मराठी चित्रपटांना
लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना
बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला
आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय
सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट
मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच.
त्यामुळे बाकी सगळे जाऊ द्या पण लेखक-दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजुळेंचे त्यासाठी
विशेष अभिनंदन.
नागराज मंजुळेंचा सिनेमा
म्हणजे थोडाफार "आर्ट फिल्म" संकल्पनेकडे असलेली कहाणी अशी सर्वसाधारण रसिकांची
मानसिकता त्यांनी बनवून ठेवलेली आहे. पिस्तुल्या अन fandry हे त्यांचे आजवरचे दोनच
चित्रपट पण या संकल्पनेकडे वळणारे.पण प्रेम या संकल्पनेला घेऊन शेवट सोडून इतर कुठेही
फारसा आर्ट फिल्मकडे न वळणारा एक चित्रपट आपण बनवू अशी कल्पना त्यांना तरी असेल का?
देव जाणे!! पण बनवला खरा.
आर्ची अन परश्या हि
एक टीनेजर जोडी. त्यांचे घडलेले प्रेम अन झालेला दु:खांत अशी कहाणी सैराट मध्ये आहे.
सोशल साईट्सवर मी या कहाणीचा जातीशी वगेरे संबंध असून त्याच्याशी संबंधित खूप इंटरेस्टिंग
चर्चा बघितल्या. पण चित्रपट प्रत्यक्ष बघितल्यावर समजल कि सैराट मध्ये कोणताही प्रत्यक्ष
उल्लेख नाही. जो आहे तो इतका अप्रत्यक्ष आहे कि तुम्ही जोडूही शकता किंवा दुर्लक्षितहि
करू शकता. पूर्णपणे बघणार्याच्या मानसिकतेवर अवलंबून. पण एक लहानसा स्कोप मात्र मंजुळेंनी
सोडलेला आहे. पण माझ्या मते तसा कोणताही प्रत्यक्ष आक्षेपार्ह उल्लेख नाही.
आणखी एक महत्वाचं,
आजपर्यंत मी बघितलेली कोणत्याही सिनेमाची एक सगळ्यात वेगवान कथा-पटकथा म्हणजे सैराट.
पटकथेचा वेगळा साचा हाताळताना पकड सुटून भंगलेली कहाणी याचे संदर्भ पैश्याला पसाभर
उपलब्ध आहेत. पण यशराज फिल्म्स किंवा धर्मा प्रोडक्शन्स यांना टक्कर देणारी जबरदस्त
कथा-पटकथा अन ती हि मराठीत हे एक दुर्मिळ कॉम्बिनेशन निर्माण करण्यात नागराज मंजुळे
अपेक्षेबाहेर यशस्वी झालेत हे नक्की. कथेचा वेग इतका जोरदार कि फक्त मध्यंतरापर्यंतच्या
सैराट इतक्या कथेवर दोन किंवा तीन मराठी सिनेमे आणि चक्क एक हिंदी सिनेमा निघू शकला
असता. तरीही मध्यंतरा नंतरची कथेची महत्वाची
बाजू आपण विचारात घेतलेली नाही हे येथे उल्लेखनीय. या प्रचंड वेगाच्या धबधब्याला सावरताना, कोठेही एक मराठी प्रेक्षक जो
मुळात बारीक चिरफाड करत कोणताही सिनेमा बघतो,
आपला इंटरेस्ट गमावणार नाही हि काळजी घेणे म्हणजे एक प्रचंड मोठे दिव्य. पण नागराज
मंजुळे ते करून दाखवतात. या साठी त्यांचे खरोखर विशेष अभिनंदन.
नागराज मंजुळे हेच
कथा-पटकथा लेखक-दिग्दर्शक अन झी Talkies बरोबर निर्मातेपण. थोडक्यात एक ऑल-इन-वन
package. आज सिनेमा चालतोय म्हणून ठीकाय पण जर नीट बनला नसता तर त्यांचे जीणे हराम
होईल इतकी टीका त्यावर झाली असती. सध्या उत्कृष्ट सिमेमावरच होत असलेली चर्चा अन त्या
चर्चेतील सूर बघता असा अंदाज लावायला हरकत नसावी. याची त्यांना कल्पना नसेल असे मला
वाटत नाही पण तरीही त्यांनी हि कलाकृती उभारली आणि मुख्य म्हणजे यशस्वीपणे पेलून दाखवली.त्यांचा
मुळचा पिंड आर्ट फिल्मकडे वळणारा त्यामुळे त्यांनी स्वभावाप्रमाणे दु:खांत ठेवला. आपल्या
सगळे गुडी गुडी बघण्याची सवय त्यामुळे तो दु:खांत खुपतो पण तोच कदाचित माउथ-टू-माउथ
पब्लिसिटी साली प्रेरक असेल का?? भलेही या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे येईल पण तरीही
या दु:खांता मुळे निगेटिव्ह पब्लिसिटी मात्र होत नाहीये आजघडीला हे तिकीटबारीने दाखवून
दिलेले आहे.
रिंकू राजगुरू (अर्चना
पाटील-आर्ची) आणि आकाश ठोसर (प्रशांत काळे-परश्या) या दोघांची हि प्रेमकहाणी. त्यातही
रिंकू राजगुरू हिची अभिनय क्षमता हि उत्कृष्ट कि काय (!!) हे कदाचित दिग्दर्शकाने आधी ओळखल्यामुळे
असेल पण हि पूर्ण वेगवान पटकथा तिच्या भूमिके भोवती फिरते. नागराज मंजुळे यांचे या
मुळच्या कास्टिंग साठीही विशेष अभिनंदन कारण मुख्य दोन्ही व्यक्तिरेखांचे कास्टिंग
त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे घडवून आणलेले आहे. कास्टिंग डायरेक्टर वेगळा असणे हि चैन
एका मराठी सिनेमाला परवडत नसावी असा माझा अंदाज आहे पण मुख्य दिग्दर्शक म्हणून या बेमालूम
कास्टिंगचे श्रेय निर्विवादपणे नागराज मंजुळेंचेच. बाकीहि भूमिका आहेत, पर्श्याचा
गोतावळा - आर्चीचा गोतावळा, पण इतकी वेगवान पटकथा 8५% सीन्समध्ये आर्चिसभोवताल फिरते
आणि तिला मिळालेला "विशेष दखल अभिनयासाठी" हा राष्ट्रीय पुरस्कार योग्य असल्याचे आर्ची सिद्ध
करून दाखवते.
अजय-अतुल या शब्दश:
"महान" संगीतकार जोडगोळीचे संगीत हे सैराटचे मुख्य यश. तीन किंवा चारच मुख्य गाणे पण ज्या ताकदीने त्या गाण्यांचा चित्रपटातील
वापर आहे तो प्रेक्षकांना बांधून ठेवतो अन गुंतवून ठेवतो. हि बाब मराठीत दुर्मिळ आणि म्हणूनच अनुभवण्यासारखी.
त्यातही याच जोडीचे background music म्हणजेच
पार्श्वसंगीत. पण तेथेही त्यांची महान संगीत क्षमता ते प्रेक्षकांना जाणवून देतात.
बाकी जाऊ देऊ पण परश्या-आर्चीची जी पहिली भेट होते तेथे आपला आजवरचा चित्रपटांचा अनुभव
आपल्याला एखादं गाणं असेल असा अंदाज लावू देतो पण गाणे नाही आणि पार्श्वसंगीतासाठीचे
जे कडवे आहे ते फिट्ट बसते\शोभते प्रसंगाला. अजय-अतुल हेच दोघे या सगळ्या गाण्यांचे
लेखक. सगळ्या गाण्यांसाठी कौतुक पण "झिंगाट" साठी विशेष कौतुक. झिंगाट गाण्याचं
कथेतील जे स्थान आहे ते महत्वाचे आहे कारण या गाण्यानंतर आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीला
वेगळे वळण लागते किंवा ओहोटी लागते असे म्हणू पण हे गाणे जर जमले नसते तर काही खरं
नव्हतं. पण हि शक्यता तर दूरच इतके जबरदस्त
गाणे कि कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दहा गाण्यात भविष्यात मोजले जाईल हि
शक्यता निर्माण करून जाते हे गाणे.
चांगले चित्रपट मराठीत
बनतच नाही, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पगडा असलेला विनोदी काळ सोडून चित्रपट
निर्माते बाहेरच पडत नाही वगेरे वगेरे असंख्य कारणे मी वेगवेळ्या चर्च्यानमध्ये बघितलेली
आहेत. "कट्यार काळजात घुसली", " नटसम्राट" आणि आता "सैराट"
नंतर या चर्च्याना एक पॉजीटिव्ह वळण लागेल अशी अशा बाळगतो आणि माझ्यातर्फे सैराटला
पूर्ण पाच पैकी पाच (५ * ) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर