रविवार, ८ जानेवारी, २०१७

"ती सध्या काय करते"

"ती सध्या काय करते" (?/!)


प्रत्येक प्रौढ पुरुषी मनात "ती"ची एक प्रतिमा असते. लहानपणी/तरुणपणी, कोणीतरी/कुठेतरी/कधीतरी भेटलेली. या तीची प्रतिमा धूसर किंवा स्पष्ट हे बघणार्यावर अवलंबून असते पण   clarity  कितीही विवादित असली तरी "ती" अस्तित्वात असते हे नक्कीप्रथितयश  मराठी   दिग्दर्शक सतीश राजवाडे या सदाबहार कल्पनेला घेऊन आपल्यासमोर आले आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांचे रुपेरी पडद्यावरील आगमन हि या चित्रपटाची त्याच्या विषयाप्रमाणेच एक खासियतखरं तर हा विषयच इतका सदाबहार आहे कि कोणत्याही संवेदनशील मनाची पाकळी अलगद उलगडणारा. बरे तुमच्याजवळ संवेदनशील मन नसले तरी, तुमच्या मनात अलगद शिरून तुम्हाला भूतकाळात जाण्यास बाध्य करणारा हा विषय. त्यामुळे सगळेच अप्रतिम जुळून आलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनात स्थान मिळवले तरच नवल!!   


अनुराग आणि तन्वी हे मित्र अन मैत्रीण. या दोघांची लहानपण-तारुण्य अन प्रौढपण यांची कहाणी म्हणजे 'ती सध्या काय करते' !! या कहाणीत अनुरागचे लहानपण, तारुण्य अन प्रौढपण यातल्या विविध कला दिग्दर्शकाने कौतुकास्पदरित्या टिपलेल्या आहेत. लहानगा अनुराग, तारुण्यातला अनुराग अन जरासा मोठा झाल्यावर mature झालेला अनुराग यांच्यातील फरक हा रसिकांना पटणे हे या कहाणीला प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यास आवश्यक होते, कितीही चांगला विषय असला अन या आघाडीवर अपयश असतं तर कपाळमोक्ष (तिकीटबारीवर) नक्की होता. हा फरक प्रेक्षकांनी  विश्वास ठेवण्यालायक जुळून आलेला आहे.
अनुरागचे आणि तन्वीचे लहानपण हा या कहाणीच्या पाया बनविण्यासाठी आवश्यक घटक होता. हृदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्निहोत्री यांनी अक्षरश: अप्रतिमरीत्या हे लहानपण उभे केलेले आहे. मध्यमवर्गीय अन अपेक्षांना बासनात बांधणारे लहानपण जे सदैव सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते.सकारात्मक तर असते पण या सकारात्मकतेतही practicality ची कास सोडणारे लहानपण. या अभिनेता वा अभिनेत्रीने दिग्दर्शकाच्या अपेक्षांना जरा चुकविले असत तर जो पाया कहाणीच्या मजबुतीसाठी आवश्यक होता तो ठिसूळ राहिला असता अन.......

वास्तविक बघता 'ती' च्या बद्दल हळवे असणारे कोणतेही 'त्या'चे मन ज्या वयात तिला बघते ते  वय म्हणजे तारुण्य आणि  म्हणूनच कदाचित पण या कहाणीत सगळ्यात नजाकतदार अन अन साकारण्यास कठीण हि भूमिका अभिनयची होती. अभिनयात नावाप्रमाणेच  बऱ्याच ठिकाणी तो उजवा असल्याचे भासवून देतो प्रेक्षकांना. बरेच प्रसंग असे होते उदा.  त्याचा कॉलेजचा पहिला दिवस, कॉलेजच्या फेयरवेलला तन्वीसोबतचे शेवटचे भांडण असे कि त्यात तो जर पुरला नसता तर दिग्दर्शकाला अपयशी हा शिक्का मिळवून देण्यात मुख्य हिस्सा त्याचा असतापण तसे तर घडले नाहीच उलट मराठी चित्रपटसृष्टीला एका उत्कृष्ट अभिनेत्याने आपल्या आगमनाची चुणूक दाखवून दिलेली आहे हे मात्र नक्की.
त्याच्या भूमिकेप्रमाणेच तिची भूमिकाही इथे महत्वाची होती. ती सध्या काय करते (?/!) हा प्रश्नच मुळात एखाद्या त्याला पडेल जेंव्हा एखाद्या त्याला एखाद्या  तिच्याबद्दल काहीतरी माहित असेल. ती एक मैत्रीण जी 'वीट' येण्याइतकी सवयीची. जिच्या असण्याची इतकी सवय एखाद्या त्याला व्हावी कि तिच्या नसण्याने तो जिवंतपणी नेस्तनाबूत व्हावा. आर्या आंबेकर ने अपेक्षेबाहेर उत्कृष्टरित्या हि भूमिका निभावलेली आहे हे नक्की. तिचे सौंदर्य हे एका मध्यमवर्गीय मराठी मुलीचे प्रतीक म्हणून इतके व्यवस्थितरीत्या शोभून गेलेले आहे कि कदाचित म्हणूनच बघणारा प्रत्येक 'तो' त्याच्या 'ती'ला शोधतो यात अन बघणारी प्रत्येक 'ती' आरसा. 'ती सध्या काय करते (?/!)' या शीर्षकातील ती म्हणजेच तरुणपणची. आणि म्हणूनच या चित्रपटाची खरी नायिका

