शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

मिस्टर एंड मिसेस सदाचारी (मराठी)





आशिष वाघ हे नवीन दिग्दर्शक मराठीत पदार्पण करीत असून मिस्टर एंड मिसेस सदाचारी हा सिनेमा घेऊन आलेले आहेत. टायटल वरून वाटत असल्याप्रमाणे सदैव चांगले आचरण करणारे जोडपे यासम काहीही प्रकार नसून मुख्य नायक "शिवा सदाचारी" आणि त्याची लग्नापर्यंतची हि कहाणी म्हणून नाव मिस्टर एंड मिसेस सदाचारी. वास्तविक बघता आशिष वाघ हे मराठी चित्रपट वितरण व्यवसायातील मोठे नाव पण यावेळेस स्वत:च दिग्दर्शक बनलेत. एका चित्रपट वितरकाला पटकथेच्या वेगाचा अंदाज नसावा हे दुर्दैवी!!! पण तसे घडलंय खर.

कहाणी:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) हा एक अभ्यासातल्या अपयशामुळे सतत वर्षानुवर्षे घरच्यांच्या आणि त्यातही मुख्यत्वे वडलांच्या रोषाला बळी पडलेला एक मुलगा. त्याला झालेले प्रेम. या प्रेमाची त्याने केलेली adjustment आणि सरतेशेवटी हुशार भावाला पछाडत घरच्या संकटात वडलाना केलेली मदत अशी एक खूपच कन्फ्युजिंग कहाणी यात बघायला मिळेल.

अभिनय:
शिवा सदाचारी (वैभव तत्ववादी) आणि प्रार्थना बेहेरे हे दोघे मुख्य भूमिकेत यात आहेत म्हणजेच मिस्टर आणि मिसेस. पण मोहन जोशी यांनीही शिवाच्या वडलांच्या भूमिकेत छाप सोडलेली आहे. वैभव म्हणजे मराठीतला सुपरस्टार एकदम अभिनयात "बाप" माणूस असे समजत कि काय पण पटकथा आणि कथालेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी त्याला इतके अति-महत्व दिलेले आहे कि बस. प्रेक्षक त्रासण्याइतके अति महत्व. मान्य कि बाजीराव-मस्तानी मध्ये चिमाजी अप्पाची भूमिका वैभवने अप्रतिम निभावली पण म्हणून तो लंगड्या कथा-पटकथेला तारून नेईल या अपेक्षेला काय म्हणावे?  प्रार्थना बेहेरेने "अती" न करता तिच्या वाट्याला आलेली भूमिका व्यवस्थित निभावलेली आहे. तिचे सौंदर्य हीच तिची अभिनयापेक्षाही जमेची बाजू आहे हे जाणून तिने तिच्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. पण बाहेर निघताना लक्षात राहतात ते मोहन जोशीच. आधी आपल्या नावडत्या मुलाचा त्यांचा दुस्वास मग आयुष्याच्या उत्तरार्धात आवडत्या मुलाने वार्यावर सोडल्यावर नावडता मुलगा जेंव्हा सावरतो तेंव्हा ते जाणवल्यावर त्यांचे कबुल करणे हे प्रेक्षकांवर छाप सोडून जाते.

दिग्दर्शन:
आशिष वाघ हे चित्रपट वितरण व्यवसायातून चित्रपट दिग्दर्शनात उतरलेले आहेत. तरीही त्यांनी इतके विविध प्रयत्न एकसाथ करावे याचे अप्रूप. प्रेमकहाणी-मित्रमेळा-प्रेमासाठी नायकाची इतरांना मदत- शिवजयंती इत्यादी इत्यादी विविध कोनाने कहाणी तीनही तास त्यांनी फिरवलेली आहे. शेवटी शेवटी लव जिहाद कडेही कहाणी वाकेल अशी शंका "नीता" च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना येते पण आशिष वाघ तिथे दया करतात कदाचित प्रेक्षकांवर.  पण त्यांनी पहिलाच प्रयत्न पुरेपूर निभावण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिवेन्सेस वगेरे जबरदस्त जुळून आलेत पण.....

संगीत:
संगीत या चित्रपटाचा एकमेव stong point. पंकज पडघन यांनी अप्रतिम संगीत दिलेले आहे सगळ्या गाण्यांना. पंकज पडघन म्हणजे दुनियादारी-तू हि रे-क्लासमेट्स-गुरु चे संगीत दिग्दर्शक. त्यांनी त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून ओळख आता निर्माण केली असून, भविष्यात अजय-अतुल नंतर मराठीत संगीत दिग्दर्शक म्हणून पंकज पडघन यांचे नाव आदर मिळवेल हे नक्की.  

मराठीत सगळंच उत्तम असावे लागते आणि थोडीशीही काडी इकडची तिकडे झाली तर मराठीत जमत नाही. एका पूर्वाश्रमीच्या चित्रपट वितरकाकडून संथ पटकथा हि चूक नव्हे गुन्हा घडलेला आहे या चित्रपटात म्हणून हा चित्रपट फक्त उत्कृष्ट संगीताच्या शिदोरीवर तरून जाईल काय?? याचे उत्तर काळ देइलच पण मी संगीत आवडले म्हणू पाव (१/४)* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.


-समीर     

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

घायल वन्स अगेन



सनी देओलचा राजकुमार संतोषीचा नव्वदीच्या दशकातला गाजलेला सिनेमा म्हणजे घायल. त्याचा पार्ट 2  म्हणजेच सिक्वेल घेऊन आणि त्याला म्हणजेच ज्येष्ठ पुत्र सनी देओललाच दिग्दर्शक बनवून घेऊन आलेत धर्मेंद्र. मागचा घायल हि त्यांचीच निर्मिती आणि सिक्वेल देखील त्यांचाच. मागच्या घायल मध्ये अमरीश पुरी ची व्यक्तिरेखा प्रचंssssड गाजली होती. एक नायक म्हणून सनी देओल प्रेक्षकांना जितका लक्षात राहिला तितकाच एक खलनायक म्हणून अमरीश पुरी. हा सिनेमा तशी जादू करू शकेल काय? याचे उत्तर काळच देईल पण सनी देओलने जर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण कमर्शियलि केले तर action सिक्वेन्सेस साठी रोहित शेट्टीला एक प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण झाल्याची प्रेक्षकांची खात्री पटते.
मागील घायल मधल्या नायिकेच्या म्हणजेच मीनाक्षी शेषाद्रीच्या एका वाक्यावरून सिक्वेल मध्ये पूर्ण कहाणी ओढलेली आहे. मागील घायलचा संदर्भ तितकाच एका वाक्यापुरता पण पूर्ण कहाणी उभी राहिली तीन तासांची एका वाक्यावर. मग नव्या दमाचे तरुणाईचे प्रतिनिधी वगेरे संमिलीत करून छानपैकी एक कहाणी यशस्वीपणे सनी देओलने उभी केली. झालेला अन्याय, अन्यायाविरुद्ध पेटलेली तरुणाई असा माल मसाला पेरून त्यात मुख्य भूमिकेत स्वत:च असल्यावर स्वत:च्या तारस्वरातील डायलॉग डिलीव्हरीलाही मस्तपैकी सनीने स्कोप ठेवलेला आहे. कहाणीत तरुणाईचा समावेश करून त्यांचे अन्यायाविरुद्ध पेटून उठणे नाटकी आहे कि काय अशी प्रेक्षकांना शंका येण्याइतपत नाट्यमयता आहे. हि शंका प्रेक्षकांना कितपत येईल/येईल कि नाही यावर सिनेमाचे भवितव्य ठरेल??
अभिनयासाठी सनी देओल म्हणजे मागच्याच घायल १ मधला अजय मेहरा आहे पण या वेळेस बळवंत राय मागच्या भागात अन खर्या आयुष्यातही अमरीशजीनचा मृत्यू झाल्यामुळे नाही. सनी देओल मागील भागात अन्यायाविरुद्ध पेटलेला एक वकील असतो, तारीख पे तारीख वगेरे त्याचे संवाद आजपर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या वेळेस थीम तीच असली तरी आता स्वत: दिग्दर्शक बनल्यावर कथेच्या मागणीनुसार त्याने तरुण चेहर्यांचा कथेत समावेश केलेला आहे. पण वयाचा जो फरक पडायचा तो अजय मेहरावर पडतोच पडतो. कथेनुसार त्याचे वय वाढलेले आहेच पण स्वत:च दिग्दर्शक असल्यावर/मुळे त्याने जर अती-आत्मविश्वासाने आपल्या संवादांना म्हणजेच त्याच्या बाबतीत डायलॉग डीलीव्हरीला महत्व दिलेले आहे. त्याची संवाद फेक हि काही विशिष्ट प्रसंगात चालून जाते, घायल-गदर वगेरे काही केसमध्ये चालून गेली पण प्रत्येकच वेळेस ती चालून जाईल या आत्मविश्वासाला मुजरा!!!! अनिल शर्मासारखा एखादाच असतो जो शून्यातून विश्व उभे करू शकतो!!!

सनी देओल स्वत:च दिग्दर्शक आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे दिग्दर्शन शैलीवगेरे डीटेल्स आपण जाऊ देऊ आणि इमोशनल म्हणजेच भावनात्मक प्रसंग साकारण्यातला अननुभवहि दुर्लक्षित करू पण एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. आणि तो म्हणजे फायटिंग सिक्वेन्सेस अर्थात action सिवेन्सेस. action सिवेन्सेस मध्ये रोहित शेट्टीचा हातखंडा आहे पण त्याला टक्कर कोणी देईल तर दिग्दर्शक म्हणून भविष्यात तर सनी देओल. सनी देओलने जर टायगर श्रॉफ सारख्या फिजिकली फिट अभिनेत्याला घेऊन जर एखाद्या चांगल्या कथेची/संगीताची जोड दिली तर कदाचित एक चांगली कथा साकारू शकेल तो हे प्रेक्षकांना वाटून गेल्याशिवाय राहत नाही.   
संगीतासाठी या वेळेस दोन जोड्या वापरल्यात पण बाप्पिदासारखी मजा सिक्वेल मध्ये नाही हे नक्की.

घायल वन्स अगेन जर सनी देओल आवडत असेल तर आवडण्याचा खूप चान्स आहे आणि टाईमपास करायचा असेल तर कदाचित भ्रमनिरास होण्याचा धोका आहे. माझा झाला पण सनी देओलची दिग्दर्शन शैली मला आवडली खासकरून action सिक्वेन्सेस म्हणून मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर