सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

बाजीराव-मस्तानी


बाजीराव-मस्तानी

बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो. 

बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी संजय लीला भन्साळी यांचे या मराठी मानसिकतेला अवघड विषयाला हात घातल्याबद्दल कौतुक कारण त्यांनी पूर्ण सिनेमात बाजीरावांचे  मस्तानीवर प्रेम होते ती त्यांची रखेल-अंगवस्त्र नव्हती  या वास्तविकतेवर भन्साळींनी फोकस केलेला आहे. बाजीरावांची मस्तानीशी झालेली पहिली भेट इथपासून सुरवात करून त्यांचे रंगलेले प्रेम इत्यादी अवघड विषयाला अप्रतिमरीत्या भन्साळीने हाताळलेल आहे.

बाजीराव पेशवे यांची झालेली मस्तानी या नर्तकीशी भेट अन त्या मस्तानीला तिच्या वडलांनी बाजीरावांना  केलेले नजर. तिचा पुण्यात/त्यांच्या घरात प्रवेश आणि शेवटी दोघांचाही झालेला (वेगवेगळा) मृत्यू या धाग्याभोवती विविध अंगाने फुलणारी कहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानी.नागनाथ इनामदार यांच्या "राऊ" या पुस्तकावर बेतलेली कहाणी असा उल्लेख पहिल्यांदाच आहे. मला अपेक्षा होती कि आधी घडलेला गदारोळ बघता भन्साळी "काल्पनिक कथा वास्तविकतेशी संबंध नाही" अशी सूचना आधी देईल. पण तसे काहीही घडले नाही.

काशीबाई साहेबांचा या कहाणीत आपोआप प्रवेश होतो कारण त्या श्रीमंतांच्या प्रथम पत्नी. त्यांचे आगमन कथेत झालावरही कथा मस्तानी आणि मस्तानीवर भाळलेला बाजीराव अशी न झुकता बाजीरावांचे शौर्य या गोष्टींवर फोकस करते या साठी भन्साळीचे खरोखर कौतुक.

बाजीरावांनी अवघ्या चाळीस वर्षांच्या जीवनात जवळपास सगळ्या प्रकारचे युद्धकौशल्य आत्मसात केले होते. मैदानी युद्धकलांत तर ते निपुण होतेच पण राजकारणी बाजूनेहि ते तरबेज होते. कथेत ओझरताच उल्लेख असला तरी निजामावर त्यांनी मिळवलेला विजय हा  त्यांच्या कुटनिति अन कावेबाज डावपेचात्मक राजकारणाचा अप्रतीम नमुना होता/आहे, अगदी फिरंग्यांनी त्यांच्या केम्ब्रिज विद्यापीठात अभ्यासण्याइतका. असल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला पडद्यावर उभे करणे हि  निश्चितच एक  कठीण गोष्ट होती. पण रणवीर सिंग कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या अभिनयात्मक कारकिर्दीतील अप्रतिम कामगिरी यात करून गेलाय. मस्तानीच्या प्रेमात पडलेला पण स्त्रीलंपट नसलेला अशी त्यांची योग्य अशी प्रतिमा रणवीर सिंग मुळे निर्माण होण्यास मदत होईल हे नक्की.

मस्तानीच्या भूमिकेत आहे दीपिका पदुकोण. मस्तानी हि रखेल नव्हती पण तिचा आणि श्रीमंतांचा विवाह झालेला होता असा उल्लेख भन्साळीला कदाचित इतिहासात सापडला नसावा. कारण त्या दोघांचा विवाह झाल्याच्या उल्लेख/प्रसंग सिनेमात नाही. पण श्रीमंत ज्या व्यक्तिमत्वावर भाळले असतील असे व्यक्तिमत्व पडद्यावर उभे करण्यात मात्र दीपिका पदुकोण यशस्वी होते हे नक्की. आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेली एक स्त्री, युद्धकलानिपुण पण श्रीमंतांच्या रूपावर/व्यक्तिमत्वावर भाळलेली स्त्री उभे करणे हे एक कठीण काम होते, नानासाहेबांचे व्यक्तिमत्व कथेत आल्यावर त्यांच्या रूपाने त्यांच्यासकट सगळ्या पेशवे घराण्याचा विरोध सहन करताना श्रीमंतांवर  असलेली  निष्ठा  डळमळीत न होऊ देणारी स्त्री असल्या छटा फक्त तीन तासांत एका अभिनेत्याने पडद्यावर उभ्या करणे हे किचकट काम होते. पण दीपिका पुरून उरली दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर हे नक्की.  