सुपरस्टार अंकुश चौधरी म्हणजेच आमचा 'दुनियादारीतला दिग्या' अन येथे प्रौढ अनुराग देशपांडे बनलेला आहे. प्रेयसीशी ब्रेक-अप झाल्यानंतर उन्मळून पडलेला पण नंतर स्वतःच स्वतःला सावरून कालांतराने एक यशस्वी व्यक्ती बनलेला 'तो'. प्रौढ तन्वी आहे तेजश्री प्रधान. ती हि तिच्या आयुष्यात मश्गुल पण त्याच्याशी सामना होताच ती हि थोडीशी अडखळते. अगदी क्षुल्लक भूमिका दोन्ही अप्रतिमरीत्या निभावल्यात दोघांनीही.

सतीश राजवाडेंचे दिग्दर्शन हे 'ती सध्या काय करते' (?/!) चे मुख्य यश. सतीश राजवाडे  म्हणजे 'प्रेमकथांना अप्रतिमरीत्या हाताळणारा व्यक्ती' अशी एक  प्रेक्षकांची मानसिकता मुंबई-पुणे-मुंबई (/) अन 'एका लग्नाची दुसरी गोष्टया दोन मुख्य यशानंतर त्यांनी अन  झीने मराठी प्रेक्षकांची बनवून ठेवलेली आहे. पण या मानसिकतेत 'फक्त स्वप्नील जोशी बरोबर' या शब्दांना वगळण्यास प्रेक्षकांना बाध्य करण्यात राजवाडे यशस्वी होतात हे नक्की. वेवेगळ्या वयातल्या प्रेमकथांना हाताळताना एकाचवेळेस   (म्हणजे एकाच तीन तासांच्या कथेत/पडद्यावर) फक्त भाव-भावनांना महत्व देऊन मराठी प्रेक्षकांना पचेल इतपत संयमितरित्या हाताळणे हे नक्कीच कठीण होते. मुळात तीनही वयातल्या या प्रेमकथांना हाताळताना त्या-त्या वयाप्रमाणे त्यांच्या भावनांना 'manipulate ' करणे हेच जोखमीचे होते. हे शिवधनुष्य व्यवस्थित पेलल्याबद्दल सतीश राजवाडेंचे कौतुक.

"ती" हा प्रत्येक "त्या"च्यासाठीचा नाजूक विषय. अगणित "त्या"च्यासाठी  भळभळणारा अन काही मोजक्यात्या”च्यासाठी आयुष्याचे सार बनलेला. अश्या या विचित्र गोष्टीत म्हणजे कश्या तर  एका 'त्या'ला महत्व दिले तर दुसरा 'तो' नाराज व्हायचा अन तिच्यासाठी व्हायसेव्हर्सा. तर असल्या या नाजूक विषयावर लेखक सतीश राजवाडे अन पटकथा लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे विशेष कौतुक कारण आपापल्या भूमिकांना दोघेही यशवीपणे पुरेपूर निभावतात.

मराठीत आता खरोखर दिवस बदलले असून मागील वर्षीच्या 'कट्यार', 'नटसम्राट' अन सैराट नंतर यावर्षीची सुरवात करण्याचे अप्रतिम कारण असणाऱ्या 'ती सध्या काय करते' ला मी पाच पैकी पाच (*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर