाची मिटिंग आहे असं सांगून वेळ मारून नेली. ती भोळी होती. तिला गैर काहीच नाही वाटलं. नाकासमोर आयुष्य जगणाऱ्या जोडीदाराला आतून होणाऱ्या गु्दगुल्या तिला जाणवल्या नाहीत.
हजारो रुपये बूट, गॉगल यावर खर्च होत होता, पण तिच्या भेटीपुढे पर्वा नव्हती.
रविवार उजाडला. सकाळपासून स्वारी एकदम खुशीत होती. पाच वाजले. टॅक्सी दारात येवून उभी राहिली. बायकोने शुभेच्छा दिल्या. मुलानंही बाबा कोणत्या तरी कामगिरीवर चाललाय असं वाटून नमस्कार केला.
गाडी हॉटेलच्या दारात थांबली. ती हातात गुलाब घेवून त्याची प्रतीक्षा करत होती. तिच्याकडे पाहून हरखून गेला. दोघं आत जावून बसले. महागड्या डिश ऑर्डर केल्या गेल्या. बिल पण साहेबांनी डेबिट कार्डने भरलं.
सगळं कस छान पार पडलं. बँक शिल्ल्कीचा फज्जा उडाला होता. पण हा आनंद परत मिळणार नव्हता. समुद्रकाठी जावून बसण्याचा तिचा प्रस्ताव ऐकून हा तर खुलूनच गेला...
नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.
थोडा वेळ वाळूत बसल्यावर तिने पर्स मधून काही कागद काढले, आणि *"यावर सही करशील का ?" असं लडिवाळपने विचारले.
विमा पॉलीसीचे कागद पाहून तो थबकला.
ती म्हणाली बाकीची सर्व माहिती आपण बोलत असताना मी नोट केलीय, फॉर्म मी नंतर भरेन, तू फक्त सही कर.
सही झाली आणि हप्ते सुरु झाले.
दर हप्त्याला आठवणी ताज्या होत राहिल्या...
*LIC जिंदाबाद*😀👍🏻😜😜😜😜😜😜
.
.
.
.
.
.
म्हणून हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की...
.
.
.
.
.
*"ती सध्या काय करते?"*
🙄😳😐😜🙏🏻🙏🏻😝
Courtesy : whatsapp