काशीबाई राणीसाहेबांच्या   भूमिकेत आहेत प्रियंका चोप्रा. काशीबाईंची भूमिकाही एक कठीण भूमिका होती. घरात नवर्याला होत असलेला विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत नवर्याच्या चुका पोटात घालून त्याला तोलामोलाची साथ देणारी एक कुलीन भार्या प्रियंकाने शब्दश: पडद्यावर उभी केलेली आहे. मस्तानीला समजून घेणारी पण तिने तिच्या मोठ्या बहिणीचा दर्जा देताच त्या दर्जाला नाकारणारी अन फक्त पतीपेमाने तुला आपलंस करते आहे हे तिला जाणवून देणारी राणी अप्रतिम रित्या प्रियंकाने उभी केलेली आहे.       

पिंगा अन मल्हारी या गाण्याला विविध कारणाने विरोध झाला. या गाण्यामुळे प्रतिमा खालावतेय या अन अश्या आशयाच्या पतिक्रिया मी तथाकथित पेशव्यांच्या वंशजांकडून वाहिन्यांवर बघितल्या. हे दोन गाणे अन माननीय काशीबाई साहेबांची प्रतिमा उभारण्यात दिग्दर्शकाने घेतलेली cinematic लिबर्टी आपण दुर्लक्षित करू पण तीन तासांची एक अप्रतिम ऐतिहासिक कथा विनादोष निर्माण करण्यात संजय लीला भन्साळी हे यशस्वी झालेत याचा आनंद होऊन मी चित्रपट ४१/२* (साडेचार) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर                     


रविवार, ६ डिसेंबर, २०१५

उर्फी-मराठी चित्रपट


लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान हे प्रथमेश परब (आपला टाईमपास मधला दगडू)  आणि नवीन तारका मिताली मयेकर यांना नवीन चित्रपटात घेऊन आले आहेत. मराठी चित्रपटाचा जीव म्हणजे "प्रेम" तर यात आहेच पण या बरोबरच मैत्री, कुंभमेळा आणि दहशवाद असल्या पूर्णपणे विरुद्ध कोनी विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो. प्रयत्न चांगला असला तरी प्रेक्षक कितपत स्वीकारतात हे बघणेबल राहील.
विक्रम प्रधान किंवा स्वत: प्रथमेश परब या दोघांपैकी कुणीतरी किंवा दोघेही अजूनही "दगडू" या व्यक्तिरेखेच्या अमलाखालीच असावेत असे वाटते. या चित्रपटातली 'देवा' ची एन्ट्री पासूनच अनेक प्रसंगात दगडूची छाप व्यक्तिरेखेवर अनेकदा जाणवते. दगडू हा जसा टपोरी टाईपचा असामी होता आणि एका ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडून तिला गटवतो असली कहाणी टाईमपास १ आणि २ मध्ये होती आणि अप्रतिम दिग्दर्शन-अभिनय आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे संगीत या पुंजीवर तगून गेली. पण हि किंवा असली कहाणी दर वेळेस प्रथमेश परब सोबत चालून जाइल या गैरसमजाला काय म्हणावं? तरी इथे स्पष्ट उल्लेख कसलाच नाही पण अंगुलीनिर्देश तसल्या प्रकारच्या कहाणीकडे आहे हे कविता लाड आणि मिलिंद पाठक यांच्या व्यक्तिरेखा अनेकदा प्रेक्षकांना जाणवून देतात. अभिनयासाठी उपेंद्र लिमयेंच्या ए सी पी कुलकर्णी या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल कारण त्यांनी अगदी दमदारपणे एक ATS अधिकारी उभा केलेला आहे जो शून्यातून कथेच्या मूळ कारणाशी पोचतो. भलेही शेवट जरा दुखान्त या सदरात मोडत असला तरी तेथेही प्रेक्षकांची सहानुभूती हि देव म्हणजे मुख्य व्यक्तिरेखेला मिळायला हवी पण घेऊन जातात उपेंद्र लिमये.
मिताली मयेकरचा हा पहिलाच चित्रपट आणि तिला प्रत्येक गोष्टीत लेखक-दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी इतक्यांदा महत्व दिलेले आहे कि ती कहाणीत नसताना पटकथेचा तोल जातो व कहाणीच भरकटण्याची शक्यता निर्माण होते. यात कोणताही हेतू नसावा हे स्पष्ट आहे पण अजाणतेपणी अस घडलंय खर. देवाची आणि अमृताची जोडी जमणे अन तुटणे या आणि इतक्याच हेतूत कुंभमेळा-दहशतवाद झालंच तर धर्मोल्लेख असल्या अनेक बाबींना विक्रम प्रधान हे स्पर्श करतात. या मागे कथा पुढे जावी इतकाच हेतू असला तरीही इतक्या चित्रविचित्र बाबींचे परस्परसंबंध दाखवताना किंवा चितारताना असे म्हणू विक्रम प्रधान हे शब्दश: अपयशी ठरलेत. या अपयशामागे इतर काहीही नसून चित्रविचित्र बाबींना स्पर्शण्यात सुटलेली कथेवरची पकड इतकेच एक कारण आहे. चिनार-महेश या संगीतकार जोडगोळीचा टाईमपास १ नंतरचा एक उत्तम प्रयत्न असा उर्फिचा उल्लेख करावाच लागेल.  
अभिनयात आधीच उल्लेखल्याप्रमाणे दगडू अका प्रथमेश परब आणि अमृता (मिताली मयेकर) या दोघांनीही आपापल्या भूमिकेसोबत पूर्ण न्याय केलेला आहे. मिताली मयेकर चा स्क्रीन प्रेझेन्स हा सुखावह  वाटतो. इशकझादे मधल्या परिणीती चोप्राची आठवण करून देते ती कित्येकदा. कारण तो हि अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट असला तरी तिला मुख्य बिंदूपाशी ठेवून तिच्या सभोवती पूर्ण कथा चित्रपटाची फिरली होती इशकझादेत. यशराजचा तो एक माइलस्टोन अशी त्याची ओळख आज असली तरी त्या यशात तिचा सहभाग हा सर्वोच्च होता. हि तुलना करावीशी वाटली कारण अमृताच्या व्यक्तिरेखेलाहि दिग्दर्शकाने तसेच अतिमहत्व दिलेले आहे. इतके कि तिच्या अपघातानंतर कहाणीवरची पकड सुटण्याइतकी ढिली पडते!!  
उर्फी हे टायटल का तर नाशिकचा कुंभमेळा अन त्या अनुषंगाने कथेत आलेला एक दहशतवादी हल्ला. त्यात जर मुख्य अभिनेत्याचा समावेश लेखकाला करायचा होता तर आधी त्याचा थोडातरी सहभाग प्रेक्षकांना पाटण्यासारखा दाखवायला नको?? एकदम त्याला आणून काय ते विशद करायला हा हिंदी सिनेमा आहे का? असले अनेक प्रश्न प्रेक्षकांसाठी विक्रम प्रधान सोडतात. याचे उत्तर बघणारे मराठी प्रेक्षक  कितपत शोधतात  हे बघण्यासारखे असेल
मिताली मयेकर ची मराठी चित्रपटातली एन्ट्री आश्वासक रित्या झालेली आहे. हि कथाच कदाचित तशी असल्यामुळे वाटत असावं कि काय हे नंतर तिच्या पुढील चित्रपटातून  कळेलच पण तिच्यासाठी आणि उपेंद्र लिमयेसाठी  मी चित्रपटाला 1* देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. 

-समीर